BLOG | स्त्रीवादाच्या मूलभूत मूल्यांची जाणीव करून देणारी 'द पोस्ट' मधील मेरिल स्ट्रीप
केवळ एका स्त्रीकडे वृत्तपत्रांची मालकी आहे म्हणून सरकारच्या दडपशाहीला ते सहज बळी पडेल, तिथे कोणी पुरुष मालक असता तर तो सरकारला पुरून उरला असता असा समज वृत्तपत्राचे संचालक मंडळ, वाचक आणि सामान्य नागरिकांना होण्याची जास्त शक्यता होती. अशा वेळी तीच स्त्री पुरुषसत्ताक व्यवस्थेचे सगळे समज खोडून काढून, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात असतानाही त्यावर मात करून ठाम निर्णय घेते आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करते. ही कथा आहे सत्तरच्या दशकातील 'द वॉशिंग्टन पोस्ट' ची मालकीण कॅथरीन ग्राहमची.
केवळ एका स्त्रीकडे वृत्तपत्रांची मालकी आहे म्हणून सरकारच्या दडपशाहीला ते सहज बळी पडेल, तिथे कोणी पुरुष मालक असता तर तो सरकारला पुरून उरला असता असा समज वृत्तपत्राचे संचालक मंडळ, वाचक आणि सामान्य नागरिकांना होण्याची जास्त शक्यता होती. अशा वेळी तीच स्त्री पुरुषसत्ताक व्यवस्थेचे सगळे समज खोडून काढून, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात असतानाही त्यावर मात करून ठाम निर्णय घेते आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करते. ही कथा आहे सत्तरच्या दशकातील 'द वॉशिंग्टन पोस्ट' ची मालकीण कॅथरीन ग्राहमची.
आजच्या काळात स्त्रियांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत असा भास निर्माण केला जातोय. कार्पोरेट जगत असो वा फिल्म इंडस्ट्री, आजही स्त्रियांना समानतेच्या हक्कासाठी लढावं लागतंय. माध्यम क्षेत्रातही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. माध्यम क्षेत्रात एखादी स्त्री आपल्या कर्तृत्वावर पुढे जात असेल तर तिच्याकडे पाहण्याचा पुरुष सहकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो. प्रसंगी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. सत्तरच्या दशकात पत्रकारितेचे जग पुरुषसत्ताक व्यवस्थेने व्यापले असताना 'वॉशिंग्टन पोस्ट' सारख्या प्रख्यात वृत्तपत्रांची मालकी एका स्त्रीकडे आली आणि तिला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात क्लासिफाईड डॉक्युमेंट्स प्रकाशित करावी लागली. मग विचार करा त्यावेळी त्या स्त्रीला किती अडचणींचा सामना करावा लागला असेल.
'द पोस्ट' हा 2018 साली प्रदर्शित हॉलीवूडपट याच संदर्भातला आहे. हा चित्रपट माध्यम स्वातंत्र्य, लोकशाही, सरकारने नागरिकांपासून माहिती लपवून ठेवणे यासारख्या अनेक गोष्टींवर तयार करण्यात आला आहे. पण कॅथरीनची भूमिका साकारलेल्या मेरिल स्ट्रीपचा अभिनय पाहिला असता त्यातून माध्यम स्वातंत्र्यापेक्षा स्त्रीवादाच्या मूलभूत जाणीवा स्पष्ट होतात. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात टॉम हँक्ससारखा दिग्गज अभिनेता समोर असतानाही अभिनेत्री मेरिल स्ट्रीपने साकारलेली कॅथरीन ग्राहमची भूमिका हा या चित्रपटाचा गाभा आहे.
व्हिएतनाम युद्ध हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या इतिहासातील काळं पान. हे युद्ध म्हणजे अमेरिकेसाठी 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशातली काहीशी गत होती. या युद्धात अमेरिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, अनेक सैनिक मारले गेले. अमेरिका हे युद्ध जिंकू शकत नाही हे शंभर टक्के सत्य असतानाही हे युद्ध चालू ठेवलं. मग या युद्धाला लोकांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी प्रशासन आणि लष्कराने अनेक उचापती केल्या, नागरिकांशी अनेकदा खोटं बोलण्यात आलं, अपप्रचार करण्यात आला. व्हिएतनाम युद्धासंबंधित खरी माहिती अमेरिकन नागरिकांपासून लपवली. विशेष म्हणजे अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष या कृत्यात सामील होते.
1971 साली या युद्धाची क्लासिफाईड डॉक्युमेंट्स पेन्टॅागॉनमधून लिक करण्यात अमेरिकन मिलिटरी विश्लेषक असणारे डॅनियल एल्सबर्ग यशस्वी होतात. ही कागदपत्रे सर्वप्रथम न्यूयॉर्क टाईम्सच्या हाती लागतात पण त्यांनी तसे छापल्यास राष्ट्रीय सुरक्षेचा भंग होईल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी धमकीच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी दिली. पुढे ती डॉक्युमेंट्स 'वॉशिंग्टन पोस्ट' च्या हाती लागतात.
'वॉशिंग्टन पोस्ट' चा मुख्य संपादक हा बेन ब्रॅडली हा असतो. त्याची धडाडी आणि कामाचा आवाका प्रचंड असतो. ही भूमिका टॉम हँक्स यांनी साकारली आहे. युद्धाचं सत्य सर्वांसमोर आणणे आणि निक्सन प्रशासनाचा कारभार लोकांसमोर उघड करण्यासाठी ही लिक झालेली कागदपत्र छापणे अत्यंत आवश्यक आहे असं त्याचं ठाम मत असतं. पण त्या संबंधीचा अंतिम निर्णय हा 'वॉशिंग्टन पोस्ट' ची मालकीण असलेल्या कॅथरीन ग्राहमचा असतो.
कॅथरीन ग्राहमची भूमिकाच या चित्रपटाचा गाभा आहे आणि ही भूमिका साकारली आहे ती मेरिल स्ट्रीप या अभिनेत्रीने. कॅथरीन ग्राहम ही पन्नाशीतील महिला पुरुषसत्ताक व्यवस्थेने व्यापलेल्या पत्रकारितेच्या जगात स्वतःला सिद्ध करू पाहणारी. कॅथरीनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 'वॉशिंग्टन पोस्ट' ची जबाबदारी तिचा नवरा फिल ग्राहमकडे येते. फिल ग्राहमच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर 'वॉशिंग्टन पोस्ट' ची जबाबदारी अनपेक्षितपणे तिच्यावर येऊन पडते. नवऱ्याच्या आकस्मित मृत्यूनंतर कोणीही पुरुष वारसदार नसल्याने संचालक मंडळाला नाईलाजास्तव कॅथरीनला आपला बॉस म्हणून स्वीकार करावा लागतो. एका महिलेच्या हाताखाली काम करणे त्यांना अपमानास्पद वाटत असतं. आजही ही परिस्थिती कायम आहे.
व्हिएतनाम युद्धात संबंधित क्लासिफाईड डॉक्युमेंट्स छापले तर आपला पेपर बंद पडू शकतो, आपल्याला तुरुंगवास भोगावा लागेल हे माहिती असतानाही कॅथरीन ग्राहम रिस्क घेते. हा निर्णय केवळ तिच्या कुटुंबावर परिणाम करणारा नसून तिच्या वृत्तपत्राचे भवितव्य ठरवणारा असतो.
कॅथरीन असा काही महत्त्वाचा निर्णय घ्यायच्या पात्रतेची नाही, तिची पात्रता काय आहे हे आपल्याला माहीत आहे अशा मताचे लोक 'वॉशिंग्टन पोस्ट' च्या संचालक मंडळात असतात. एक वेळ अशी येते की कॅथरीन ग्राहमचा सल्लागार तिला म्हणतो की, "एका महिलेच्या हाती या वृत्तपत्रांची मालकी असणं हे यामुळे संचालक मंडळ आणि इतर भागधारक चिंतेत आहेत. कारण अशा प्रकारचा अवघड निर्णय एखादी महिला घेऊ शकत नाही." त्या वेळी कॅथरीन ग्राहम तिच्या सल्लागाराने मनमोकळेपणाने मांडलेल्या मताबद्दल आभार मानते आणि संचालक मंडळाची बैठक सोडून निघून जाते.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांची संख्या वाढतेय. यामध्ये स्त्रिया उभ्या पिरॅमिडच्या तळाशी जरी असल्या तरी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळी तिला डावलले जाते. तिला निर्णय प्रक्रियेत कोणतेही स्थान दिले जात नाही असं मेरिल स्ट्रीप म्हणते. या चित्रपटात असे अनेक सीन आहेत जे सातत्याने कॅथरीन ग्राहमची एक स्त्री म्हणून परीक्षा घेत असतात. केवळ स्त्री आहे म्हणून तिला कमी लेखलं जात असताना परिस्थितीनुसार कॅथरीन आपल्या मतावर ठाम होत जाते.
