मार्च महिन्यात आपल्या राज्यात कोरोनाचे आगमन झाले आणि एकच धावपळ सुरु झाली, काही नागरिक खरोखर आजारी म्हणून तर काहीजण भीती पोटी डॉक्टरांना भेटू लागले. काही क्लिनीकमध्ये तर काही थेट रुग्णालयांमध्ये जाऊन भरती होऊ लागले. या सगळ्या भयावह परिस्थितीत 'डॉक्टर जणू देव वाटू लागला' त्याच डॉक्टरांना नंतरच्या कालावधीत काही जणांनी अपशब्द वापले हा भाग वेगळा. तर हे सांगण्यामागे हेतू असा, हे डॉक्टर जेव्हा डॉक्टर्स बनण्याच्या प्रक्रियेत होते त्यावेळी ते नागरिकांना त्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपचार करीत होते. त्यामध्ये होते ते प्रामुख्याने इंटर्न्स आणि रेसिडेंट डॉक्टर. जी काही राज्यात मोठी शासकीय आणि महापालिकेची रुग्णालये आहेत. त्याचा कणा हा रेसिडेंट डॉक्टर्सचं असतो. या काळात कोरोनाचं काम करताना शेवटच्या वर्षाला असणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या परीक्षेसाठी फारशी तयारी करता आली नाही. त्याची ही अडचण लक्षात घेऊन, शासनाने पदव्युत्तर परीक्षासहित इतर पदवीपूर्व परीक्षा पुढे ढकलल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस आधी जाहीर करणार असून पूर्वीप्रमाणेच दोन पेपरमध्ये एक दिवस अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ह्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलास मिळाला आहे.


वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्वे तसेच सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर त्यांना परीक्षा देता येईल. विद्यार्थी पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. याउपरही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षा याबाबत ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. डॉक्टर होऊ घातलेल्या या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे खरंच आभार. इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये तशी तफावत आहेच, यामुळे इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा कमी तुलनेच्या असं अजिबात नाही.


या सगळ्या परीक्षांमध्ये महत्वाची परीक्षा म्हणजे पदव्युत्तर विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा ती खरी एप्रिल-मे कलावधीतच असते. मात्र, नेमक या अगोदरच कोरोनाने राज्यात थैमान घातले होते. सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी कोविड ड्युटीला जुंपले गेले होते. अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या आधी अभ्यासासाठी विद्यार्थी काही दिवस अगोदर सुट्टी घेऊन अभ्यास करत असतात मात्र यावेळी असं काही त्यांच्या वाट्याला आलं नाही. त्याचप्रमाणे या काळात परीक्षा घेणे पण शक्य नव्हते. मात्र, त्यांच्या परीक्षा जुलैमध्ये घेणार अशी कुणकुण त्यांना लागली होती. रेसिडेंट डॉक्टरांची संघटना असणाऱ्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) या संस्थेने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना परीक्षा पुढे ढकलून किमान 45 दिवसांचा अवधी द्यावा अशी मागणी केली होती. अखेर शासने या मागणीचा सारासार विचार करून विद्यार्थ्यंनाच्या बाजूने निर्णय घेतला.


27 मार्चला 'निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स आरोग्य व्यवस्थेचा कणा' या विषयवार सविस्तर लिखाण केले होते, यामध्ये या डॉक्टरचं महत्व अधोरेखित करण्यात आले होते.


रेसिडेंट डॉक्टरांची रुग्णालयातील मेहनत कुणीही नाकारू शकत नाही, वेळप्रसंगी कुठलाही मोठा अपघात, अतिरेकी हल्ला, नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या आजाराची साथ या काळात जे रुग्ण रुग्णालयात भरती होतात तेव्हा ते दिवस-रात्र काम करत असतात. त्यांच्यासोबत इंटर्न्सही असतात. परंतु, त्यांना तसं रुग्णांना उपचार देण्यावर मर्यादा येतात. शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णाचा पहिला मुकाबला हा निवासी डॉक्टर्स करत असतो, प्रथम तो जे आवश्यक आहे असे उपचार करून वेळप्रसंगी गरज पडल्यास वरिष्ठांकडे तो रुग्ण पाठवत असतो. राज्यात आजच्या घडीला सुमारे 5,500 हजार निवासी डॉक्टर्स आहेत, तर 4000 हजार इंटर्नस आहेत. आपल्या राज्यात आजही निवासी डॉक्टर्सने अमुक इतका वेळ काम केले पाहिजे असे ठरलेले नाही. आपल्याकडे हे डॉक्टर्स आपत्कालीन स्थितीत 24-48 तास सलग काम करतात. त्याचप्रमाणे इतर दिवशीही ते 24 तास काम करत असतात. प्रत्येक निवासी डॉक्टर्सच्या शाखेवर त्यांच्या कामाचा ताण आणि कामाचे तास हे ठरत असतात.


याप्रकरणी डॉ. राहुल वाघ, अध्यक्ष, मार्ड, महाराष्ट्र, सांगतात की, "आतापर्यंत कुठल्याही डॉक्टर्सने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. आमचे डॉक्टर्स 24 तास रुग्णांना सेवा देत आहे. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा म्हणजे नाही म्हटलं तरी अभ्यासाचा ताण हा असतोच. या कोरोनाकाळात सर्वच डॉक्टर कोविड ड्युटी करत होते. त्यामुळे त्यांना अभ्यासाकरिता पुरेसा अवधी मिळावा ही विनंती आम्ही मंत्र्यांना केली होती. त्यांनी आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे सर्व डॉक्टरांच्या वतीने आभारी आहोत."


डॉक्टरच्या बाजूने सरकार उभं राहतंय त्यांची काळजी घेतंय खरोखर ही चांगली बाब आहे. आज पूर्ण आरोग्य व्यवस्था त्यांच्या जीवावर आहे. या विद्यार्थी दशेतील डॉक्टरांनी आणि सर्वच समाजातील डॉक्टरांनी या कोरोनामय काळात खूप चांगलं काम केलंय. फार कमी डॉक्टर आहेत. ज्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, बाकी इतर सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी मेहनत करुन अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. आपल्याला सगळ्यानांच माहीत आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर्सनी सामाजिक माध्यमांवर एक कॅम्पेन चालवलं होत, ते सांगतात आम्ही आपल्यासाठी रुग्णालयात आहोत, तुम्ही आमच्यासाठी घरीच थांबा. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचविणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कामांकरीता सलाम, म्हणूनच आपण सगळ्यानी एकदा तरी म्हटलं पाहिजे डॉक्टरांच्या नावाने चांगभलं.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग