IND vs AUS: कांगारु अडकले फिरकीच्या जाळ्यात
तिसऱ्या दिवशीच खेळ खल्लास. पूर्वी ताकदवान ऑस्ट्रेलियासमोर खेळणाऱ्या टीमची अशी हालत व्हायची की, अशी हेडलाईन करावी लागत असे. मॅग्रा, ली, गिलिस्पी आणि वॉर्न ही चौकडी प्रतिस्पर्धी फलंदाजीचा पालापाचोळा करत असे. मात्र आज नागपूर कसोटीत कांगारुंच्या टीमची भारतीय संघाने दाणादाण उडवली आणि तिसऱ्या दिवशी चहापानाआधीच खेळ खल्लास केला.
खरं म्हटलं तर कमिन्सची टीम पूर्ण तयारीनिशी या सामन्यात उतरली होती. अश्विनसारखी शैली असणाऱ्या पिठिया या गोलंदाजासमोर ऑसी टीमने कसून सराव केला होता. फिरकीशी जुळवून घेण्याचा हा प्रयत्न होता. त्यांनी अभ्यास खूप केला, तरीही त्यांना फिरकीचा पेपर काही सोडवता आला नाही. पहिल्या डावात जडेजा तर दुसऱ्या डावात अश्विन नावाचं कोडं त्यांना सुटलंच नाही. सर्वबाद 91 ही स्कोरलाईन ऑस्ट्रेलियन टीमसाठी फार कधी वाचायला मिळत नाही. विशेषत: ज्या प्लेईंग इलेव्हनमध्ये वॉर्नर, स्मिथ, ख्वाजा, लबूशेन अशी फलंदाजांची तगडी फौज आहे, तिथे तर नाहीच. तरीही ऑस्ट्रेलियन टीमकडे तिसऱ्या दिवशीच्या खेळपट्टीवर उभं राहण्याचीही क्षमता दिसलीच नाही.
पहिल्या डावात त्यांचे चार तर दुसऱ्या डावात त्यांचे सहा फलंदाज पायचीत म्हणजे एलबीडब्ल्यू झाले. चेंडूची लाईन मिस केल्याचं अथवा ते अजिबात न कळल्याचंच हे सूचक होतं. यातही आणखी बारकावा पाहायचा असेल तर पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात पाच फलंदाज हे फिरकी माऱ्यासमोर पायचीत झालेत. मालिकेतील तीन सामने बाकी असताना हे चित्र ऑसी संघ व्यवस्थापनाला दीर्घ विचार करायला लावणारं आहे. पहिल्या डावात कांगारु टीमने 63.5 आणि दुसऱ्या डावात 32.3ओव्हर्स फलंदाजी केली. तर भारताने खेळलेल्या एकमेव डावात 139.3 ओव्हर्स खेळू काढल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहणं ही बेसिक गोष्ट आहे. अर्थात सध्याच्या ट्वेन्टी-20, वनडेच्या जमान्यात सामने कसोटी सामने जवळपास सर्वच वेळी निकाली ठरतात. कारण, बरेच फलंदाज खेळपट्टीवर उभं राहण्यापेक्षा फटके खेळण्याला प्राधान्य देतात. ज्यामुळे धावाही होतात आणि विकेट्सही पडतात. असं असलं तरीही नागपूरसारख्या फलंदाजांची खडतर परीक्षा घेणाऱ्या खेळपट्टीवर चिवटपणा, संयम हेही बाण तुमच्या भात्यात असावे लागतात.
रोहित शर्माने 344 मिनिटे खेळपट्टीवर तग धरला. जडेजाने 185 चेंडूंमध्ये 70 तर अक्षर पटेलने 174 चेंडूंमध्ये 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तीही तिसऱ्या दिवशीच्या खेळपट्टीवर. जेव्हा ती फिरकीला अधिक पोषक होऊ लागली होती, तेव्हा या निव्वळ फलंदाज नसलेल्या दोघांनी वेगात खेळत धावा जमवल्या. याउलट दोन्ही संघांमधील फलंदाजांचा एकत्रित विचार केल्यास शतकवीर रोहित शर्माचा खणखणीत अपवाद वगळता अन्य स्पेशालिस्ट फलंदाज पन्नासची वेसही ओलांडू शकले नाहीत. ही भारतीय टीमसाठीही विचारात घेण्यासारखी बाब आहे. हात लावीन तिथे सोनं या शैलीने विचार करायचा झाल्यास, सामना खेळीन तिथे धावा काढीन, अशा फॉर्मात असणाऱ्या शुभमन गिलला बाहेर ठेवून आपण राहुलला खेळवलंय. पुढच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये हा मुद्दा विचारात येऊ शकतो. भारतीय फिरकी त्रिकूट आणि शमी-सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. शमीने वॉर्नरचा पहिल्या डावात उडवलेला त्रिफळा तर दुसऱ्या डावात लायनला केलेलं क्लीन बोल्ड मन सुखावणारं चित्र होतं.
