BLOG | हिस्ट्री रिटर्न्स...

घराचा उंबरा सोडला पाहिजे तरंच आयुष्यात काहीतरी साध्य करता येईल... आपली प्रगती होऊ शकेल... बाहेरच्या जगात उभं राहण्याची हिंमतही येते एवढंच काय तर दुनियादारी कळते अशी काहीशी समजूत असलेला वर्ग ते अगदी पालक मंडळी मुलांचं शिक्षण, नोकरी ते well settled होण्यासाठी शक्य ते सारं काही मुलांना काही कमी पडू नये जे त्यांच्या नशिबी आलं नाही ते सारं त्यांच्या वाटेला देण्यासाठी हे पालक सतत प्रयत्नशील असतात, चांगल्या शिक्षणासाठी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुलं, तरुण कित्येक स्वप्न पूर्ण करायला मोठ्या शहराची वाट धरत आलेली आहेत, त्यात वावगं ते काहीच नाही पण...
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागलेला लॉकडाऊनमुळे या सर्व मंडळींची उडालेली त्रेधातिरपीट म्हणजे विद्यार्थी, बॅचलर नोकरदार वर्ग ते स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एका खोलीत तिघे-चौघे राहणाऱ्या मुलांना चक्क रूम बाहेर पडणे अवघड झालेलं... ज्यांना जेवायला मेस किंवा खानावळी शिवाय दुसरा पर्याय नसायचा त्यांनी भुकेच्या शोधत बाहेर पडून पोलिसांच्या काठ्या खाऊन ढोपरं सुजवून घेतली... तर कित्येक मुलं जिल्हा बंदीमुळे गावाकडे जायला सुद्धा अव्वाच्या सव्वा पैसे आकारून मिळेल त्या वाहनाने, कोरोनाच्या भीतीने वाट्टेल तसा वैध-अवैध प्रवास करायला ही तयार झाली.
रूम आणि घरमालक घरभाडे या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर ते सविस्तर लिहावं लागेल, पण गेल्यावर्षी याच विषयावर लिहलेल्या ब्लॉगमध्ये यावर प्रकाश टाकला होताच. मेस-खाणावळ बंद असताना उपाशी पोटासाठी झालेली वणवण हळूहळू लॉकडाऊन जसं टप्प्या टप्प्याने पूर्वपदावर होत गेलं.... तसं एका भल्या मोठ्या संकटाचा सामना आपणच काय तर सबंध जग तोंड देत आहेच तर आपणही थोडी कळ सोसूया हे ही दिवस जातील... या ना त्या प्रकारे प्रत्येक माध्यमातून सर्वांचं सांत्वन सुरु होतं... जो तो एकमेकांना मदत करून धीर देखील देत होता.
निर्बंध हटले... लस आली... भीती मानसिक दडपण गेलं... मास्क-सॅनिटायझर, पावलो पावली 6 फुटाचं अंतर काटेकोर पाळणारे हेच आपण एकदम निर्धास झाले... लग्नकार्य धुमधडाक्यात सुरु झाली यात राजकीय नेते तरी मागे कसे राहणार... सगळीकडे सोशल डिस्टन्सिगचा फज्जा... 'कोरोनाचे तर नुसते आकडे वाढतात होत तर काहीच नाही...' 'रिपोर्ट खोटे येतात, डॉक्टरांचे खिसे भरण्यासाठी सगळं सुरु आहे....' इथवर गप्पा मारत विनाकारण छाती काढत फिरणारे एकीकडे तर कोरोना संसर्गामुळे कित्येक लोकांनी आपापले जवळचे प्रियजन गमावले... अशी वेळ कोणावर येऊ नये, पण 'माझं कोरोना काहीही वाकडं करू शकत नाही...' म्हणणाऱ्यांची संख्याही बरीच आहे, गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्ते संस्था अन्नदान करून कित्येकांना घरी पोहोचवून त्या फोटोंचा सुळसुळाट सोशल मीडियावर करून पुण्य कमावत होते, तर एकीकडे खोटे मेडीलकल रिपोर्ट, बनावट ई-पास काही शे रुपायांना वाटणारे महाभागही पकडले गेले..
