एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किळसवाणे स्पर्श आणि पुरुषफोबिया
"मी सातवीत होते. बसने जायचे शाळेला. एक दिवशी बसमध्ये अजिबातच गर्दी नव्हती माझ्या शेजारी एक वयस्कर पुरुष बसला. मी खिडकीतून धावणारी वाहनं, पळणारे ढग बघण्यात गुंग झाले होते आणि एकदम त्या माणसाने एका हाताने माझी छाती दाबली आणि दुसरा हात त्याने… दुसरा हात त्याने मांड्यांमध्ये घातला. मी एकदम घाबरले. या धक्क्यातून सावरतेय तोवर तो शेजारचा माणूस उतरुनही गेला होता. तेव्हापासून मला पुरुषाच्या स्पर्शाची किळस वाटते.
नवीन लग्न झालेल्या मित्राचा भल्या सकाळी फोन येतो. फोनवरच्या त्याच्या खचल्या आवाजाने माझा चेष्टेचा मूड आल्यापावली परत फिरतो. मी काळजीच्या स्वरात विचारते त्याच्या हताश आवाजामागचं कारण. तेव्हा त्याचाही बांध फुटतो. तो अडथळ्याशिवाय भडाभडा बोलू लागतो, "लग्न होऊन एक महिना झाला. बायकोने अजून अंगाला हातही लावू दिलेला नाही. रोज रात्री तिचा मूड बघून जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तर ती हातभर अंतर राखत पाठमोरी झोपी जाते. साधा हातात हातही घेऊ देत नाही, झिडकारते. तिच्या अशा अॅबनॉर्मल वागण्याचं कारण विचारलं तरी चकार शब्दानं काही सांगत नाही. घरात आम्ही दोघेच कुणाला सांगणार? अक्षरशः वैतागलोय मी. खूप स्वप्नं डोळ्यात घेऊन लग्न केलय गं मी." आतापर्यंत कुठल्याच मुलीकडे डोळे वर करुन न पाहिलेल्या मित्राचे डबडबलेले डोळे मला दूरुनही दिसले.
दुसऱ्या दिवशी त्याचं घर गाठलं. नवी नवरी असूनही कोमेजल्या फुलासारखा चेहरा झालेल्या मित्राच्या बायकोला विश्वासात घेऊन तिच्या नवऱ्याच्या स्पर्शाला झिडकारण्यामागचं कारण विचारलं. तिने स्वतःहून माझा हातात हात घेतला आणि कातर झालेल्या आवाजात सांगू लागली. "मी सातवीत होते. बसने जायचे शाळेला. एक दिवशी बसमध्ये अजिबातच गर्दी नव्हती माझ्या शेजारी एक वयस्कर पुरुष बसला. मी खिडकीतून धावणारी वाहनं, पळणारे ढग बघण्यात गुंग झाले होते आणि एकदम त्या माणसाने एका हाताने माझी छाती दाबली आणि दुसरा हात त्याने… दुसरा हात त्याने मांड्यांमध्ये घातला. मी एकदम घाबरले. या धक्क्यातून सावरतेय तोवर तो शेजारचा माणूस उतरुनही गेला होता. तेव्हापासून मला पुरुषाच्या स्पर्शाची किळस वाटते. आजवर मी कुठल्याच पुरुषाच्या हातात हात दिला नाही. भले तो हात अभिनंदन करण्यासाठी पुढे केलेला असो वा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. मी बसमधेही जागा नसेल उभी राहते पण पुरुषाशेजारी रिकामी जागा असली तरी बसत नाही. मला पुरुषाची भीती वाटते. पुरुषाचा स्पर्शच मला किळसवाणा वाटतो. म्हणून लग्न झालेल्या नवऱ्यालाही जवळ येऊ देता आलं नाही मला. मला फारच अपराधी वाटतंय. पण मला यातून बाहेर पडता येत नाहीय." नवऱ्याच्या शरीर भावनांना न्याय देऊ शकत नसल्याची बोच तिच्या मनाला लागली होती हे तिच्या बोलण्यातून कळून आलं. एका उत्तम काऊन्सलरचं कार्ड मित्राच्या हातात सुपूर्द केलं खरं पण परतताना वेगवेगळ्या प्रश्नांचं, विचारांचं भलं मोठं गाठोडं सोबत घेऊन आले आणि सोबत संतापाने डोक्याच्या झालेल्या चिंध्याही, कारण असो म्हणून सोडून देण्याइतका हा प्रश्न साधा नव्हता. नाही.
लहानपणी पुरुषाच्या किळसवाण्या स्पर्शाचा अनुभव मिळाल्याने एकूण पुरुषजातीबद्दल आणि पुरुषस्पर्शाबद्दल एकप्रकारची घृणा अनेक मुलींच्या मनात निर्माण झालेली असते. त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरच नाहीतर संपूर्ण आयुष्यावर होतो. या गोष्टीमुळे कितीतरी जोडप्यांची वैवाहिक आयुष्यं उद्ध्वस्त होतात. किंवा अशा स्पर्शाला सामोरे गेलेल्या मुलींच्या मनात कायमचा पुरुषफोबिया आणि पुरुषघृणा निर्माण होते. पुरुषफोबियामुळे त्या लग्न नाकारतात, पुरुषमित्र नाकारतात एवढंच नाही तर त्या सगळ्याच पुरुषांना एकाच पूर्वग्रहदूषित चष्म्यातून बघतात. त्या स्वतःच्या नकळत स्वतःवर आणि एकूण पुरुषवर्गावरच अन्याय करतात. घरातील आणि बाहेरील प्रत्येक पुरुष त्यांच्या संशयाच्या रडारवर असतो. या एकूण प्रकाराची शिक्षा त्यांना स्वतःला तर भोगावी लागतेच सोबत त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषालाही.
