फिजिओथेरपी ही विना औषध आणि विना इंजेक्शन अशी उपचार पद्धती आहे. विविध शास्त्रीय व्यायाम पद्धती आणि मशीनच्या साहाय्याने रुग्णाच्या मांसपेशी मजबूत करून रुग्णांना बरे केले जाते. अस्थिरोग आणि फिजिओथेरपीचा संबंध सर्वसामान्यपणे लोकांना माहित आहे. मात्र त्यापेक्षा पुढे जाऊन ही उपचार पद्धती विविध रुग्णांसाठी काम करत असते. सर्वसामान्यांच्या मते फिजिओथेरपी फक्त व्यायाम करून घेतात असा गैरसमज आहे, अनेक अस्थिरोगांचे रुग्ण केवळ योग्य फिजिओथेरपी उपचाराने बरे झाल्याची अनके उदाहरणे आहेत. सध्या कोरोनाच्या काळात या फिजिओथेरपी उपचारांचा अतिदक्षता विभागातील रुग्णांना फार मोठा फायदा होत आहे. अनेक रुग्ण व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लावल्याने झोपून असतात त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी शरीर कुमकुवत झालेले असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना फिजिओथेरपी उपचार घेण्यास सांगितले जाते. या उपचार पद्धतीमुळे रुग्ण हालचाल करून शकतो, बसू शकतो, जे काही डॉक्टरांनी उपचार दिलेले आहेत, त्या उपचारांना फिजिओथेरपी दिल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळतो.
परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे, अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख सांगतात की, "कोविड -19 बाधित रुग्ण बरा करण्याकरिता विविध विषयातील तज्ञ डॉक्टरांची टीम एकत्र येऊन रुग्णाला उपचार देत असते. प्रत्येक जण आपआपल्या विषयातील तज्ञ आहे, तो त्याप्रमाणे उपचार देत असतो. आमच्या रुग्णालयात आम्ही पहिले आहे की विशेष करून जे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत त्यांना फिजिओथेरपीची गरज भासते. चेस्ट फिजिओथेरपी उपचार पद्धतीत रुग्णांच्या श्वसनाचा मार्ग व्यवस्थित केला जातो. रुग्ण झोपून असल्यावर त्याच्या शरीरातील प्राणवायूची पातळी आणि रुग्ण चालू फिरू लागल्यावर त्याच्या शरीरातील प्राणवायूच्या पातळीत फरक असतो. फिजिओथेरपीच्या योग्य उपचारपद्धतीने ही प्राणवायूची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शिवाय अनेक वेळ केवळ झोपून राहिल्यामुळे अशा रुग्णांमध्ये रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी (डीप वेन थ्राम्बोइसिस) होण्याचा धोका असतो त्यावेळी फिजिओथेरपी उपचाराने यावर मात करता येते. यामध्ये कोणत्याही औषधाचा वापर नसला तरी शास्त्रीय व्यायाम पद्धतीने रुग्ण बरे होण्यास याचा चांगला फायदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे."
यासंदर्भात महाराष्ट्र व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुदीप काळे सांगतात की, " कोरोना मुख्यत्वे श्वसन प्रणाली वर आघात करत असल्याने अशा रुग्णांमध्ये फिजिओथेरपीचे महत्व वाढत आहे. एआरडीएस (श्वसन संस्थेशी निगडित आजार) न्यूमोनिया या आजारामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते, असे रुग्ण काही वेळा अतिदक्षता विभागात दाखल होतात. या अशा रुग्णांमध्ये आढळणाऱ्या गंभीर लक्षणांमध्ये फिजिओथेरपीची मदत होत असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध होत आहे. रुग्णांची श्वसननलिका खुली ठेवणे, त्यातील बेडके, स्त्राव बाहेर काढणे व रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे हे फिजिओथेरपीस्टच्या कामाचे मुख्य स्वरूप आहे."
ते पुढे असेही सांगतात की, चेस्ट (छाती) फिजिओथेरपीमुळे व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णांचा कालावधी कमी करण्यात मदत होते व त्यातून रुग्ण लवकर बाहेर येतो. शिवाय त्याचे बरे होण्याचे प्रमाण वाढते . तसेच त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठीही मदत होते. फिजिओथेरपिस्ट श्वसनाचे व्यायाम, चेस्ट फिजिओथेरपीच्या विविध उपचाराने रुग्णाची श्वसन क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतात. राज्यातील रुग्ण संख्या व उपलब्ध खाटांची संख्या पाहता रुग्ण लवकर बरे होणे गरजेचे असल्याने शासनाने, जंबो कोविड (फिल्ड हॉस्पिटल ) रुग्णलयात फिजिओथेरपिस्ट यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय उपचार भौतिकोपचार परिषदेने ही त्याबाबत मार्गदर्शन सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत.
प्रत्येक वैद्यकीय शाखा ही वेगळी असते, जो तो आपल्या शाखेत पारंगत असतो. त्यामुळे फिजिओथेरपिस्टच योग्य शास्त्रीय व्यायामाच्या सूचना व्यस्थित देऊ शकतो. चुकीच्या व्यायाम प्रक्रियेमुळे शाररिक त्रास होऊ शकतो. कोरोनाच्या या युद्धात मात देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्व प्रयत्न करीत आहे. सर्व प्रकारच्या मान्यता प्राप्त उपचार पद्धतीचा अवलंब करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
औरंगाबाद एमजीएम रुग्णालय इंटेसिव्हिस्ट डॉ. आनंद निकाळजे यांनी सांगितलं की, "मुळात कोरोनाच्या रुग्णांमध्ये श्वसनाचे विकारात हे जास्त पद्धतीने दिसत आहे. अशा रुग्णांना कृत्रिम श्वासोश्वास यंत्राद्वारे त्यांना प्राणवायू देण्याची गरज भासत असते. त्यावेळी या रुग्णांना फिजिओथेरपी उपचारपद्धतीच्या साहाय्याने उजव्या कुशीवर कधी डाव्या कुशीवर तर कधी पोटावर काही तास झोपण्यास सांगितल्यावर अनेक वेळा रुग्णाची प्राणवायू पातळी सुधारण्यास मदत होते. फिजिओथेरपीच्या मदतीने फुफुसाचे व्यायाम रुग्णाकडून करून घेतले जातात. यामुळे श्वास घेण्याचा मार्ग सुरळीत होण्यास मदत होते. शिवाय रुग्णांची हालचाल होणे हे फार गरजेचे असते आणि त्यामध्ये फिजिओथेरपीचे चांगलेच योगदान आहे असे म्हणावे लागेल. आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा फिजिओथेरपी उपचार कोविड-19 च्या रुग्णांना देत असतो. रुग्ण एकदा उपचार घेऊन चालू फिरू लागला की त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो, ते देण्याचं बळ हे फिजिओथेरपिस्ट करत असतो." असे डॉ. आनंद निकाळजे सांगतात.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !