एक्स्प्लोर
बाई...मी मॉडर्न बाई!
कधीकाळी पुरूषांच्या व्यसनीपणाचा निषेध करणारी बाई सिगारेट ओठात धरून" मै फिक्र को धुँवे मे उडाती चली गयी" म्हणतेय ही एकवीसाव्या शतकातल्या बाईची कोणती आधुनिकता आहे. आपल्या शारीरिक आरोग्याची ऐशीतैशी करत सिगारेटंची वलयं बेफिकीरपणे हवेत सोडणे आणि बियरचे पेगवर पेग रिचवणे म्हणजे बाईचं माॕडर्न असणं आहे का?

मी फेसबुक लॉगइन करते. मला टाइमलाईनवर सतत माझ्या मैत्रीणींचे वेगवेगळ्या पोजेस मधले फोटो दिसतात. मैत्रीणी छान दिसतात. मी लाईक करते. कधी लव देते. पुढे निघून जाते. हे नेहमीचंच यात नवं काही नाही. पण मला एके दिवशी माझ्या तीन मैत्रीणींचे सलग तीन फोटो दिसले ज्यात दोघीजणी बेभानपणे सिगारेट ओठाला लावून धूर हवेत सोडत होत्या. तिसरीचा बियरची बाटली एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने काढलेला सेल्फी होता. आणि वरती कॅप्शन होते ' चिअर्स मैत्रीणींनो!' मी बराच वेळ या तिन्ही फोटोंवर रेंगाळले. नेहमीसारखे मला फोटो लाईक करावेसे वाटले नाहीत. लव तर अजिबातच द्यावे वाटत नाही. मी फेसबुक लॉगआऊट झाले. इन्साग्रामवर गेले तिथेही तेच फोटो दिमाखात अपलोड केलेले दिसले. त्या मैत्रीणींने व्हॉट्सअप डीपीही त्याच फोटोंनी सजलेले दिसले. मी मोबाईल बाजूला ठेऊन विचार करत राहिले.
सिगारेट ओठाला लावून धूर सोडत आणि बियरच्या बाटल्यांसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यातून या माझ्या मैत्रीणींना नेमका कोणता बोल्डनेस दाखवायचा आहे? या कृतीतून त्यांना स्वतःतली बाई नेमका कोणता विद्रोह करते आहे ते अधोरेखित करायचं आहे? फेमिनीझम म्हणजे पुरूषांसारखं होणं, त्यांच्यासारखी व्यसनं करणं हे समाजमनावर ठसवायचं आहे का? की त्यांना स्वतःचं बाई असणं झुगारून देत पुरूष व्हायचंय? आपल्यातल्या कोणत्या सुप्त अभिलाषेचं त्या सार्वजनिक प्रदर्शन करू इच्छिताहेत? कधीकाळी पुरूषांच्या व्यसनीपणाचा निषेध करणारी बाई सिगारेट ओठात धरून" मै फिक्र को धुँवे मे उडाती चली गयी" म्हणतेय ही एकवीसाव्या शतकातल्या बाईची कोणती आधुनिकता आहे. आपल्या शारीरिक आरोग्याची ऐशीतैशी करत सिगारेटंची वलयं बेफिकीरपणे हवेत सोडणे आणि बियरचे पेगवर पेग रिचवणे म्हणजे बाईचं माॕडर्न असणं आहे का? असे एक ना अनेक प्रश्न बराच वेळ मनाचा आणि मेंदूचा ताबा घेत राहिले.
"बाई बदलतेय, बाई सजग होतेय, बाईला तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाणिव होतेय. ती पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जातेय, प्रगती करतेय. बाई परंपरा झुगारून आधुनिक होतेय." बाईच्या समकालीन रुपाविषयी बोलताना प्रत्येकजण हीच घिसीपीटी कॅसेट चालू करतो. बाईचं आधुनिक होणं हे केवळ पुरूषी वेश धारण करत त्यांच्यासारखी व्यसनं करण्यातच सामावलेलं आहे का? पाश्चिमात्य देशातील स्त्री जे काही (दारू पिणं,सिगारेट ओढणं,नवनवे बॉयफ्रेंड करणं) करते आहे ते सगळं करून बघणं म्हणजेच इथल्या स्त्रीचं आधुनिक होणं असेल तर त्याचा पुर्नविचार होणं गरजेचं आहे असं वाटतं कारण ही उथळ आधुनिकता शहरापासून गावखेड्यापर्यंत एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी पसरत चालली आहे. आणि ही आधुनिकता पसरत जाण्याचं आजच्या काळातलं सर्वात प्रभावी माध्यम जर कुठलं असेल तर ते म्हणजे सोशल मीडिया.
दहावी झाली की गावातल्या कॉलेजमध्ये शिकायला जाणाऱ्या मुलींच्या हातात स्मार्टफोन येऊ लागला आहे. स्मार्टफोनचा वापर हा फेसबुक आणि व्हॉट्सअपसाठी करतात हीच प्राथमिक माहिती त्यांना असते. याच आकलनातून हळूहळू त्या या सगळ्या सोशल जगाशी, तिथल्या सतत बदलणाऱ्या वातावरणाशी एकरूप होऊ लागल्या आहेत. रोज नव्याने मिळणाऱ्या सोशल अक्टिव्हिटीजची त्यांना भुरळ नाही पडली तर नवलच. शहरातील आपल्या मॉडर्न मैत्रीणींकडे बघून त्या पंजाबी ड्रेसऐवजी जिन्स टॉप घालू लागल्या आहेत. स्वतःला आधुनिक रूपात पेश करण्यासाठी त्या आर्थिक आणि सामाजिक दोन्ही आघाड्यांवर कसरत करताना दिसताहेत. वेषभूषेबरोबर त्यांची भाषाही बदलते आहे. या सगळ्यांच बाबतीत त्या जर रोल मॉडल म्हणून कुणाकडे बघत असतील आपल्या स्वतःला आधुनिक म्हणवून घेणाऱ्या शहरी मैत्रीणींकडे आणि सोबतच फेसबुकवर भेटलेल्या निर्भिडपणे आपली मते, विचार मांडणाऱ्या आभासी मैत्रीणींकडे. पण स्वतंत्र विचारांच्या नावाखाली सिगारेट फुंकणं आणि दारू पिणं म्हणजेच जर आधुनिकता ठरत असेल तर ही बाब समकालीन स्त्रियांचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन भरकटवणारी आहे. स्त्रियांच्या मॉडर्न होण्याच्या बदलत्या (बिघडत्या) व्याख्या येणाऱ्या नव्या पिढ्यांसाठी घातक ठरणाऱ्या आहेत. याकडे डोळेझाक करून चालणार नाही.
आजपर्यंत बाईच्या जन्माला पुरून उरलेल्या परंपरा झुगारून देत स्वतंत्र विचार जगणाऱ्या आणि आपलं माणूस असणं ठळक करू इच्छिणाऱ्या शहरी स्वावलंबी मैत्रीणींचा हात धरून खेड्यातल्या वातावरणात, तिथल्या संस्कृतीत वाढलेल्या घडलेल्या पण शिक्षणातून चांगल्या वाईटाची जाणिव प्रगल्भ करू इच्छिणाऱ्या हजारो मुली आपल्या प्रगतीशील भविष्याकडं वाटचाल करू पाहताहेत. हे सुखावह चित्र असलं तरी या चित्राच्या पलिकडे तितकेच धोकेही दडलेले आहेत. आपल्या शहरी मैत्रीणींचं उच्चशिक्षित, स्वावलंबी असणं, धार्मिक प्रथा परंपरा झुगारून लावणं जेवढं या खेड्यातल्या मुलींना भुरळ घालतंय तितकंच गोंधळात पाडतंय ते म्हणजे या मैत्रीणींचं सिगारेटी फुंकणं, विकेंडला बियर पार्ट्या करणं (असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं). आणि याच ऐंजॉयमेंटला आधुनिकतेचं लेबल लावणं..काय योग्य काय अयोग्य या संभ्रमात त्या आहेत.