पुरुषस्पर्शाची सुंदर अनुभूती या मुलींना कधीही घेता येत नाही. चांगल्या भावनेतून कुणी पाठीवर शाबासकीची थाप टाकली, खांद्यावर हात टाकला किंवा हातात हात दिला तरी त्या बिचकतात. समोरच्या पुरुषाला आपलं काही चुकलंय का असं वाटण्याइतपत त्या थरथरतात. या सगळ्याला जबाबदार ते पुरुष असतात जे स्त्रीस्पर्शाची क्षणिक वासना शमवण्यासाठी नीच पातळीवर उतरलेले असतात. असे पुरुष बाईच्या ठराविक अवयवाला कधी स्पर्श करता येईल, केवळ याच संधीच्या शोधात असतात. रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, बाजारात अशा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी हे पुरुष चान्स मारुन (ही त्यांचीच भाषा) घेतात. बहुतेकवेळा एवढ्या गर्दीत नेमका कुठल्या पुरुषाने स्पर्श केलाय हे संबंधित स्त्रीला लक्षात येत नाही आणि आले तरी त्याविरुद्ध बोंब ठोकता येत नाही. 'आपणच कशाला हातानं आपल्या अब्रूचं खोबरं करुन घ्यावं?' असा विचार करुन त्या गप्प बसतात. अशा पुरुषांना स्त्रियांचं नेमकं काय दुखणं काय आहे हे पक्कं माहित झालंय. त्यामुळे आपण कुठल्याही बाईला, मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श केला तरी ती काही करु शकत नाही हे त्यांच्या मनावर कोरलं गेलंय. हव्या त्या वेळी आवाज न उठवल्याचे दूरगामी परिणाम पुढे अनेकींना भोगावे लागतात.
सतत अशा अनुभवांना सामोऱ्या गेलेल्या मुली स्वतःच्या कोषात राहणंच अधिक पसंत करतात. फारशा माणसांत मिसळत नाहीत, मनातल्या गोष्टी कुणाशी शेअर करत नाहीत. पण त्यांनी स्वतःभोवाती तयार केलेला हा कोष तोडण्याचा प्रयत्न जेव्हा जोडीदार करतो तेव्हा मात्र त्या त्याला झिडकारतात. हे झिडकारणं, त्यामागची कारणं एखादा पुरुष समजून घेतो तर बऱ्याचवेळा बहुतेक पुरुष अशा स्त्रियांना "थंड" हे विशेषण लावून मोकळे होतात. त्यांच्या थंड असण्यामागची कारणमिमांसा करण्यात क्वचितच एखाद्याला रस असतो.
अनेकदा अशा किळसवाण्या स्पर्शाची शिकार झालेल्या स्त्रिया सरसकट सगळ्याच पुरुषांना वासनांध म्हणून मोकळ्या होतात. पण हा तद्दन मूर्खपणाच. असेही कित्येक पुरुष आहेत जे रस्त्यावरून चालताना मध्ये एखादी बाई, मुलगी आली तर स्वतः बाजूला होत तिला वाट करुन देतात. बसमध्ये शेजारी स्त्री असेल तर तिला चुकूनही स्पर्श होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. एखादीला कुणी रोडरोमिओ शिट्ट्या घालत असेल, तिचा पाठलाग करत असेल तर त्या रोडरोमिओची धुलाई करणारेही पुरुष आहेत. अशा पुरुषांच्या सानिध्यात कमालीची सुरक्षितता अनुभवता येते. हे पूर्वग्रहविरहीत दृष्टिकोनातून अनुभवलं तर प्रत्येकीच्या ध्यानात येईल.
सगळीकडेच मुली असुरक्षित आहेत म्हणून त्यांना आपण घरात डांबून ठेऊ शकत नाही. किंवा चार पुरुष नालायक निघतात म्हणून एकूण पुरुषवर्गापासून मुलींना दूर ठेवता येत नाही. किंवा सरसकट दिसेल त्या पुरुषाला नैतिकतेचे धडे देणंही प्रशस्त नाही. आजघडीला मुलींना जर पुरुषांच्या किळसवाण्या स्पर्शापासून, शारीरिक लगटीपासून दूर ठेवायचं असेल किंवा तशा अनुभवावर मात करायची असेल तर स्वतःला प्रचंड कॉन्फिडन्ट आणि धीट बनवण्यापासून पर्याय नाही. कुठेही, कधीही, कुणीही तसा स्पर्श करण्याचा प्रयत्न करु धजलं तरी त्याविरुद्ध आवाज उठवायला शिकलं पाहिजे. आणि असं धाडसं दाखवलं तरच पुरुषांच्या किळसवाण्या स्पर्शामुळे निर्माण होणाऱ्या पुरुषफोबियापासून त्या वाचतील.
कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग्स
श्रावण महिन्यात बाई व्रतांच्या फेऱ्यातघरकाम करणारा पुरुष बायल्या नव्हे!
"शाकाहार Vs मांसाहार : काही दुर्लक्षित, काही अचर्चित मुद्दे"
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement