सर्वसाधारण महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाचं आगमन होत असतं, बहुतांश नागरिक पावसाळा कधी सुरू होतोय याची वाट पाहत असतात मात्र यंदाचा कोरोना काळातील पावसाळा हा डोक्याला 'ताप' ठरण्याची शक्यता जास्त आहे. कोरोना विषाणूचा सगळ्यात जास्त कहर असलेल्या मुंबई आणि पुणे शहरात पावसाळ्यात कोरोना त्यांचे आणखी कोणते रंग दाखवेल याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना आज ठामपणे सांगता येत नसले तरी दरवर्षी पावसासोबत येणाऱ्या आजाराची यामध्ये नक्कीच भर पडून आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. शासन, प्रशासन आणि महानगरपालिका त्यांचं काम करत राहणारच आहे, मात्र आपल्याला रुग्णालयात जायची वेळच येऊ नये अशा पद्धतीने आता नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःलाच घ्यायला हवी. त्यामुळे यापुढे तुम्हीच 'तुमच्या जीवनाचे शिल्पकार' आहे असं समजून वागणं ही काळाची गरज ठरणार आहे. सध्याच्या घडीला रुग्णालयांची अवस्था कशी याचं भान आता पर्यंत प्रत्येक नागरिकाला आलं असेलच.
देशातील चौथा लॉकडाऊन मे अखेर संपल्यानंतर, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जूनच्या पहिला आठवड्यात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रात पाऊस हा येत असतो असा प्रघात आहे. राज्यातील प्रशासनाने आणि शहरातील महानगरपालिकांनी यापूर्वीच मान्सून पूर्व कामांची सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक राज्यात वाढत आहे, त्यात काही दिवसांनी पावसाळी आजारांची भर पडेल आणि त्यामुळे रुग्ण संख्या अधिक वाढू शकते. हा लेख कुठलीही भीती व्यक्त करण्याबाबत नसून वास्तवाचं भान नागरिकांना असावं यासाठी केलेलं प्रपंच. सध्या आरोग्य व्यस्थेला सर्व सामान्य नागरिकांचा हातभार लागला तर याचा सध्या जी व्यवस्था रात्र दिवस काम करीत आहे त्यांना याचा फायदाच होईल. त्याकरिता सध्या परिस्थिती काय आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. यंदाचा पावसाळा हा कोरोनासाठी पहिलाच असून त्यामुळे तो कशा पद्धतीने वागतो हे वैद्यकीय तज्ज्ञांना आताच सांगणे मुश्किल आहे, याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे.
याप्रकरणी, मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे माजी संचालक, डॉ अविनाश सुपे, सांगतात की, "आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, कि दरवर्षी येणारा पाऊस आणि त्याचसोबत होणारे आजार हे आपणास नवीन नाही. मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यू हे आजार आपल्याकडे येत असतात. कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे, बाधित रुग्णातील तोंडातील द्रव्यामुळे ह्या आजाराचा प्रसार होत असतो, त्यामुळे तो पावसाळ्यातही होईल. पावसामुळे झालाच फायदा तर तो काही ठिकाणचा पाण्याबरोबर वाहून जाईल. मात्र अगोदर पासून कोरोनबाधितांच्या रुग्ण संख्येत पावसाळी आजारांचे रुग्ण भर टाकू शकतात, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण प्रचंड वाढू शकतो. पावसाचे पहिले 15 दिवस गेले की आपल्याकडे मलेरिया आणि लेप्टोचे रुग्ण दिसायला लागतात. त्यानंतर साधारणतः श्रावण महीन्यापासून डेंग्यू चे रुग्ण येण्यास सुरुवात होते, अस चित्र दरवर्षी दिसत असते".
ते पुढे सांगतात की, "सध्या आपल्याकडे कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सगळ्याच साथीच्या आजारात ताप येत असतो. त्यामुळे अशा वेळी अचूक निदान करणे महत्वाचे आहे. अशा वेळी नॉन-कोविड रुग्णालयांची गरज भासणार असून मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यू अशा रुग्णांना तेथे भरती करावे लागेल. अर्थात आरोग्य यंत्रणेला या सगळ्या गोष्टीची जाणीव असून त्या पद्धीत्ने नियोजन सुरु असेलच. मात्र नागरिकांनी काम नसताना पावसात घराबाहेर पडू नये. वरिष्ठांची आणि लहानाची काळजी घेणं अत्यंत्य गरजेचं आहे. या काळात सावधगिरीने 'वागणं' हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे".
सध्या या कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढण्याच्या काळात अनेकांना शहरात लवकर रुग्णालयात दाखल करून घेतलं जात नाही. त्यात काही दिवसांनी राज्यात पावसाळा दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणानी या काळात कशा पद्धतीने कोरोनासोबत अन्य पावसाळी आजारांसोबत कसा लढा द्यायचा यांचा अभ्यास करून ठेवला असावा. संबंध जगावर आलेल्या या महामारीत आणि येणाऱ्या पावसाळ्यात विकृतीशास्त्र आणि सूक्ष्मजीव शास्त्र विभागातील तज्ंज्ञाचे योगदान फार आहे. कारण दोन विभागातील डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे रुग्णांवर उपचार केले जातात.
"पावसाळ्याच्या काळात रक्ताचे नमुने येण्याचं प्रमाण दरवर्षी जास्तच असतं, कारण त्या काळात डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो सारख्या या आजाराचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यात आता कोरोना पण जोडीला आहे. येत्या काळात कोरोनबाधित रुग्णांना पावसाळी आजार होऊ शकतो का? झाल्यावर रक्त नमुन्यात काही जनुकीय बदल होऊ शकतात का? हे सध्या कुणीच सांगू शकत नाही कारण कोरोना सगळ्यांसाठीच नवीन आहे". असे डॉ योगानंद पाटील सांगतात. सध्या ते जगजीवनराम रेल्वे रुग्णालयात विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे.
तर पुणे येथील के इ एम रुग्णालयाचे, श्वसनरोग तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, " या कोरोनाने सगळ्याचे अंदाज फोल ठरवलेले आहे. अनेक तज्ज्ञ सांगत होते की उन्हाळ्यात कोरोनबाधितांचा आकडा कमी होईल , वाढत्या तापमानात हा विषाणूं फार काळ टिकत नाही. मात्र दिवसागणिक कोरोनबाधितांची संख्या तर वाढत आहे. पावसाळ्यामध्येही कोरोना वर्तनात मध्ये फारसे काही बदल होतील आता असे वाटत नाही. शास्त्रात पावसाळ्यातील कोरोनाची वागणूक कशी असते याचे ज्ञान आम्हालाही होणार आहे. त्यामुळे कोरोनासोबत पावसाळी आजारांचे रुग्ण नक्कीच वाढतील. आपली आरोग्य यंत्रणा या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे".
वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार परिस्थिती अवघड असली तरी त्याला घाबरण्याचं कारण नाही, कारण अर्धे आजार ही भीती पोटी होत असतात. या सर्व आजारांपासून दूर राहायचे असेल तर स्वतःची काळजी योग्य पद्धतीने घेणे, हा मूलमंत्र स्वीकारण्याची गरज आहे. सध्याच्या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात आपल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही याची काळजी घेतल्यास आपलं प्रशासनास एक प्रकारचं सहकार्यच असेल.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?