गावखेड्यातील पालक मोठ्या धाडसाने आपल्या मुलींना शिक्षणासाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात पाठवत आहेत. शहरातील मॉडर्न मुली आपल्या गावातील मुलींना सांभाळून घेतील हा विश्वास त्यांच्या मनात आहे. छोट्या-छोट्या गावातून स्वप्नांचे पंख लेवून शहरात आलेल्या आपल्या बहिणींना योग्य दिशा देण्याचं काम हे शहरातील स्वतंत्र विचारांची कास धरलेल्या मुलींचं आहे. पण याच शहरी मुली आधुनिकतेच्या नावाखाली जर सिगारेटी फुंकण्याचे आणि दारू पिण्याचे आदर्श त्यांच्यासमोर ठेवत असतील तर हे त्या मुलींच्या आणि एकूणच सामाजिक भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. दारू पिणाऱ्या, सिगारेटी फुंकणाऱ्या ( आणि सोबतच ही कृती करतानाचे आपले फोटो सोशल मीडियावर विजयी मुद्रेने अपलोड करणाऱ्या). बाईचं एक माणूस म्हणून स्वतंत्र विचार करणं, सनातन परंपरांना मोठ्या धाडसाने उधळून लावणं जितकं कौतुकास्पद आहे, तितकंच निषेधार्ह आहे आधुनिक होण्याच्या नावाखाली स्वतःसाठी आणि सामाजासाठी घातक असणारी कोणतीही कृती करणं. याच मुलींचं" आम्ही स्वतंत्र आहोत, काय योग्य काय अयोग्य याची जाण आम्हांला आहे. कुणासाठी आम्ही आदर्श निर्माण करू इच्छित नाही. आम्हांला हवं तसं वागू, हवं तसं जगू." असं म्हणणं मला प्रचंड स्वार्थी आणि स्वतःची असणारी सामाजिक जबाबदारी फाट्यावर मारण्यासारखं वाटतं.
पुरूषांच्या सिगारेटी फुंकण्याचं, दारू पिण्याचं समर्थन होऊ शकत नाही तर स्त्रियांच्याही नाही. गार्गी-मैत्रेयीपासून सावित्रीबाईंपर्यंत कित्येकींनी आपले मॉडर्न विचार (होय, त्यांचे विचार आणि कृतीही मॉडर्नच होती.) अंमलात आणले ते तमाम स्त्रीवर्गाच्या शाश्वत कल्याणासाठी. आजवरच्या स्त्रियांनीही त्यांच्याच वाटेवर चालत नवीनवी क्षितीजं काबिज केली. पण आजच्या उच्चशिक्षित, स्वावलंबी स्त्रियांचे मॉडर्न विचार आणि बिहेवियर हे समाजमनावर (आणि त्यांच्या स्वतःच्या शरीरावरही) घातक परिणाम करणारे आहेत. आणि सोबतच त्यांच्याकडे आशेने बघणाऱ्या नव्या पिढ्यांना चुकीच्या मार्गावर चालायला प्रवृत्त करणारं आहे.
काय चूक काय बरोबर याची जाण न आलेल्या मुलींना आधुनिक होणं म्हणजे शारीरिक आरोग्याची काळजी फाट्यावर मारत खुलेआम सिगारेटी फुंकणं, दारू पिणं हेच वाटलं तर त्याला संपूर्णपणे जबाबदार अशी कृती करणाऱ्या आणि सोबतच अशा कृतींचं समर्थन करणाऱ्या स्त्रियाच आहेत. स्त्रीने आयुष्याच्या गाडीला आधुनिकतेचा गिअर टाकणं जितकं गरजेचं आहे तितकंच आवश्यक आहे पण ती आधुनिकता नेमकी कोणत्या रूपात स्प्रेड व्हायला हवी आहे हे तपासणंही.
सर्वांगसुंदर भविष्याची स्वप्नं डोळ्यात घेऊन प्रत्येक घरात, शाळेत फुलपाखरांसारख्या बागडणाऱ्या मुलींनी आता नेमके कोणाचे आणि कशाचे आदर्श घ्यायचेत हा खरंतर मोठा पेचच आहे. कारण, आजची स्त्री आधुनिकतेच्या नावाखाली शिगारेटींच्या धुरात आणि दारूच्या घोटात स्वतःचं स्त्री असणंच विसरत चालली आहे.
-कविता ननवरे
View More
Advertisement
Advertisement

























