संपूर्ण देशात सगळ्याच स्तरावर 'सुजलाम सुफलाम' असणाऱ्या महाराष्ट्राची ओळख या कोरोनामय काळात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचे राज्य अशी झाली आहे. ज्या चीन देशातून या कोरोना विषाणूची सुरुवात झाली. त्या देशाची रुग्णसंख्या सध्याच्या घडीला 83,075 इतकी आहे आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या वर गेला आहे. आपल्या राज्यातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही ठिकाणी आरोग्य व्यवस्थेतील काही जणांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाबाधित रुग्णाचे विचित्र कारणामुळे मृत्यू होत आहे, यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य व्यवस्थापनात असलेल्या त्रुटी तात्काळ दूर करून अचूक पद्धतीची तक्रार निवारण व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. आरोग्याच्या प्रश्नाने ग्रासलेल्या नागरिकांचा व्यवस्थेशी केवळ संवाद होत नसल्याने अनेक तक्रारींचा डोंगर उभा राहत असल्याचे चित्र आज राज्यात आणि शहरात दिसत आहे.


शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एकंदरच या आजाराच्या बाबतीत रुग्णांच्या हेळसांड प्रकरणी राज्यांवर ताशेरे ओढले आहेत. कोरोनाने नागरिकांमध्ये इतकी दहशत परसरवून ठेवली आहे की सध्या जर कुणाच्या घरी कुणी आजारी पडलं तर त्या घरातील कुटुंबाची होणारी परिस्थिती खूपच केविलवाणी होते. खरं तर महाराष्ट्राने नागरिकांना दिलासा मिळतील असे काही निर्णय घेतले. त्यानुसार बहुतांश नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि त्यात खासगी रुग्णालयाचे महागडे उपचार या दोन समस्यांचं निराकारण करण्याकरिता रामबाण उपाय म्हणून, मुंबईतील खासगी रुग्णालयाच्या शुल्कावर चाप त्याबरोबर या रुग्णालयातील 80% खाटा सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतचं महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयात कोरोनाबाधितांवर मोफत उपचार देण्याचे याअगोदरच जाहीर केले आहे. मात्र, यांची अंमलबाजवणी व्यवस्थित होत नसल्याने यावर देखरेख करण्याकरिता पाच सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह (16.18 टक्के) आले आहेत. राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. राज्यात 5 लाख 79 हजार 569 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1553 संस्थात्मक क्वॉरंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 67 खाटा उपलब्ध असून सध्या 28 हजार 200 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.3 टक्के एवढे आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.7 टक्के इतका आहे. शुक्रवारी 1718 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47 हजार 796 झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या 3493 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 49 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


लॉकडाऊन मधील शिथीलतेमुळे अनके लोक अनाठायी कारण नसताना रस्त्यावर फिरत असल्याचं आपण सगळ्यांनीच बघितलं आहे. कोरोनाचा धोका आजही राज्याला आणि शहराला कायम असून सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर अपेक्षित आहे. वैद्यकीय तज्ञाच्या मते काही ठराविक लोकांच्या चुकीमुळे सगळेच अडचणीत येऊ शकतात. संसर्गजन्य आजारात, सामाजिक अंतराचं पालन आणि तोंडावर मास्क लावणे हा प्रतिबंधात्मक उपाय आहे याचे पालन काटेकोरपणे होणे अपेक्षित आहे. अनेकवेळा नागरिक आपल्या अधिकाराविषयी चांगले सजग असतात. मात्र, कर्तव्ये सोयीस्कररित्या विसरून जातात. आजही अनेकजण सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसून मोकाट भटकत आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, ज्याप्रमाणे शासन त्या अवघड परिस्थितीला प्रतिसाद देत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीही आपल्या आचरणात बदल करण्याची गरज आहे.


कोरोनाला महाराष्ट्रात शिरकाव करुन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असला तरीही नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. रुग्णांना बेड मिळत नाही, अनेकांना फिल्ड हॉस्पिटल मध्ये जाण्यास भीती वाटते. कारण तिकडे आपल्याला चांगल्या सुविधा मिळतील की नाही याबाबत त्यांना शाश्वती नसते. नागरिकांमध्ये तो विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. ब्रिटीशकालीन महापालिका रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त ताण पडत आहे, त्यात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत. आजही कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असून, हा प्रश्न सुटल्यास कमीत कमी दाखल रुग्णांच्या तक्रारी कमी होतील. कोरोना हा आजार सगळ्यासाठी नवीन, त्यामुळे नवनवीन आव्हाने येणार हे साहजिकच आहे. मात्र, त्याच-त्याच सारख्या आव्हानासाठी दरवेळी नागरिकांना संघर्ष करावं लागणं वाईट आहे.


खरं तर वैद्यकीय उपचारांसाठी अख्या देशातून लोकं महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि पुणे या दोन शहरात येत असतात. मात्र, आज या दोन शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे किंबहुना मुंबईच्या आरोग्याकडे लक्ष लागले आहे. प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्रीय स्तरावरुन काही अधिकारी मदतीकरीता मुंबईमध्ये येणार आहेत. सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राकडे तसं कुशल मनुष्यबळ जास्त. मात्र, या अनपेक्षित रुग्णवाढीमुळे ते मनुष्यबळ आपणास कमी पडू लागलं आहे. या सगळ्या रुग्णवाढीमुळे आरोग्यदायी महाराष्ट्र 'आजारी' पडता कामा नये आणि हे होऊ द्यायचं नसेल तर योग्य नियोजनाचा 'डोस' देऊन महाराष्ट्र पुन्हा तरतरीत करण्याची गरज आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग