BLOG : माझी माय माझी प्रेरणा : संयमाची महती आईने शिकवली : डॉ. पल्लवी सापळे
माझं आणि आईचं नातं हे माय-लेकीचंच आहे. म्हणजे माझे बाबा लाड करत, तर त्याला शिस्तीचा बांध घालण्याचं काम आईने केलं. तसंच आयुष्यात संयमाने गोष्टी हाताळणं हेही आईने शिकवलं, जेजे हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे (Dr. Pallavi Saple) सांगत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, माझी आई सुप्रिया हीदेखील डॉक्टर. ती नेव्हीमध्ये सिव्हिलियन मेडिकल ऑफिसर होती. तिच्यामुळेच मी डॉक्टर होण्याकडे माझा कल राहिला. त्याही काळात आमच्या पालनपोषणाकडे तिने अत्यंत काटेकोरपणे लक्ष दिलंय. आईने दिलेली आणखी एक महत्त्वाची शिकवण म्हणजे कुणाच्याही पोटावर पाय येता कामा नये, प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने सुधारायची संधी द्यायला हवी.
तसंच तिचं नेचर अत्यंत हेल्पफुल. ती अख्ख्या बिल्डिंगचीच डॉक्टर असायची. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं ही जणू तिच्या रक्तात भिनलेलं.
माझे बाबा डेन्टिस्ट होते. तुमच्या कामाचा भरभरुन आनंद घ्या, असा त्यांचा फंडा होता. तर, माझी आई माझी स्ट्राँग सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यावेळपासून कायम माझ्यासोबत राहिलीय. माझ्या दोन्हीकडच्या आज्या म्हणजे आईची आई आणि बाबांची आईदेखील मेंटली खूप स्ट्राँग होत्या. त्यांची ती कणखरता आईमध्ये आलीय. जी मलाही बरंच काही देणारी ठरलीय.
कोरोना काळातील एक अनुभव सांगते, त्या काळात माझं पोस्टिंग धुळे, मालेगावला होतं, त्यावेळी जवळपास एक वर्ष ती घरी एकटी राहिली. न घाबरता, न डगमगता तिने या काळाशी दोन हात केले. आता ती 76 वर्षांची आहे. वयाच्या सत्तरीत त्या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीतही तिने स्वत:ला नीट सांभाळलं. मलाही आश्वस्त केलं, यामुळेच मी माझी ड्युटी काळजीविना करु शकले.
माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी एखाद्या गोष्टीच्या वेळी पटकन रिअँक्ट होते. तो माझा स्वभाव बदलण्यासाठी मला आईने गाईड केलं.
माझ्याच बद्दल आणखी एक घडलेला किस्सा म्हणजे एकदा माझ्या पोस्टिंगबद्दल काहीसं राजकारण झालं आणि माझं पोस्टिंग अशा ठिकाणी झालं, जिथे ते व्हायला नको होतं. तेव्हा मी नोकरी सोडण्याच्या विचारापर्यंत आले होते. तेव्हा आईने मला पुन्हा एकदा पेशन्सची महती सांगितली. तू काही दिवस रजा घे, संबंधितांशी बोल. गोष्टी सुरळीत होतील. तिचा हा सल्ला माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत खूप मोलाचा ठरलाय.
माझ्या आईचा कामाचा उरकही मी पाहिलाय. ती आपलं करिअर सांभाळून १०० चपात्या करायची. लादी पुसण्यापासून सगळी कामं ती अगदी झपाट्याने, हसतमुखाने करायची.
कुकिंगबद्दल सांगायचं तर तिने केलेलं कॅरेमल कस्टड फारच अप्रतिम असतं. तर, मी केलेली मालवणी फिश करी तिला खूप आवडते.
आम्हा कुटुंबियांना फिरण्याची आवड आहे. तेव्हाही आम्ही एका सुट्टीत राज्यात, तर एका सुट्टीत देशातील ठिकाणं फिरायचो. तिने अंटार्क्टिका पाहावं, अशी माझी दुर्दम्य इच्छा आहे, असंही गप्पांच्या सांगतेवेळी त्यांनी सांगितलं.