दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच संख्येने रुग्ण घरी बरे होऊन जात आहे, हे कानांना ऐकायला बरे वाटत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा इतके अमुक रुग्ण बरे होऊन घरी गेले पहिल्यांदा सांगत असतात मग बाकीची आकडेवारी, नागरिकांमध्ये भीती नको पसरायला हा उद्देश असावा. कोरोनाचा मोसम राज्यात सुरु झाल्यापासून मंगळवारी राज्यात एकाच दिवशी प्रथमच 515 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा उचांक ठरला असून परिस्थिती अधिक चिंताजनक झाल्याचे दिसत आहे. हा आकडा केवळ संसर्गजन्य आजाराने म्हणजेच कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आहे. इतर आजाराने होणाऱ्या मृत्यूंचा यामध्ये समावेश नाही. एका बाजूला शिथिलतेच्या नावाखाली मोकळीक मिळाल्यामुळे काही जण विनाकारण उंडरत आहेत तर काही चाकरीसाठी पर्याय नसल्यामुळे प्रवास करत आहे. ज्यापद्धतीने कोरोनाचे संक्रमण राज्यात वाढत आहे, त्यामुळे राज्यातील सर्वच नागरिकांनी आता 'पुन्हा सावधान' होऊन स्वतःचा वावर ठेवावा लागणार आहे. हा लेख भीती वाढविण्याच्या दृष्टीने नसून वास्तव माहिती असूनही कोरोनाबाबत फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्यांसाठी आहे.


अनेक जण जे सुरक्षिततेचे नियम पाळून कामासाठी बाहेर पडत आहेत, ते अक्षरशः भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. काही वाक्ये बोलायला खूप सोपी असतात कोरोनासोबत जगायचंय आणि त्याच प्रक्रियेत संसर्ग झाला तर काय? 'बेड शोधत हिंडायचं' प्रत्येक व्यक्तीकडे बेड शोधणारी माणसे असतातच असे नाही. कोरोनासोबत जगायचं असेल तर त्या पद्धतीने सुरक्षित वातावरण तयार करायला हवं. नागरिकांना आरोग्य शिक्षण द्यायला हवं. यामध्ये शासनाचा आणि प्रशासनच दोष नाही. कारण उद्योगधंद्यांसाठी थोड्याफार प्रमाणात मोकळीक जरुरी आहे, अर्थव्यवस्थेचं चक्र फिरणं काळाची गरज आहे. नागरिक स्वतःची काळजी कशी घेणार ? हा ही एक प्रश्न आहे. ज्या काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरु आहे त्यामध्ये हळूहळू गर्दी व्हायला लागली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एस टी आणि बसेस पुन्हा फुल होऊ लागल्या आहे. या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांनी जगायचं कसं ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तव तर बदलता येणार नाही, वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा थांबवणार कसा ? ह्या प्रश्नाने पूर्ण व्यवस्थेला जेरीस आणले आहे. प्रशासन व्यवस्था सर्व उपलब्ध आयुधे वापरून या आजाराशी जोरदार लढा देताना दिसत आहे, तरी आरोग्यच्या समस्यांचा डोंगर कमी व्हायचं नाव घेत नाही आहे.


सामाजिक माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरून सर्वंनाच कोरोनाचे रोज अपडेट मिळत आहे. माहिती मिळणे हा आता प्रश्न निकालात निघाला आहे. गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शहरातील, राज्यातील आणि देशपातळीवरची सर्वच माहिती नागरिकांकडे एका क्षणात पोहचत आहे. शेवटी त्यातील किती सत्य माहिती लोकांपुढे जाते हा ही एक मुद्दा अजून निकालात निघायचंय. काही वेळा सामाजिक माध्यमांद्वारे चुकीची माहिती जनमानसात पोहचते आणि अनाठायी भीतीचे वातावरण तयार होत असते, याला नागरिकच काही प्रमाणात जबाबदार असतात. एखादी नवीन माहिती आहे म्हणून 'फॉरवर्ड' करण्याच्या नादात त्याची सत्यात न तपासात तशीच पुढे ढकलून दिली जाते. मात्र अशा चुकीच्या माहितीच्या आधारवर नागरिक 'त्या' गोष्टीबद्दल आपलं मत तयार करून पूर्ण व्यवस्थेवबद्दलच गैरसमज निर्माण करून गोंधळ वाढवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आरोग्याची 'साक्षरता' यासाठी सरकारने विशेष असे प्रयत्न करण्याची हीच ती वेळ आहे. सध्या उपलब्ध असलेली उपचारपद्धती, कोणत्या रुग्णांनी कधी रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या आजाराबद्दल असणारे गैरसमज त्याबद्दल असणारी अस्पृश्यता याचे वेळीच खंडन करून त्यांचे प्रबोधन केले पाहिजे.


नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा पार केला असून मृतांचा आकडा 82 हजारांपेक्षा अधिक वाढला आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीत, आहे त्या साधनसामुग्रीत आरोग्य व्यवस्था काम करत आहे. मात्र रुग्णसंख्याच इतकी झपाट्याने वाढत आहे कि त्या व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. मुंबई स्थिरस्थावर होत होतीच तर या शहराची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरात तर कोरोनाने थैमान घातले आहे, काही ठिकणी रुग्णांना 'ऑक्सिजनची' टंचाई भेडसावत आहे. काही दिवसापासून मुंबई शहरातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या पुन्हा वाढीस लागली आहे. मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांनी पहिले तर जी काही तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालय जंबो कोविड फॅसिलिटी आहे त्या ठिकाणी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची मदत घेत आहे. अनेक वर्ष आरोग्य क्षेत्रात घालविलेल्या खासगी तज्ञ डॉक्टरांची फौज आता त्यांचे मत घेण्यासाठी तैनात केली आहे. कोणत्याही जंबो फॅसिलिटी मध्ये रुग्णांच्या उपचाराकरिता तज्ञ डॉक्टरांचे मत हवे असल्यास हे खासगी रुग्णालयातील डॉक्टर उपलब्ध असणार आहेत तशी महापालिकेतर्फे विनंती करण्यात आली आहे. शिवाय पूर्वी ज्या 73 नर्सिंग होम यांना कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेण्यास घेण्यास मनाई करण्यात आली होती. त्यापैकी 25 नर्सिंग होम यांना अटी शर्तीसह रुग्ण दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा सर्व रुग्णालयांना होईल याची दक्षता घेण्यात येत आहे. सर्व शक्य तितक्या उपाय योजना करण्याचे काम महापालिका करत आहे.


सध्या राज्यातील सर्व यंत्रणा कोरोनाच्या आजाराच्या उपाय योजनांभोवती फिरत असताना अजूनही शासनाला हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. संपूर्ण राज्यात कुठे ना कुठे नवनवीन समस्या निर्माण होतच आहे. काही ठिकाणी कोरोना आजाराच्या पुनः संसर्गाच्या संशयास्पद प्रकरणे सापडली आहे. त्यापासून आज कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त धोका नसला तरी आरोग्य व्यवस्थेला त्यांच्यावरही बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे. मोठ्या संख्यने रुग्ण घरी गेले आहे ही गोष्ट चांगली आहे. याचा अर्थ आपल्या डॉक्टरांचे रुग्णावरील उपचार योग्य पद्धतीने सुरु आहे रुग्ण औषधांना प्रतिसाद देत आहेत. मात्र यामुळे या आजाराचा संसर्ग कमी झाला असा होत नाही. दररोज नवीन होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण ज्यावेळी कमी व्हायला लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने हा आजाराला आपण पायबंद घालण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल. वैद्यकीय तज्ञांच्या मते स्वयंशिस्त आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे, यामुळे प्रादुर्भाव कमी होणार आहे. विविध आव्हानाचा सामना करत आरोग्य व्यवस्था त्यांचं काम करीत आहे, या आरोग्यच्या आणीबाणीच्या परिस्थितीत चुका ह्या होणारच मात्र त्या वेळच्या वेळी सोडविणे नागरिकांची अपेक्षा असणे काही गैर नाही.


कोरोनाने विशेषतः महाराष्ट्रात आता रौद्र रूप धारण केलं असून हा विषाणू आता आपले खरे रंग दाखवू लागलाय. तुम्हाला आता 'स्कोर' काय झाला आहे, ऐकायची इच्छा होणार नाही इतका रुग्णांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय हे वास्तव मान्य करून नागरिकांनी सतर्क राहण्याचा हाच तो काळ. कोरोनाचा सुरवातीचा काळ संपला असून 'त्याने' आता मुंबई आणि महाराष्ट्रात 'तांडव' करण्यास सुरुवात केली असून ही परिस्थिती कायम अशीच राहिल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. या मृत्यूच्या तुफानाला वेळीच अडवणे गरजेचे आहे. त्याकरिता नागकरिकांची साथ लाख मोलाची आहे, वेळीच उपचार घेतल्याने रुग्ण वाचण्याची शक्यता दाट असते. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण डॉक्टराकंडे आल्यानंतर त्याला वाचविणे अडचणीचे होऊन बसते. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टराकंडे गेलेच पाहिजे हे नागरिकांनी मनाशी घट्ट करून ठेवले पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग