एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : नागपंचमी : उत्सव आणि लोकपरंपरा
सण आणि उत्सव साजरे करणे हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य असा भाग आहे. दैनंदिन जीवनातील कंटाळवाण्या घटना प्रसंगातून, नित्याच्या जीवनातील तोचतोपणा यातून थोडीशी सुटका करून घेण्यासाठी; आणि धर्माचरण पाळण्याचे समाधान मिळण्यासाठी माणसांनी या सण, उत्सवांचा आधार घेतला. त्याचबरोबर सण, उत्सव साजरे केल्याने देवादिकांना, पितरांना, निसर्गातील अद्भुत शक्तींना प्रसन्न करून त्याची कृपा संपादन करता येते, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याची पूजा केली जाते. या सण, उत्सवांची परंपरा ही आर्यांच्या आगमनापूर्वीच्या काळापर्यंत पाठीमागे जाते. हे सण साजरे करण्यात विधीला आणि संभारणीला विशेष महत्त्व असते.
स्त्री-जीवनात श्रावण महिन्यातील महत्त्वाचा असलेला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सण येतो. महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणांमधे नागाच्या पूजेला महत्त्वाचे स्थान आहे. नागाविषयी अनेक कल्पना आणि लोक-समजुती लोकजीवनात प्रचलित आहेत भारतीय पुराण वाडःमयातही नागाविषयीच्या अनेक कथा आलेल्या आहेत. नागपूजा ही भारतातील जवळजवळ सर्वच प्रांतात पहावयास मिळते. महाराष्ट्रातील स्त्रिया नागपंचमीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. यादिवशी त्या भाजी चिरीत नाहीत, चुलीवर तवा ठेवत नाहीत. भारतामध्ये नागपूजेच्या संदर्भात वेगवेगळी कारणे आहेत. नाग हे चैतन्याचे आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे. त्याच्याठिकाणी सार्या शक्ती एकवटलेल्या आहेत, असा समज आहे. तिच पर्जन्य देवता आहे, तिच सुफलित भूमी आहे, तिच मृत्यूची विध्वंसक प्रतिमा आहे, तिच रक्षक आहे. म्हणजेच प्रजनन, संरक्षण, संवर्धन, विध्वंस या सार्या शक्तीचे आदिम केंद्र आहे, अशी आपली मनोमन धारणा झालेली आहे.
नागपंचमीला नागाची आणि वारुळाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. मातीच्या दगडाच्या किंवा पिठाच्या नाग प्रतिमांची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरात भिंतीवर मातीने अगर शेणाने आदल्या दिवशी सारस्वतात नागपंचमीच्या दिवशी त्या जागेवर हळदीने कुंकवाने, किंवा चंदनाने नाग प्रतिमा रेखाटून त्याची पूजा करतात. नैवेद्य म्हणून दुध, दही, तूप, लाह्या वगैरे पदार्थ अर्पण केले जातात. नागाला 'शेष' हे मानाचे नाव दिले गेले आहे. त्याच्या पूजेसमयी नागासंबंधीची विविध गाणी, विविध प्रकारे, नागासंबंधीचे महत्त्व लक्षात घेऊन गायली जातात. लोकसंस्कृतीमध्ये नागाची पूजा दोन पातळ्यांवर होत असलेली आपल्याला लक्षात येते. एक प्रत्यक्ष नाग प्राण्याची पूजा तर दुसरी नाग संस्कृतीतील पूर्वजांनी प्रति आदरभाव व्यक्त करणारी पूजा.
नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तो त्याच्या शेतीचे रक्षण करतो. या भावनेतून त्याच्याप्रती असलेला आदर भाव व्यक्त करण्यासाठी म्हणून या दिवशी तो त्या नाग प्राण्याची पूजा करतो. नागपंचमीला स्त्रिया झाडाला बांधलेल्या पाळण्यावर झोके घेतात. झोके घेतांना, तसेच वारुळाच्या पूजेला जातांना गायिल्या जाणाऱ्या गीतांना त्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेड्यातील स्त्रिया आरती घेऊन वरुळाकडे, नागाच्या पूजेसाठी, गाणी गात जातात. या प्रसंगी म्हटली जाणारी गीते विविध प्रकारची असतात, त्यात विविधता असते. पुराणातील नागविषयक कथा, देव देवतांपर उल्लेख, पतिव्रता स्त्रीच्या कथा आणि सामाजिक असे असलेली गाणी गायली जातात. यासणाच्या निमित्ताने त्या फेरावरची गाणीही गातात. तसेच नागोपासक ज्यांना आपण 'अरबाडी' असे संबोधतो, ते 'नाग बाऱ्या' गातात.
