BLOG : माझी माय माझी प्रेरणा : माझी आई म्हणजे, मायेचा झरा : अश्विनी भिडे
माझी आई म्हणजे मायेचा झरा आहे, त्याच वेळी निग्रही वृत्ती तिच्यात ठासून भरलीय. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आपल्या आईबद्दल भरभरून बोलू लागल्या. अश्विनी भिडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एमडी पदावर कार्यरत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, माझी आई अरुंधती कुलकर्णी ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण. माझ्यावर आईचा खूप प्रभाव आहे. त्या काळातील स्त्रियांना त्या काळातील प्रथापरंपरांनुसार, जे सोसावं लागलं. तेच माझ्या आईच्याही नशिबी आलं. त्यामुळे तिने पाहिलेली पण पूर्ण न झालेली स्वप्नं, तिने आमच्यात पाहिली. ती साकारण्यासाठी माझ्या पंखांना बळ दिलं.
माझ्या आईचे काका हे मंत्रालयात कार्यरत होते. तेव्हा ते महिला अधिकाऱ्यांच्या गोष्टी सांगत, त्या ऐकूनच वयाच्या 15-16 व्या वर्षीच मी आयएएस अधिकारी व्हायचं हे मनाशी पक्कं केलं होतं.
मात्र हा प्रवास सोपा नव्हता. त्याकरता खूप अभ्यास करावा लागणार हे नक्की होतं. तसंच झालं. अभ्यासासोबतच वक्तृत्वात कुशल होणं, खेळांमध्ये प्रवीण होणं व्यक्तिमत्त्व विकासात किती महत्त्वाचं आहे, हे आईने माझ्या मनावर बिंबवलं.
माझ्या शिक्षणाचा प्रवास लक्षात घेतला तर कराडमध्ये प्राथमिक शिक्षण, तासगावात माध्यमिक शिक्षण आणि जयसिंगपूरला आठवी ते दहावीचं शिक्षण झालं.
वडील स्टेट बँकेत असल्याने त्यांच्या ट्रान्सफर होत असत. त्या काळात आईच्या खंबीर साथीने माझ्या जीवनाचा पाया अत्यंत मजबूत केला. आईला वाचनाची खूप आवड आहे, इतकी की, आम्ही ज्या ज्या ठिकाणी जायचो, तिथे लायब्ररीची मेंबरशिप घ्यायचो. सकस विचारांचं पीक परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं फळ देते, यावर तिचा प्रचंड विश्वास आहे. तिने मलाही तसंच घडवलंय.
यूपीएससी परीक्षेच्या प्रिलीम्सची एक आठवण मी आवर्जून सांगेन. ही गोष्ट 1994 ची. त्यावेळी आतासारखी संवादाची माध्यमं उपलब्ध नव्हती. त्यामुळे परीक्षेचा निकाल कळण्याचं माध्यम म्हणजे वृत्तपत्र. त्यावेळी निकाल आल्यावर, माझ्या एका मैत्रिणीचा नंबर त्यात होता, माझा नव्हता. मी काहीशी निराश झाले, इतकं झोकून देऊन अभ्यास केल्यावरही असं का व्हावं, या विचाराने मी त्रासले. तेव्हा आईने मला सांगितलं, तू जर इतकी मेहनत घेतली आहेस, तर त्याचं फळ तुला मिळणारच. पुन्हा एकदा रिझल्ट नीट चेक कर. त्याप्रमाणे मी दुसऱ्या एका दाक्षिणात्य पेपरमध्ये पूर्ण निकाल तपासून पाहिला असता त्यात माझा नंबर होता. आईने दिलेलं ते आश्वासक वचन माझ्यासाठी फार मोलाचं होतं.
सकारात्मक राहणं, निराश न होणं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फार महत्त्वाचं आहे. हे तिने मला या उदाहरणावरुन अधोरेखित केलं.
आमच्या खवय्येगिरीबद्दल सांगायचं तर माझी आईचं बालपण कर्नाटकमध्ये गेलं. त्यामुळे तिकडचा फ्लेव्हर तिच्या पाककौशल्यात आलाय. तिथल्या पद्धतीचे दडपे पोहे ती अत्यंत चविष्ट करते. तर माझ्या हातची थाई करी आणि अन्य मॉडर्न डिशेस तिला खूप आवडतात.
आम्हाला भटकंतीचीही खूप आवड आहे. तिला वाराणसी किंवा हम्पीसारख्या ठिकाणी घेऊन जायला मला नक्की आवडेल.
कोणताही शॉर्टकट न घेता आयुष्यात अपार कष्ट करुन ध्येय गाठावं, हा आईने दिलेला मंत्र मी आयुष्यभर जपणार आहे, जोपासणार आहे. असंही अश्विनी भिडे यांनी गप्पांची सांगता करताना सांगितलं.