व्हिएतनाम युद्धासंबंधीची ही कागदपत्रे छापायची की नाही असं कॅथरीन तिचा मित्र बॉबला विचारते, हे ऐकताच बॉब तिच्यावर भडकतो. असं काही केल्यास निक्सन तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही आणि तुझा पेपर बंद पाडेल असं सांगतो. त्यावर कॅथरीन ग्राहम त्याला "मी तुझा सल्ला मागते, तुझी परवानगी नाही" असं ठणकावते.
कॅथरीनचा मित्र मॅकनामारा याने कॅथरीनला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर 'वॉशिंग्टन पोस्ट' तारण्यासाठी खूप मदत केली असते. तसेच त्यांचे वैयक्तिक संबंधही खूप जवळचे असतात. मॅकनामारा हा निक्सन प्रशासनातील एक महत्वाची व्यक्ती असते आणि व्हिएतनाम युद्धाचे डॉक्युमेंट्स दडवून ठेवण्यामागे त्याची महत्त्वाची भूमिका असते. ते डॉक्युमेंट्स छापणे म्हणजे मॅकनामाराचे उपकार विसरणे आणि त्याच्या विरोधात जाण्यासारखं असते. अशावेळी भावनिक विचार न करता कॅथरीन आपल्या तत्वांवर ठाम राहते आणि डॉक्युमेंट्स छापण्याचा निर्णय घेते. स्रिया भावनिक असतात, त्या व्यवहारापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात, त्या भावनिकतेला बळी पडतात हा समज आपल्या समाजात आहे. समाजातील हा प्रचलित समज खोडून काढून कॅथरीन आपल्या तत्वांवर ठाम राहते आणि समाजाला एक वेगळा संदेश देते.
आधीच 'वॉशिंग्टन पोस्ट' चे संचालक मंडळ एक स्त्री आपली प्रमुख आहे म्हणून नाराज असतात. तिचा आदेश पाळणे त्यांना अपमानास्पद वाटत असतं. त्यातच एका प्रचंड शक्तिशाली सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असते. त्याचा परिणाम हा 'वॉशिंग्टन पोस्ट' बंद पाडण्यात होऊ शकतो. असे जर झालं तर केवळ एक स्त्री प्रमुख आहे म्हणून वृत्तपत्र बंद पडले, किंवा सरकार त्यात यशस्वी झालं असा समज होण्याची जास्त शक्यता होती. त्या ठिकाणी वृत्तपत्राचा मालक जर एखादा पुरुष असतात तर तो सरकारला पुरून उरला असता असा विचारही संचालक मंडळ आणि सर्वसामान्य वाचक, नागरिकांचा झाला असता. मग एक स्त्री म्हणून कॅथरीनवर किती मोठे दडपण असेल याचा विचार कोणी करू शकतो का? तिने ठाम भूमिका घेतली नसती तर स्त्रियांच्या क्षमतेला कमी लेखण्याचा हा विचार समाजात रुजला असता आणि आताच्या काळात माध्यमातील स्त्रिया ज्या आत्मविश्वासाने वावरतात ते शक्य झालं नसतं. 'वॉशिंग्टन पोस्ट' चा संपादक ब्रॅडली आणि पत्रकार जेव्हा ही कागदपत्रे घेऊन रात्री उशिरा कॅथरीनच्या घरी येतात त्यावेळी ती छापायचीच या मतावर कॅथरीन ठाम असते. ही डॉक्युमेंटस छापा, मी आता झोपायला जाते असं ती सहजपणे ती बोलते. त्यावेळी कॅथरीनच्या चेहर्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत असतो.