या गीतांच्या मागे परंपरा आहे. नागपूजा ही वेदपूर्वकाळापासून येथे प्रचलित आहे. म्हणून नागगीतांचीही परंपरा ही वेदपूर्वकाळापर्यंत मागे जाते. भारतीय आदिम समाजाचा शेती हा प्रमुख उद्योग होता. शेतीमध्ये स्त्रीला महत्त्वाचे स्थान होते. ऋग्वेदातील कृषीशी निगडित देवता 'स्त्री देवता' आहेत. पूर्व वैदिक काळात भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे होते. ज्या स्त्रीत संतती निर्माण करण्याची क्षमता अधिक, तिला शेतीच्या कामात विशेष महत्त्व असे. पावसाने भूमी सुफलित होते, तशीच स्त्री ही सुफलित होते, अशी श्रद्धा होती. नागपंचमीचा सण सफुलिकरणाशी निगडीत असलेला सण आहे. त्या सणाच्या प्रत्येक प्रसंगी स्त्रियांची गाणी गातात, त्यात कृषी जीवनाविषयी अपार श्रद्धा व्यक्त झालेली दिसते. हे सर्व नागाच्या कृपेने आहे असा तिचा भाव असतो.
वावरात नांग येते l
भाव लोकाचा पाह्यते ll
पीकपानी पाहोन l
समदी वाटक् लावते ll
या गीतात नागोबावरील आढळ निष्ठा व्यक्त करण्यात आली असून नागोबाची मनोभावे पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. तोच सर्वस्व आहे. म्हणजेच कृषी जीवनाशी निगडित असलेली ही गीते कृषी जीवनाच्या आदिम अवस्थेपासून मौखिकतेने चालत आलेली आहेत. वेदपूर्व काळापासून गीतांचे प्रचलन आहे असे म्हटल्यास चूक ठरू नये.
या नागपूजेच्या निमित्ताने नागवंशाची स्मृती साठवून ठेवने हाही एक विचार दिसून येतो. या नागपूजेच्या निमित्ताने नागबा-या गाणारा एक विशिष्ट वर्ग या बा-यांचे गायन पूजेच्या वेळी तसेच सर्पदंश झाला असेल तर, त्यावरचा उतारा म्हणून केल्या जाते. या ''बा-या "गाणाऱ्या "अरबाड्यांनी" स्वतःची एक वेगळी संस्कृती जपलेली दिसते.
नागपंचमीच्या सणाला ज्यांच्या घरी नागठाणी आहेत, किंवा जिथे कुठे नागाची ठाणी अस्तित्वात आहेत, तिथे नागपंचमीच्या आधी पाच दिवसापासून 'नाग-बाऱ्या' गायिल्या जातात. साधारणतः रात्रीच्या वेळी हा प्रकार साजरा होत असतो. त्याचाही एक विशिष्ट विधी असतो. 'ठावा'वर ह्यांना बाऱ्या गायिल्या जातात. 'ठाव' म्हणजे गुंड, त्यावर एक पालथा कोपर, व तो एका लोखंडी, पितळी कड्याच्या साह्याने वाजवला जातो. त्या संगीताच्या साथीने बा-या गायिल्या जातात. त्याचवेळी अंगात येणे हाही प्रकार चालतो. 'नाग' अंगात येतो व ती व्यक्ती डोलायला लागते. नागपंचमीपर्यंत हा प्रकार चालतो.
नागपंचमी सणाचा विचार करतांना त्यात स्त्रीचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. आणि याप्रसंगी त्या गाणी गातात. नागपंचमीला स्त्री-जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक धार्मिक, भाविक, श्रद्धाशील वृत्तीची असल्यामुळे परंपरेत परंपरेने चालत आलेले सण, उत्सव साजरे करण्याकडे तिचा कल अधिक असतो. त्यामुळेच ही परंपरा आजवर टिकू शकली, असे म्हणता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement