दैव देतं कर्म नेतं, केकेआरनं हाती आलेला विजय स्वतःच्या हाताने लखनौच्या झोळीत टाकला...

आज झालेल्या कोलकाता विरूद्ध लखनौ सामन्यामध्ये एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता संघाने त्यांच्या हाती आलेला विजय स्वतःच्या हाताने लखनौच्या झोळीत टाकला...
कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांनी फलंदाजीसाठी लखनौला आमंत्रण दिले..तुमच्याकडे चक्रवर्ती आणि नारायण सारखे मिस्ट्री स्पिनर असताना धावफलकावर धावा लावून लखनौ संघाला दबावात ठेवण्याची संधी का गमावली...खरे तर पंडित गुरुजी या बाबतीत हुशार असताना असा निर्णय का घेतला गेला..?
पूर्ण ताज्या असलेल्या खेळपट्टीवर मार्श आणि माकरम यांनी धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली..हे दोन्ही फलंदाज त्यांच्या त्यांच्या देशाकडून जेव्हा खेळत असतात तेव्हा ते जशी फलंदाजी करतात तशीच फलंदाजी त्यांनी आज केली..आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल..कट..थोड्या वर असलेल्या चेंडूवर ड्राईव्ह... फ्लिक असे सर्वच फटक्यांची मुक्त उधळण केली. त्यांनी 99 धावांची सलामी दिली ती 62 चेंडूत.. माकरम बाद झाल्यावर आला तो निकोलस पूरन...
आक्रमकता हा कॅरेबियन क्रिकेटचा स्थायीभाव आहे...पण हीच आक्रमकता कधी कधी विरोधी संघासाठी निष्ठूर आक्रमकता होते..याची सुरुवात खऱ्या अर्थाने विव रिचर्ड्स ने केली..आणि आज त्या पालखीचा भोई आहे तो निकोलस पूरन...
तो जेव्हा मैदानात आला तेव्हा 11 षटकात 100 धावा झाल्या होत्या..म्हणजे निकोलस साठी तयार कॅनव्हास जिच्यावर हा कलाकार आपल्या फटक्यांच्या ब्रश ने कारागिरी करणार होता...काय नाही आहे निकोलस कडे.. सणसणीत ड्राईव्ह, पुल जो फाइन लेग पासून काऊ कॉर्नर पर्यंत सहज जातो...कट..रिव्हर्स स्वीप.. स्लॉग स्वीप..आणखीन बरेच काही...आल्या आल्या त्याने मार्श सोबत 30 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली...आणि नंतर 18 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली त्यात समद फक्त 6 धावा काढून होता..मार्श आणि पुरण ने धावफलकावर 238 धावा लावल्या...
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाची सुरुवात थोडी अडखळत झाली कारण डीकॉक लवकरच तंबूत गेला...पण मग अजिंक्य आल्यावर नारायण आणि अजिंक्य यांनी 6 षटकात 90 धावा काढून आपली जिद्द दाखविली..त्यात अजिंक्य ला आल्या आल्या एक जीवदान मिळालं होतं...
नारायण आणि अजिंक्य यांनी 23 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली..त्यानंतर अजिंक्य आणि वेंकटेश यांनी 40 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली इथपर्यंत सगळ्या गोष्टी कलकत्ता संघाच्या बाजूने होत्या..पण नंतर 13 व्या षटकात नाट्यमय घडामोडी घडल्या..तेव्हा धावा हव्या होत्या 48 चेंडूत 90...त्या षटकात शार्दुल ठाकूर याने सलग 5 चेंडू वाईड टाकले..म्हणजे त्याने एकूण 11 चेंडू ...पण नशिबाने पाडलेल्या दानाचा लाभ कोलकता संघाला घेता आला नाही...त्यात धावा आल्या फक्त 13 आणि शेवटच्या चेंडूवर जो फुलटॉस होता..त्याच्यावर 4 धावा मिळण्या ऐवजी अजिंक्य बाद झाला...आणि इथूनच कलकत्ता संघाचे नशीब बदलले...
अजिंक्य ची जागा घेणारा रमणदीप बिश्नईला बाहेर फेकून देताना सीमारेषेवर बाद झाला...त्याच्या नंतर रघुवंशी फूल टॉस वर रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाला...आणि पुन्हा एकदा शार्दुलने फुल टॉस वर रसेल ला बाद करून कलकत्ता संघाला बॅकफूट वर नेले...कोलकाता संघ प्रत्येक वेळी अडचणीत असेल आणि येणारा रिंकू सिंग मिरॅकल करेल असे प्रत्येक वेळी होत नसते..या वेळी सुद्धा नाही झाले..
238 धावा पार करून इतिहास घडविण्याची संधी कोलकाता संघाने वाया घालविली...या विजयाने आज पुन्हा एकदा गोयंका साहेब आनंदात असतील...पण पराभूत झाल्यावर ही किंग खान आपल्या संघाच्या पाठीवर हात ठेवेल..कारण हार कर जितने वालो को बाजीगर कहते है... हे त्याच्याच सिनेमातील वाक्य आहे...कारण तो किंग आहे..

