यापलीकडे एक वर्ग असा होता की, झळ सोसत असून थोडी कळ सोसू पण कोरोनाच संकट जाईल जे काही आजवर कमावलं ते वापरून किमान आपला जीव तरी सांभाळून या आशेवर उश्याला असलेली ठेवण, दागिने मोडून हातातील काम गेलं असतानाही कसंबस वर्ष सारत होते.. कित्तेक विद्यार्थीसुद्धा परिस्थितीत स्वतःला तयार करत होते की, आपलं भविष्य आता कोरोना सोबत आहे आता सामोरं गेलं पाहिजे, कठीण काळातही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे... आयुष्य हा संघर्ष जर असेल तर रडून उपयोग नाही हे सगळं असताना आता परत तीच भीती तेच प्रश्न समोर दिसत आहेत आणि हिस्ट्री रिटर्न्स.... लॉकडाऊन होतंय की, काय आता म्हणून पुन्हा मानसिक त्रास डोकावू लागला आहे...
कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता विनाकारण होणारी गर्दी टाळणे, वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं आता भर दिला आहे. हळूहळू कठोर निर्णयाकडे शासन वळताना दिसत आहे.... या पुन्हा उद्भवलेल्या स्थितीला नक्की कोण जबाबदार यावर चर्चा करण्यात अर्थच उरला नाहीये.... कारण पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जातेय हे मी नाही तर वाढत जाणारी आकडेवारी बोलते आहे.
कित्येक जिल्ह्यात लॉकडाऊन तर कुठे विकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागलीय. गेल्या वर्षातून कसंबसं सावरलेले विद्यार्थी त्यांचा शैक्षणिकवर्षांचा झालेला बट्ट्याबोळ... ऑनलाईन वर्ग भरवता भरवता कधी वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या समजलं देखील नाही, पुन्हा गुणवत्तेचा उद्भवलेला प्रश्न, वाया गेलेलं वर्ष ते कित्येक घरात अचानकपणे कोरोनाने देवाघरी गेलेले मंडळी त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सोडवली जाणार नाही. पण उभं राहण्याची उमेद मनगटात आलेली होती आणि आहे.
पुन्हा आपल्या व्यावसायाची आपल्या शिक्षणाची दोरी पुन्हा पकडू लागलेले आहेत, छोटमोठे व्यावसायिक ते मोठमोठया कंपन्या मधील व्यवस्था असो वा धार्मिक सामाजिक सणवार उत्सव ला फाटा देत पुढं आली पण....
आत्मविश्वास कुठेतरी नडला असेल का? मास्क न घालण्याची कारणं; मास्क का घातला पाहिजे याहून अधिक महत्वाची आणि मोठी झाली... एकदा रिकाम्या झालेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या तशाच शो पीस म्हणून कुठेतरी कोपऱ्यात पडलेल्या दिसू लागल्या... ही बेफिकिरी का कशासाठी? आणि जगणं एवढं सोप्पय तर आपल्या आजूबाजुच्या लोकांचा जीव धोक्यात घालायचा तरी अधिकार कोणी दिला याचा ही भान न राखता वावरणं... यावर सरकार ने कित्येक दंड, गुन्हे, उपाययोजना, निर्बंध केले तरी त्यालाही एक मर्यादा असतात आणि यंत्रणा शेवटी हात टेकते.. पण आता हे पुन्हा चिघळेल का?
समोर येऊन उभी राहिलेली स्थिती अत्यंत भयंकर आहे.... रात्री 8 ते सकाळी 7 ची संचारबंदी पुन्हा कित्तेक विद्यार्थ्यांना उपाशी झोपायला लावणारी आहे.. नोकरदार मंडळींच्या कामाच्या वेळा, शिफ्ट्स आणि छोटे व्यावसायिक देखील अडचणीत सापडणार....
लॉकडाऊन हा पर्याय आहे की, नाही हा लेखाजोखा करणाऱ्या प्रत्येकाने सोशल मीडियावर व्यक्त होताना किमान स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं...
आपण काळजी घेतोय का? शासनाचे निर्बंध पाळतोय का? किमान कोणासाठी नको तर आपापल्या कुटुंबासाठी प्रत्येक कुटुंबाने योग्य खबरदारी घेतली; आळस, नकारात्मक कारणं सोडून चांगल्यासाठी धडपड केली तर काय वाईट आहे बरं...?
























