'ऑस्ट्रेलियन ओपन'वर आशियाई ठसा
नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी केवळ दुसरी आशियाई टेनिसपटू आहे. याआधी चीनच्या ली नानं 2014 साली ऑस्ट्रेलियन ओपनच्याच विजेतेपदाचा मान मिळवला होता. तसेच अमेरिकन ओपनपाठोपाठ ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकणारी ती सेरेनानंतरची दुसरी महिला टेनिसपटू ठरली. सेरेनानं 2003-04, 2008-09 आणि 2014-15 साली अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.
मुंबई : जपानच्या नाओमी ओसाकानं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. तिचं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे पहिलंच तर कारकीर्दीतलं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनावर विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणारी ओसाका ही ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी केवळ दुसरीच आशियाई टेनिसपटू ठरली.
ओसाकासमोर कारकीर्दीतल्या दुसऱ्याच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये वयानं आणि अनुभवानंही थोर असलेल्या पेट्रा क्वितोव्हाचं आव्हान होतं. पण ओसाकानं झुंजार खेळ करून क्वितोव्हावर 7-6, 5-7, 6-4 अशी मात केली. या विजयासह ओसाकानं जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’वरही झेप घेतली.
नाओमी ओसाकाचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. ओसाकानं अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात साक्षात सेरेना विल्यम्सला पराभवाची धूळ चारून पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत ओसाकानं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला.
नाओमीच्या या यशासमोर पेट्रा क्वितोव्हाची कामगिरी झाकोळून जाणारी असली, तरी तिच्या कामगिरीला कमी लेखता येणार नाही. क्वितोव्हानं 2011 आणि 2014 साली विम्बल्डन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. पण 2016 साली क्वितोव्हावर एका माथेफिरुनं केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ती गंभीररित्या जायबंदी झाली होती.
त्यानंतर क्वितोव्हा पुन्हा टेनिसकोर्टवर उतरू शकेल का, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीचा जिद्दीनं सामना करुन क्वितोव्हानं आपला दबदबा पुन्हा निर्माण केला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदासाठी नाओमी ओसाकाला शाबासकी देताना उपविजेत्या पेट्रा क्वितोव्हाच्या कामगिरीचंही कौतुकं करावंच लागेल.