खेळपट्टी अनप्लेएबल नक्कीच नव्हती. म्हणजे बघा ना, रोहित वगळता अक्षर, जडेजा आणि शमी या तिघांच्या धावा सर्वाधिक आहेत, जे स्पेशालिस्ट फलंदाज नव्हेत. रोहितने स्वप्नवत फलंदाजी केली. मखमली टच त्याच्या फलंदाजीत जाणवत होता. जडेजा, अक्षरने आक्रमण आणि बचावाचा उत्तम मेळ घालत कांगारुंना दाद लागू दिली नाही. ऑस्ट्रेलियाचं आक्रमण धारदार असतं. यावेळी ही धार अभावानेच दिसली. म्हणजे कमिन्ससारखा वर्ल्ड क्लास गोलंदाज फार थ्रेटनिंग वाटला नाही. तर, ऑफ स्पिनर लायनही फिरकीला धार्जिण्या खेळपट्टीवर 49 ओव्हर्स टाकून अवघी एक विकेट काढू शकला. त्याच खेळपट्टीवर जडेजा-अश्विन जोडीने मिळून पहिल्या डावात 37.5 षटकांत 8 विकेट्स घेतल्यात तर, दुसऱ्या डावात जडेजा-अश्विन-अक्षर या त्रयीने 27 ओव्हर्समध्ये ८ विकेट्स घेतल्यात. लायनने भारताच्या राईड हँडेड बॅट्समननाही अनेकदा अराऊंड द विकेट गोलंदाजी केली, जो माझ्या मते बचावात्मक पवित्रा होता. यामुळे तुम्ही धावा रोखू शकता, पण, तुमची विकेट काढण्याची टक्केवारी कमी होत असते. एलबीडब्ल्यूचा ऑप्शनही समीकरणातून बाद होतो. आक्रमक बाण्याच्या टॉनिकवर वाढलेल्या कांगारुंकडून हे अपेक्षित नाही.
सध्याचं क्रिकेट इतकं कॉम्पिटिटिव्ह झालंय की, गोलंदाजांनाही फलंदाजीत थोडंफार कॉन्ट्रिब्युट करावंच लागतं. इथेही ऑसी टीम कमी पडली. त्यांच्या दोन्ही डावात मिळून तळच्या चार जणांनी अवघ्या 18 धावा केल्या, तर भारताच्या एकाच डावात या तळाच्या चार फलंदांजांचं योगदान होतं 130 धावांचं. खेळाच्या जवळपास सर्वच आघाड्यांवर भारतीय टीम सरस ठरली. त्यांचं वर्चस्व इतकं होतं की, भारतीय टीमने अनेकदा कॅचेस सोडूनही दोन दिवस, दोन सत्रात आपण कांगारुंची शिकार केली.
इतका एकहाती विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमचा विश्वास दुणावला असेलच. असं असलं तरीही कांगारुंची गेल्या तीन मालिकांमधील पराभवाची भळभळती जखम आणखी गहिरी झाली असेल, त्यामुळेच त्यांना कमी लेखण्याची चूक भारत नक्कीच करणार नाही. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत इतक्या एकतर्फी सामन्याची आपल्याला सवय नाही, तसा या दोन संघांमधल्या मालिकांचा इतिहासही नाही. दोन्ही संघ एकमेकांना नाकात दम आणेपर्यंत झुंज देतात आणि ज्या टीमचा दम ज्या दिवशी जास्त घुमतो, ती टीम आपली नौका विजयाच्या तीरावर नेते. येणाऱ्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ऑसी टीमकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा ठेवतानाच भारतीय संघाकडून अशाच डॉमिनेटिंग परफॉर्मन्सची आशा करुया.