क्लासिफाईड डॉक्युमेंट छापायचा निर्णय मनात पक्का झाल्यानंतर कॅथरीन ग्राहम ब्रॅडलीला तसं करायचा आदेश देताना म्हणते, "लेट्स गो, लेट्स गो! लेट्स पब्लिश". हा सीन भन्नाटपणे शूट करण्यात आला आहे. हा सीन पाहताना प्रेक्षकांना कॅथरीनमध्ये झालेला बदल, तिने आपल्या अधिकारांचा खऱ्या अर्थाने केलेला वापर आणि स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय या गोष्टी पाहायला मिळतात. हा माध्यम क्षेत्रातल्या आणि इतरही क्षेत्रातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला देण्यात आलेला एक संदेश आहे.
ज्यावेळी न्यायालयाचा निकाल 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या बाजूने लागतो आणि कॅथरीन न्यायालयाच्या बाहेर येते, त्या वेळी न्यायालयाबाहेर असंख्य स्त्रिया तिच्याकडे प्रचंड आशेने पाहत असतात. कॅथरीन ही आता लाखो स्त्रियांसाठी प्रेरणा ठरलेली असते. एक स्त्री आपल्या कामातून इतर स्रियांना कशी प्रेरणा देते हे या सीनमधून स्पष्ट होतं.
एखादी स्त्री कोणत्याही मोठ्या कामात यशस्वी झालीच तर त्याचे संपूर्ण श्रेय तिला न देणार्या 'पुरुषसत्ताक इगो'वर या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. जेव्हा हे सर्व केवळ आपल्यामुळे शक्य झालं असं संपादक बेन ब्रॅडली तिच्या पत्नीला टोनी ब्रॅडलीला सांगत असतो त्यावेळी टोनी ब्रॅडलीने दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची असते. ती म्हणते की, "कॅथरीनने आपण अशा परिस्थितीचा सामना करू शकेल असा कधी विचारही केला नसेल. जेव्हा तुम्हाला सातत्याने सांगितलं जातं की तुमची पात्रता नाही, तेव्हा तुमच्या मतालाही काही किंमत नसतं. त्यांच्यासाठी तुमचं अस्तित्व नसतं हीच वस्तूस्थिती असते. अशा वेळी हे सर्व खरं आहे असा विचार आपल्या मनात येऊ न देणं हे खूप अवघड असतं. त्यामुळे या परिस्थितीत, अशा प्रकारचा निर्णय घेणे म्हणजे आपले संपूर्ण भवितव्य आणि कंपनी पणाला लावणं असतं. म्हणून मला वाटते की कॅथरीन ग्राहम ही शूर आहे. "
पुरुषांनी व्यापलेल्या या जगात एकट्या महिलेने आपलं स्थान शोधणं, आपली मतं व्यक्त करणं, आपल्याला दुर्लक्षित केलं जात आहे हे समजत असतानाही ठामपणे उभं राहणं किती महत्त्वाचं आहे हे मेरिल स्ट्रीपने आपल्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. टोनी ब्रॅडलीने म्हटल्याप्रमाणे, आजही स्त्रियांना काहीतरी नवीन करायचं असल्यास आपलं अस्तित्व आणि भविष्यही पणाला लावावं लागतं. तिला आपण शूर आहोत हे समाजाला पदोपदी पटवून द्यावं लागतं.
'द पोस्ट' ची ही कथा केवळ माध्यम क्षेत्रातील स्त्रियांसाठी नसून सर्वच क्षेत्रातील स्त्रियांसाठी आहे. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना करावा लागणारा संघर्ष आणि पत्रकारितेच्या मूल्यांचे महत्व आणि त्याही पुढे जाऊन स्त्रीवादातील मूल्ये या चित्रपटातून मांडण्यात आली आहेत. 'द पोस्ट'ची ही कथा केवळ अमेरिकेतील राज्यघटनेच्या ऐतिहासिक अशा पहिल्या घटनादुरुस्तीशी संबंधित नसून स्त्रीवादाला एक नवा आयाम देणारी आहे. 'द पोस्ट' मधली मेरिल स्ट्रीप आपल्याला स्त्रीवादाच्या मूलभूत मूल्यांची जाणीव करून देते.