BLOG | घोलकर जहर खुद ही हवाओं में !
सध्याची परिस्थिती पाहता एक प्रसिद्ध शेर आठवतो. तो म्हणजे, घोलकर जहर खुद ही हवाओं में, हर शख्स मुंह छुपाए घूम रहा है. कोरोनाच्या विषाणूचा हवेतून प्रसार होतो, अशी माहिती नुकतीच वैद्यकशास्त्रात सर्वात प्रतिष्ठेचे मानलं जाणाऱ्या लॅन्सेट जरनल ज्या ठिकाणी वैद्यकीय शाखेतील शोधनिबंध, संशोधन प्रसिद्ध होत असते त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. कॅनडा, अमेरिका आणि यू के या देशांमधील आरोग्य तज्ञांनी हे निरीक्षण नोंदविले आहे. या अशाच प्रकारचा दावा यापूर्वी गेल्या वर्षी जुलै महिन्यातही करण्यात आला होता. त्यावेळी जगभरातील 32 देशातील 239 वैज्ञानिकांनी याबाबतचे पुरावे जागतिक आरोग्य परिषदेकडे दिल्यानंतर या विषयवार चर्चा सुरु झाली. मात्र त्याचवेळी जागतिक परिषदेच्या सदस्यांनी याबाबतीतील काही पुरावे पुढे येत आहे मात्र ते अजूनही ठोस आहेतच असे नाही, असेही स्पष्ट केले होते. आता परत अशा पद्धतीचे विषाणू हवेतून पसरत असल्याचे पुरावे या जरनल मध्ये करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होऊ शकते. वैद्यकीय तज्ञांनी मात्र नागरिकांनी याचा कोणताही चुकीचा अर्थ न काढता घाबरण्याची गरज नाही मात्र कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित वावर ठेवण्यावर भर दिला पाहिजे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसापासून सांगण्यात येत असलेला एक नियम म्हणजे नाका-तोंडावर ' मास्क ' व्यवस्थित लावणे. त्याचबरोबर, या कोरोनाच्या काळात अनेक संशोधन होत असतात. यामुळे सध्याची हवा दूषित झाली आहे असे मानण्याचे काहीच कारण नाही.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोरोनाचा प्रसार हवेतून होतो की नाही, यावरुन गदारोळ झाला होता. त्यावेळी, जागतिक आरोग्य परिषदेच्या, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या बेनेडेत्ता अल्लेग्रंझी यांनी सांगितले की होते काही तज्ञ कोरोनाचा प्रसार कशाप्रकारे होऊ शकतो त्यावर चर्चा करत असताना नाका, तोंडातून पडणाऱ्या द्रव्याचा आकार या मुद्द्याला घेऊन चर्चा करत आहेत. त्यांच्या मते हा आजार हवेतून प्रसारित होऊ शकतो, असे काही पुरावे पुरावे पुढे येत आहे मात्र ते अजूनही ठोस आहेतच असे नाही. त्याशिवाय याचा प्रसार सार्वजनिक स्थळी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वातावरणात म्हणजे गर्दीचे ठिकाण, हवा खेळती नसणारा परिसर, कोंदट-बंद असा परिसरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक पुरावे अजून गोळा करण्यात येतील आणि त्यावर चर्चा करण्यात येईल असे सूचित केले होते. याकरता उपाय म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, घरात आणि कार्यालयही वातावरणात पुरेशी हवा खेळती राहण्याकरिता व्यवस्था असणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आणि तोंडावर मास्क लावणे.
ज्या पद्धतीने जागतिक आरोग्य परिषद, जे उपाय सुचवीत आहे ते अगोदरपासूच आपल्या देशात, राज्यात, शहरात आणि सर्वच जिल्ह्यात अवलंबिले जात आहे. आता काही लोक नियम पाळत नाही हा मुद्दा वेगळा आहे. या जागतिक आरोग्य परिषदेतील दाव्यांवर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. कारण नाका-तोंडातून बाहेर पडणाऱ्या द्रव्याचा आकार मोठा असेल तर खाली जमिनीवर पडतील हे सगळ्यांनाच माहित आहे. पण जे द्रव्याचे बारीक कण जे सामान्यपणे डोळ्याला दिसत नाहीत, ते हवेत किती काळ तरंगत राहून ते किती दूरवर जाऊ शकतात याचा अभ्यास विस्तृत होणे गरजेचे आहे. जर असा अभ्यास पुढे आल्यास त्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक सूचना नागरिकांना देणे शक्य होईल.
कोरोनाचा प्रसार हवेतून होतो की पाण्यातून यावर चर्चा करण्यापेक्षा सुरक्षित कसे राहता येईल याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. 45 वर्षावरील सर्व व्यक्तींनी तात्काळ लस घेतली पाहिजे, म्हणजे ते या आजारापासून सुरक्षित राहतील. तरुणांनी सुद्धा जर काम निमित्त बाहेर जावे लागत असेल तर सुरक्षिततेचे सर्व नियम व्यवस्थित पाळले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे घरातील वयस्कर नागरिक आणि लहान मुलांना या आजराचा संसर्ग होऊ शकतो. केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला या संशोधनाबद्दल काही गंभीर वाटले तर नक्कीच ते त्या अनुषंगाने देशातील, राज्यातील नागरिकांना सूचना देतील. देशात आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत अशा माहितीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरू शकते, काही नागरिक विनाकारण ती एकाच गोष्ट मनात घेऊन अस्वस्थ होऊ शकतात. आपल्याकडे काही समाजकंटक या शास्त्रीय माहितीची तोडमोड करून समाज माध्यमांवर चुकीची माहिती पसरवू शकतात. त्यामुळे अशा या मेसेज पासून दूर राहिले पाहिजे.
मुंबईच्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ समीर गर्दे सांगतात कि," गेल्या वर्षी मी जे सांगितले होते तेच पुन्हा सांगेन की, हा कोणता नवीन शोध आहे. जिवाणू आणि विषाणू हवेतून तर प्रवास करून इतरांना बाधित करतात. हे वर्षानुवर्षे चालत आलाय, असा काही शोध आहे की पूर्वी सहा फुटावरचा विषाणू, आता 30-40 फूट प्रवास करून लोकांना बाधित करणार आहे का? मला खरंच कळत नाही ही जुनी अशी माहिती नव्याने का सादर केली जाते. पूर्वापार लोकांना ही माहिती आहे, म्ह्णून तर आपल्याकडे खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा असे लहानपणापासून सांगण्यात येते. लोकं काही तुमच्या तोंडावर येऊन शिंकत किंवा खोकत नाही, काही अपवाद आहेच यामध्ये पण त्यामुळेच आपण कुणी खोकले-शिंकले की सावधान होतो, आणि काही वेळा आपला रुमाल आपण तोंडावर लावतो. नाका-तोंडातून पडणारे द्रव जड असतील तर ते खाली पडतात आणि मग त्या पृष्ठभागाला हात लागला आणि तोच पुन्हा आपल्या चेहऱ्याला लागला की आपण बाधित होतो आणि हलके असतील तर काही वेळ हवेत तरंगतील. मला तरी वाटते यामध्ये कोणतीही नवीन माहिती नाही. लोकांनी आता घरात बसून पण मास्क लावायचं बाकी राहिलं आहे."
जुलै 9 2020 ला ' काय डेंजर 'हवा' सुटलीय ? ' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात, कोरोना अजून त्याची कोणती रुपं दाखवणार आहे याबाबत विविध तर्क लढविण्यापलीकडे सध्या काहीच दिसत नाहीये. जो पर्यंत एखादी गोष्ट शास्त्रीय आधारावर सिद्ध होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याला मान्यता देत नाही हे सर्वश्रुत आहे. जागतिक आरोग्य परिषदेने (डब्लू एच ओ) कोरोनाचे विषाणू हवेतून पसरू शकतात याची शक्यता वर्तविली आहे. या घटनेला तात्काळ प्रतिसाद म्हणून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली जोडीला जगभरातील खरी-खोटी माहिती देणारं व्हाट्स ऍप होतंच. जगभरातील 32 देशातील 239 वैज्ञानिकांनी याबाबतचे पुरावे जागतिक आरोग्य परिषदेकडे दिल्यानंतर या विषयवार चर्चा सुरु झाली. मात्र त्याचवेळी जागतिक परिषदेच्या सदस्यांनी याबाबतीतील काही पुरावे पुढे येत आहे मात्र ते अजूनही ठोस आहेतच असे नाही, असेही स्पष्ट केले आहे. असा तपशीलवार या विषयाचं समालोचन करण्यात आलं होतं.
देशावर कोरोनाचे जे संकट आले आहे, त्यामध्ये महाराष्ट्र खूप प्रभावित झाला आहे. मोठ्या प्रमाणात राज्यात संसर्गाचा फैलाव झाला असून रुग्णाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याचवेळी रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपचार दिले जात आहेत. मात्र तरीही काही गोष्टीची टंचाई भासत आहे, त्यात प्रामुख्याने ऑक्सिजनचा आणि रेमेडीसीवर औषधांचा तुटवडा भासत आहे. राज्य सरकार सातत्याने केंद्राकडून या गोष्टीची मागणी करत आहे. राज्यात आरोग्याच्या दृष्टीने खूप परिस्थिती भयावह झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु आहे, काही गोष्टींना यामधून सूट दिली आहे. याचा नागरिक गैरफायदा उचलत आहेत. लॉकडाऊनच्या नियमाचा फज्जा उडविला जात आहे. यावरून लोकांना या आजाराचे किती गांभीर्य आहे हे दिसून येते. विनाकारण काही लोक आजही शहरात प्रवास करीत आहे त्यामुळे रस्त्यांवर गाड्याची गर्दी दिसत आहे. प्रत्येक वेळी पोलीसांनी कारवाई आणि दंडुकेच हाणले पाहिजे असा काही नियम आहे का? नागरिक म्हणून काही कर्तव्य म्हणून आहे की नाही. त्यात अशा या वातावरणात जर अशा काही संशोधनाच्या बातम्या आल्या तर नागरिक त्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात तसे न करता लोकांनी काळजी घेतली पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याचे योग्य पालन केल्यास ' हवेतील' काय कुठलाच विषाणू तुम्हाला बाधित करू शकणार नाही.