BLOG: मोठ्यांचं मोठेपण... हृद्य क्षणांची साठवण.... बाप्पांचा सण
आपल्या क्षेत्रात विशिष्ट उंची गाठूनही खरी मोठी माणसं जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी असतात. वाक्य तुम्हाला कदाचित फार तात्त्विक किंवा पुस्तकी वाटेल. पण, आम्ही गिरगावकर खरं तर श्याम सदनकर (आमच्या जुन्या चाळीचं नाव जिचा आता पुनर्विकास होतोय) त्याचा प्रतिवर्षी प्रत्यय घेतो. या चाळीचं, अवघ्या गिरगावचं नाव दुमदुमत ठेवणारं एक नाव अर्थात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र (Actor Jitendra) उर्फ रवी कपूर. चाळीचे माजी रहिवासी, म्हणजे फक्त शरीराने माजी. त्यांचं मन अजूनही चाळीत रुंजी घालतंय आणि ते आमच्या मनात.
याचा अनुभव आज सुरु झालेल्या श्रीगणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) आला. आमची वास्तुचा आता पुनर्विकास होतोय आणि तिथे नवीन टॉवरच्या कामाने गियर टाकलाय. साहजिकच उत्सव एका छोट्या मंडपात आणि साधेपणाने होतोय. त्या साधेपणाला आपल्या साधेपणाच्या मखराने जितेंद्र यांनी सजवलं. नेहमीप्रमाणेच आमच्या बाप्पांचं पहिल्या दिवशी दर्शन घेतलं. आपलेपणाने आमच्याशी संवाद साधला. त्यांचे घट्ट मित्र विजू पाटकर त्यांना भेटायला आलेले, तेव्हा आलास का रे..असं म्हणून त्यांना जितेंद्र कडकडून भेटले. चाळीच्या आणि बाप्पांच्या उत्सवाच्या आठवणींचं प्रतीक म्हणून आम्ही एक खास घड्याळ कस्टमाईज करुन घेतलंय. जे आम्ही जितेंद्र यांना आज भेट दिलं. त्या घड्याळाकडे त्यांनी अत्यंत बारकाईने पाहिलं. त्यात चाळीचा फोटो आणि सोबत बाप्पांचा फोटो. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जितेंद्र यांचं मन मागे जाताना आम्हाला दिसलं, ते भूतकाळातील अविस्मरणीय आठवणींमध्ये डोकावत होते.
निघताना आपल्या स्टाफ मेंबरपैकी एकाला म्हणाले, अरे ते घड्याळ नीट गाडीत ठेवं रे. त्यात माझ्या बिल्डिंगचा आणि बाप्पाचा फोटो आहे. आलिशान घरात वास्तव्य करताना, सर्व सुखांचे दरवाजे सताड उघडे असताना हिंदी सिनेसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची मोहर उमटलेली असताना त्यांची चाळीशी आणि इथल्या गणेशोत्सवाशी असलेली वीण किती घट्ट आहे, याचा वस्तुपाठच दिला या वाक्याने. त्यांचं ते वाक्य ऐकून मी थक्क झालो. खरं तर तिथे उपस्थित असलेले सारेच झाले असतील.
जितेंद्र यांनी आस्थेने पुनर्विकासाबद्दल आमच्याकडून माहिती घेतली. तुम्हाला आता किती स्क्वेअर फीट जागा ऑफर झालीय, इथपासून बारीकसारीक माहिती घेतली. त्यात आपलेपणाचा ओलावा होता, चाळीचा आणि चाळीत राहणाऱ्यांचा पाया अशाच आपलेपणाच्या मशागतीवर उभा राहत असतो. चाळीतून दुसऱ्या घरी जाऊन साठ पेक्षा जास्त वर्ष उलटून गेली, तरी जितेंद्र यांनी तो टिकवून ठेवलाय, वृद्धिंगत केलाय. त्या वास्तुतून निघताना त्यांना विचारलं, आपल्या रीडेव्हलपमेंटचं काम कसं सुरु आहे ते पाहायचंय का? तर ते म्हणाले, मी थेट नवीन टॉवरमध्ये येईन नक्की. साधारण 20 मिनिटं ते अर्धात तास आमच्यासोबत होते. पण, त्या प्रत्येक मिनिटातला प्रत्येक सेकंद इथलेच झाले होते. आधी आरती केली, मग आमच्याशी संवाद साधला, उपस्थित काही मोजक्या मंडळींना दिलखुलास फोटो काढू दिले. एकदा परिसराकडे चहूबाजने नजर फिरविली आणि त्यांनी घरची वाट धरली. मीही मग घराकडे जायला निघालो, मनात उत्सवाच्या असंख्य आठवणींचं तोरण सजत होतं. आगमनाची लगबग, मग रोज रात्री असणारे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, आधी स्पर्धक आणि मग आयोजक म्हणून त्यातला माझा सहभाग, ती सत्यनारायण पूजेची तयारी, स्नेहसंमेलनाचा अविस्मरणीय दिवस तर आमच्या सर्वांसाठी फ्लॅशबॅक मोमेंट्स. इमारत सोडून गेलेली आमची माणसं घट्ट बिलगून भेटायची. त्यावेळी असलेले भोजन निमित्त मात्र. खरं पोट तर एकमेकांच्या सहवासानेच भरायचं. उत्सवातल्या पूजेच्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या महाआरतीचे कानात अखंड निनादणारे सूर आज पुन्हा एकदा ऐकू येत होते. आमच्या उत्सवाशी अनेक वर्ष जोडल्या गेलेल्या कानडे बंधूंसह अन्य आजी-माजी रहिवासी, गणेशभक्त त्यात भक्तिरसाने चिंब होत.
त्याच वेळी गणेशोत्सव मंडळात जिथपर्यंत कार्यरत होतो, तिथपर्यंत बक्षीस समारंभासाठी तासन् तास फेरफटका आणि ते बक्षीस घेऊन स्टेजवरुन खाली उतरताना लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे आमचं बक्षीस असे. कोविड काळाचा अपवाद वगळता अन्य सर्वच वर्षी हा उत्सव आम्ही प्रत्येक क्षण जगलोय. पूजेच्या साहित्याची तयारी, गणेशोत्सवाशी संबंधित कार्यक्रम आणि अन्य तपशिलांचा नोटीस बोर्ड, हे जसंच्या तसं लख्ख आठवतंय. त्याच वेळी स्टेजवर कार्यक्रमाव्यतिरिक्त रंगलेल्या असंख्य तास गप्पा, मंडपातल्या खुर्च्यांवर रंगलेला गप्पांचा फड, हे सारे क्षण मी जेव्हा घरची वाट धरत होतो, तेव्हा एकेक करुन मनाच्या कुपीतून अलगद दरवळत होते. भक्तिच्या सुगंधात आठवणींचा गंध विरघळून गेला होता. त्याच वेळी आम्हाला सोडून गेलेल्या काही मंडळींच्या आठवणींनी मन व्याकुळत होतं. चाळीतून टॉवरमध्ये जाऊ. चाळीच्या आठवणींचा टॉवर मनात कायम उभारत. अन् जितेंद्र यांच्यासारखा आपलेपणाचा भाव जपत, पाय जमिनीवर ठेवत. बाप्पांचे आशीर्वाद राहू देत. हीच सदिच्छा.