मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने दमदार जोरदार हजेरी लावली असून यांचा आनंद व्यक्त करायचा किती घाबरून जायचे अशी काहीशी नागरिकांची द्विधा मनःस्तिथी झाली आहे. कोरोनाचा हाहाकार एका बाजूला सुरू असताना पावसाचे आगमन म्हणजे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, कोरोनाच्या साथीने आपली पकड मजबूत केली असताना आता 'नेहमीची' येणारे पावसाळी आजार यांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना विरुद्ध मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पयरोसिस या पावसाळी आजारांचा सामना रंगला तर आश्चर्य वाटायला नको.


विशेष म्हणजे या सर्व आजारांमध्ये 'ताप' हे सगळ्याच आजारांमध्ये दिसणारे लक्षण आहे, त्यामुळे ताप आल्यामुळे तो कोरोना असेलच असे नाही. त्याकरिता तात्काळ जवळच्या डॉक्टरांचा जाऊन सल्ला घ्या, आवश्यक असल्यास रोग निदानाकरिता गरजेच्या असणाऱ्या सर्व चाचण्या करा, मात्र कोणताही 'ताप' अंगावर काढून फाजील आत्मविश्वास बाळगू नका. या पावसाळ्याच्या काळात कोरोनाचं 'वर्तन' कसं असेल तो कशापद्धतीने वागणार आहे, याचं अनुमान आतापर्यंत कोणताही तज्ञ व्यक्त करू शकलेला नाही.

संपूर्ण जगावर आलेल्या या महामारीत आणि या पावसाळ्यात विकृतीशास्त्र आणि सूक्ष्मजीव शास्त्र विभागातील तज्ञाचे योगदान फार आहे. कारण दोन विभागातील डॉक्टरच्या अहवालाच्या आधारे रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांच्यावर येत्या काळात ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यत वावर करत असताना सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. पावसाळी आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्या पद्धतीने नियोजन सुरू असेलच. मात्र, नागरिकांनी काम नसताना पावसात घराबाहेर पडू नये. वरिष्ठांची आणि लहानाची काळजी घेणं अत्यंत्य गरजेचं आहे. या काळात सावधगिरीने 'वागणं' हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे.

28 मे ला ज्यावेळी हवामान विभागाने पावसाचे संकेत दिले होते. त्यावेळेची या शीर्षकाखाली 'डोक्याला 'ताप' ठरणार पावसाळा' यावर सविस्तर लिखाण केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने, सर्वसाधारण महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाचं आगमन होत असतं, बहुतांश नागरिक पावसाळा कधी सुरु होतोय याची वाट पाहत असतात. मात्र, यंदाचा कोरोना काळातील पावसाळा हा डोक्याला 'ताप' ठरण्याची शक्यता जास्त आहे. कोरोना विषाणूचा सगळ्यात जास्त कहर असलेल्या मुंबई आणि पुणे शहरात पावसाळ्यात कोरोना त्यांचे आणखी कोणते रंग दाखवेल याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना आज ठामपणे सांगता येत नसले तरी दरवर्षी पावसासोबत येणाऱ्या आजाराची यामध्ये नक्कीच भर पडून आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढेल. यामध्ये तिळमात्र शंका नाही. शासन, प्रशासन आणि महानगरपालिका त्यांचं काम करत राहणारच आहे. मात्र, आपल्याला रुग्णालयात जायची वेळच येऊ नये, अशा पद्धतीने आता नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःलाच घ्यायला हवी. त्यामुळे यापुढे तुम्हीच 'तुमच्या जीवनाचे शिल्पकार' आहे असं समजून वागणं ही काळाची गरज ठरणार आहे. सध्याच्या घडीला रुग्णालयांची अवस्था कशी याचं भान आतापर्यंत प्रत्येक नागरिकाला आलं असेलच.

पुणे येथील केइएम रुग्णालयाचे, श्वसनविकार तज्ञ, डॉ स्वप्नील कुलकर्णी जे गेली काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहे. ते सांगतात की, "जरी सगळ्याच आजारात ताप हे सर्वसामान्य लक्षण असले तरी डॉक्टर रुग्णाची आणि काही चाचण्या करून योग्य आजाराचं निदान करू शकतात. प्रत्येक आजाराचं स्वतःच असं वर्तन आहे, त्यांची डॉक्टरांना व्यस्थित कल्पना आहे. कोरोना हा जरी अपवाद असला तरी काही काळानंतर त्याचबद्दलचीही आपल्याकडे ठोस माहिती जमा होईल यामध्ये शंका नाही. कारण अख्या जगाकरिता कोरोना हा नवीन आजार आहे, पहिल्यादांच सर्व डॉक्टर हा आजार पाहत आहे. त्यामध्येही रुग्णाच्या लक्षणांच्या आधारे उपचार करुन बहुतांश रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश मिळत आहे. परंतु, अजून कोरोनाबाबतीत बरच संशोधन होणे बाकी आहे. कुठलंही आजार हा असा छोटा किंवा मोठा नसतो."

ते पुढे असे सांगतात की, "पावसाळी आजाराबाबत आपल्याकडे काही ठळक लक्षणे आढळतात. त्यामुळे उपचार देणे सोपे होते. कोरोनाच्या आणि अन्य आजाराचं क्रॉस इन्फेकशन होतं का या विषयवार आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. येत्या काळात यावर आपल्याला चांगली माहिती मिळू शकेल. मात्र, कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, साध्य आपल्या आजाराकडे सर्व रोग निदानाच्या चाचण्या उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून आपण योग्य ते निदान करू शकतो.

तर एकंदर या कोरोनामय काळात पावसाळ्या काय वाढून ठेवले आहे? याचा थांगपत्ता कुणालाच नाही. त्यामुळे आपण आजारी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गेली अनेक वर्ष पावसाच्या काळात अनेक आजार बळावतात याची सर्व नागरिकांना पूर्व कल्पना आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळात अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिका अखत्यारीतील, सर्व वैद्यकीय महाविद्यालयाचे, संचालक आणि सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल सांगतात की, "आम्ही कोरोना आणि पावसाळी आजाराचा विचार करुनच तयार पूर्ण केली आहे. पावसाचं आणि कोरोनाचं नातं कसं असेल यावर आता काही सांगू शकत नाही. पावसाळी दरवर्षीची जी तयार असते ती पूर्ण करून ठेवली आहे. त्यासाठीचे वेगळे बेड्स आम्ही करून ठेवले आहे. कोरोनाच्या रुग्णांची व्यवस्था ही वेगळी आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे पेशंट थोडे कमी झाले आहेत. सध्या तरी काही संशय नाही आता येणाऱ्या काळात कशा पद्धतीने परिस्थिती उद्भवते त्याचा अनुमान आताच लावता येणार नाही. पण आम्ही सगळ्या पद्धतीने या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहोत."

सध्या ज्यापद्धतीने जसं ० काम येईल तसं करत राहणे हेच सध्या आपल्या हातात आहे. कोरोना अख्या विश्वासाठी नवीन असून याबद्दल अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. या कोरोना विषाणूचा हा पहिलाच पावसाळा आहे त्यामुळे पावसाळ्यात हा आजरा कसा असू शकतो हे कुणीही सांगितलेले नाही कींवा कुणी आता लगेच काही सांगणे अवघड आहे . परदेशात सुद्धा यावर अजून काम चालूच आहे. त्यामुळे न घाबरता येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायचे आणि शास्त्राचा आधार घेऊन योग्य पद्धतीने मात करायची. पावसाळ्याच्या काळात रक्ताचे नमुने येण्याचं प्रमाण दरवर्षी जास्तच असतं, कारण त्या काळात डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो सारख्या या आजाराचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यात आता कोरोना पण जोडीला आहे." असे डॉ योगानंद पाटील सांगतात, सध्या ते जगजीवनराम रेल्वे रुग्णालयात विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग