राज्यात काही भागात पुन्हा एकदा बेड्सची टंचाई जाणवू लागली आहे. कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा पाहून सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरायला सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नागरिक जमेल त्या पद्धतीने आरोग्य यंत्रणाना संपर्क करून उपचार घेऊन घरी जात होते, कोरोबाधितांच्या वाढत्या आकड्यांवर कुणीचं फारसं बोलताना दिसत नव्हतं. मात्र आता परिस्थिती निराळी असून विशेष करून पुण्यासारख्या शहरात बेड्सची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे मध्यंतरी कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या आरोग्य विभागाला बंद केलेलं जंबो कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्याची वेळ आली आहे. यावरून पुणे शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क राहण्याची गरज असून सुरक्षिततेचे जे नियम आखून दिले आहेत ते कटाक्षाने पाळणे गरजेचं आहे. त्याशिवाय आजही पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या उपचारासाठी राज्यात सर्वाधिक ऑक्सिजनचा वापर अधिक होत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे साहजिकच आधीच्या तुलनेने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी मागणी पुणे जिल्ह्याकडून होत आहे. विशेष म्हणजे सध्या तरी राज्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. 


कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे राज्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढीव रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात लक्षणविरहित नागरिकांच्या चाचण्या या सकारात्मक येत आहेत. त्यामुळे काही जण घरातच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. मात्र काही ठिकाणी नागरिकांना लक्षणे दिसत आहेत त्यांना रुग्णालय शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 


रुग्णालयात गंभीर लक्षणे घेऊन दाखल झालेल्या  बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो.  त्यामुळे  त्याची कार्यक्षमता मंदावते, आणि श्वास घ्यायला त्रास होतो.  त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते, तेव्हा तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो.  वैद्यकीय तज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोरोनाचे उपचार करणाऱ्या रुग्णालयातील ऑक्सिजन वापरा संदर्भातील दैनंदिन तपशील जाहीर करत असते. त्याप्रमाणे राज्यात कोरोनाबाधितांवर उपचार करणारी 1 हजार 64 रुग्णालये आहेत. ही हॉस्पिटल्स उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. त्यानुसार सोमवारी  500.65 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन रुग्णांसाठी दिवसभरात वापरला गेला. त्यासाठी 496.49 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. सध्या तरी मागणी पेक्षा पुरवठा चांगला आहे. सध्या 2732.08 मेट्रिक टन स्टॉक शिल्लक आहे.


सोमवारी अन्न औषध प्रशासन विभागाचा कोरोनाच्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन ऑक्सिजनचा अहवाल पहिला तर सर्वात जास्त पुणे जिल्ह्यात प्राणवायूचा  162.35 मेट्रिक टन वापर होत असून त्या खालोखाल नागपुरात प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे 81.06 मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांकरिता एक दिवसात वापरला जात आहे.  एकेकाळी  कोरोनाचा 'हॉटस्पॉट' असणाऱ्या  मुंबई विभागाला ऑक्सिजन वापराच्या बाबतीत मात्र पुणे आणि नागपूर विभागाने मागे टाकले आहे. या दोन विभागाचा प्राणवायूचा वापर संपूर्ण राज्यात एकूण वापरण्यात येणाऱ्या प्राणवायू वापरच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे. मुंबई शहरात दिवसाला सध्या 63.35 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरला जात आहे. नाशिक जिल्ह्यात हीच मागणी 73.91  मेट्रिक टन इतकी आहे. सगळ्यात कमी मागणी सध्याच्या घडीला अमरावती जिल्ह्यात असून त्यांना दिवसाला 16.82 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे.     


पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात श्वसनविकार तज्ञ डॉ विशाल मोरे सांगतात की, "बेड्सची टंचाई गेल्या आठवड्यापासून जाणवत आहे. विशेष म्हणजे सगळ्यात सध्या जास्त गरज आहे ती ऑक्सिजन बेडची ती मिळवताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. काही वेळापूर्वीच आमच्या ओळखीच्या महिला डॉक्टर आहेत त्यांना ऑक्सिजन बेडची गरज होती तो मिळविण्याकरिता धावपळ करावी लागली. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बऱ्याच छोट्या नर्सिंग होमला कोव्हिडचे उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावरून सध्या पुण्यात काय वातावरण असेल याचा अंदाज येईल. विशेष म्हणजे पुण्यात ऑक्सिजनचा वापरही मोठ्या प्रमाणत होत आहे कारण फक्त पुण्यातच नाही तर जवळपासच्या परिसरातून रुग्ण उपचारासाठी पुण्यात येत असतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची  काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे, अन्यथा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. लॉकडाऊन कुणालाच नको आहे, मात्र नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून  सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले पाहिजे."       


गेल्यावर्षी ज्यावेळी राज्यात रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोठ्या  प्रमाणात गरज  होती त्यावेळी राज्य शासनाने साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% आणि उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील असे त्यावेळी सुचविण्यात आले होते. मात्र रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज पाहता तो वाढविला असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50% या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. हे केल्यानंतर लक्षात आले प्राणवायूची ज्या वाहनाने वाहतूक करतात त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो, परिणामी प्राणवायू वेळेवर रुग्णालयांना पोहचत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनातर्फे  रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे या वाहनाची वाहतूक कोंडी मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही म्हणून या वाहनांवर सायरन आणि रुग्णवाहिकेला वापरली जाणारी बत्ती लावण्यास अनुमतीही दिली होती.    


औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयातील कोविड युनिट प्रमुख आणि इंटेसिव्हिस्ट डॉ आनंद निकाळजे सांगतात की, "साधे बेड्स असून चालणार नाही कारण मोठ्या प्रमाणात आय सी यु बेड्स आणि ऑक्सिजनची बेड्सची मागणी औरंगाबाद शहरात होत आहे. कारण दुसरे काही नागरिक केवळ घाबरलेत रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आला म्हणून हॉस्पिटल कडे धाव  घेताना दिसत आहेत, मात्र त्यांना फारशी लक्षणे नाहीत ते बेड्स अडवून आहेत त्यामुळे खरंच जे गरजू रुग्ण आहेत त्यांना बेड मिळण्यासाठी त्रास सहन  करावा लागत आहे. जे लक्षणविरहित रुग्ण आहेत त्यांनी घरी अलगीकरण करून त्याच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहून उपचार घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर असणारे आणि ऑक्सिजन बेड्स तात्काळ वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षित नर्स, टेक्निशियन, वॉर्ड बॉय अशा  कुशल मनुष्यबळाची या शहरात गरज आहे.  जर कोरोनाबाधितांची संख्या जर अशीच वाढत राहिली तर परिस्थिती बिकट होऊ शकते."    


सप्टेंबर महिन्यात गेल्यावर्षी अशाच पद्धतीने राज्यात बेड टंचाई आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, त्यासारखीच परिस्थिती सध्या राज्यात उद्भवतांना दिसत आहे यावरून आपल्या कोरोनाच्या सध्या परिस्थितीची दाहकता लक्षात येईल. राज्यातील वातावरण बिघडण्याच्या आत स्थानिक प्रशासनाने जी जंबो फॅसिलिटी बंद करण्यात आली आहेत ती पुन्हा सुरु करावी लागणार आहे. त्याचबरोबर पूर्वी  खासगी रुग्णालयातील जे 80 टक्के बेड्स हे कोरोनाच्या उपचारासाठी आरक्षित करून ठेवण्यात येत होते ते आता पुन्हा कोरोनाच्या वापरासाठी घ्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने परिस्थितीचा आढावा  घेऊन गरज पडल्यास तशा स्वरूपाच्या सूचना दिल्यास तर बेड्सच्या टंचाईचा प्रश्न उपस्थित होणार नाही.


संतोष आंधळे यांचे इतर ब्लॉग :