एक्स्प्लोर
सलाम दोस्तहो...
भल्या मोठ्या अवाढव्य, म्हणजे आभाळाच्या आकाराशी स्पर्धा करत पसरलेल्या 'गावच्या माळावर', श्रमदानासाठी फक्त मूठभर उडणाऱ्या या पक्षांना बघून --- जीव फुटून जातो.

‘एखाद्या गावात 500 ते 1000 लोक एकत्र येऊन रोज श्रमदान करतात’, याचं फारसं विशेष वाटत नाही. कारण स्पर्धेत काही गावं अशीही आहेत, जिथं पाणी फाऊंडेशनचं ट्रेनिंग घेऊन आल्यापासून त्या पाचच जणांनी गावाला समजावण्यात आपल्या अंगातलं रक्त आटवलं. गावकऱ्यांना समजावलं, “बाबांनो, चला आपण नाही काम केलं, तर दुष्काळ परत आपलंच कंबरडं मोडणार आहे. पुन्हा आपल्यावरच आत्महत्येची वेळ येणार आहे. एवढी संधी दिलीय, तर त्याचा फायदा उठवू, वगैरे वगैरे!!” अक्षरक्ष: त्यांनी होतं नव्हतं ते सगळं करुन बघितलं, तरीपण तोंडावर फक्त "हो.. हो!" म्हणूनही शेवटी गावकरी श्रमदानाला मात्र 5 मिनिटंसुद्धा आले नाहीत.
सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील पानगाव, चिखर्डे, राळेरास, रस्तापुर या गावांमधील ही कहाणी.
एकीकडं ट्रेनिंगवरुन येताना 'गावात पाणी मुरवायचं वेड' घेऊन उत्साहात, स्वप्न बघत आलेले हे लोक, इकडं प्रत्यक्षात मात्र गावाचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याचं पाहून ह्रदय फुटून गेल्यासारखे निराश झाले. "दुसऱ्या गावात शेकडोने लोक येत असताना, श्रमदान करत असताना, दिवसरात्र आपलं शरीर पाण्यासाठी झिजवत असताना, अनेक गावांमध्ये JCB, पोकलेनसारख्या मशिन आल्या असताना, अन् एकूणच भन्नाट काम चालू असताना, आपल्या गावात मात्र लोक कामाला यायला तयारच नाहीत" हे बघून प्रचंड निराश झाले. एक-दोन दिवस या गर्तेत अडकून शेवटी या पाच ते सहा जणांनीच स्वतःच गावचं काम हाती घ्यायचं ठरवलं, अन् 8 एप्रिल ते आजपर्यंत एवढे मोजकेच लोक काही गावात रोजच्या रोज काम करत आहेत.
आता, खरंतर...
या गावांचा स्पर्धेत नंबर येणार आहे का?.. नाही.
यांच्या गावात लाखो लिटर पाणी मुरणाराय का?.. नाही.
यांच्या गावात मोठी महाश्रमदाने आयोजित होणारेत का?
यांना मशिन मिळण्याची खूप शक्यता आहे का?.. नाही.
यांच्या गावात इतर गावासारखा कुणी सेलेब्रिटी उत्साह वाढवायला येणारे का?.. नाही.
ह्यांना कोणतं बक्षीस मिळणारे का?..नाही.
नाही.. नाही.. नाही..!!! एवढं एकच उत्तर.
मग तरीही अंगातली कोणती धमणी असेल, मेंदूचा नेमका कोणता वेत असेल, ह्रदयाचा नेमका कोणता ठोका असेल, जो यांना सांगतो की बाबांनो वरीलपैकी काहीही घडत नसताना किंवा घडणार नसतानाही -- आपण रोज पाच-सहा तर पाच-सहा जणच का होईना, पण काम करतंच राहायचंय.??? भल्या मोठ्या अवाढव्य, म्हणजे आभाळाच्या आकाराशी स्पर्धा करत पसरलेल्या 'गावच्या माळावर', श्रमदानासाठी फक्त मूठभर उडणाऱ्या या पक्षांना बघून --- जीव फुटून जातो.
पण दुसऱ्याच क्षणी अंग तडतडूनही येतं, शहारेही येतात की ही खरी जिद्दय!!! "काही होणार नाही" हे माहीत असूनही, "ओंजळभर पाणी का होईना पण आपण जमिनीत मुरवूच!!" एवढीच इच्छा नरड्यात बांधत, हाताला पडलेलं घट्ट फुटलं तरी, दिवसरात्र काम करणाऱ्या या लोकांच्या पायाला अक्षरक्ष: पाणी लावून ते कपाळी लावावं वाटतं.
महाराष्ट्रातल्या अशा रोज फक्त दहा ते पंधराच, पण नियमित श्रमदानाला येणाऱ्या लोकांच्या तमाम गावांवरुन हा जीव ओवाळून टाकावा वाटावा, अशी जिद्दय या गावांची.
सलाम दोस्तहो... तुम्ही स्पर्धा कधीच जिंकलीय...!!!
सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग :
...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!
द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट

























