फूडफिरस्ता : न्यू रिफ्रेशमेंट हाऊस
वास्तविक नाव ‘न्यू रेफ्रेशमेंट हाऊस’ असलं तरी अनेक वर्ष इथे नियमित येणारे ग्राहकदेखील ह्याला ‘बादशाही’ नावानी ओळखतात.पण ‘बादशाही’ही पुण्यातली नामांकित खानावळ तर ह्याच्या शेजारी आहे.मग ह्याला बादशाही म्हणून ओळखायचं कारण काय?ती एक वेगळीच कथा आहे.

लक्ष्मी रस्त्यानंतर पुणे शहरात मानाचा म्हणता येईल असा दुसरा रस्ता म्हणजे टिळक रस्ता. पुण्यातल्या प्रत्येक जन्मजात व्यक्ती, संस्थेसारखेच लोकमान्यांच्या नावाच्या ह्या रस्त्याचे आपले एक स्वतंत्र ‘कल्चर’ आहे.
एका बाजूला पेशवाईच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या पुण्यातल्या पेठांमधल्या ‘जगप्रसिद्ध’ सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ किंवा स्वारगेटचा भाग आणि पानशेत पुरानंतर म्हणजे १९६१ नंतर विकसित होत गेलेल्या सहकारनगर, सिंहगड रस्ता आणि कोथरूड अश्या ‘नवीन’ पुण्यामधला हा रस्ता म्हणजे सगळ्यात मोठा दुवा.
स्वारगेटपासून सुरु होणारा आणि टिळक चौकात संपणारा हा तीनेक किलोमीटरचा रस्ता म्हणजे बहुरंगी पुण्याचा आरसा आहे.
लक्ष्मी रस्त्याचा मुळ स्वभाव जसा व्यावसायिक तसा ह्या रस्त्याचा मूळ स्वभाव खरंतर शैक्षणिक. प्रत्यक्ष लोकमान्यांनी स्थापन केलेली ‘न्यू इंग्लिश स्कूल’ शाळा,पलीकडेच साक्षात आचार्य अत्रेंसारख्या माजी विद्यार्थी आणि बहुरंगी व्यक्तिमत्वाने “टवाळ पोरांची आद्य शाळा” असे वर्णन केलेली (आमची) पेरूगेट भावे हायस्कूल स्कूल, मुलींच्या रेणुका स्वरूप, नूमवी आणि गोपाळ हायस्कूल, अशोक विद्यालयापर्यंतच्या अनेक ‘अवली’ शाळा.टिळक रस्त्यावरच असणारी स.प.,अभिनव कलामहाविद्यालय सारखी जुनी, नामांकित कॉलेजेस.प्रा.सुहास जोग,प्रा.चंद्रशेखर बेहेरे,अविनाशदादा धर्माधिकारी ह्यांच्यासारख्या हाडाच्या शिक्षकांनी सुरु केलेले आणि आता अक्षरशःशेकडोंच्या संख्येत झालेले क्लासेस आणि त्यात उभ्या महाराष्ट्रातून शिकायला आलेले हजारो विद्यार्थी,आजूबाजूच्या ऑफिसेस आणि गेल्या ३० वर्षात झालेल्या अनेक होलसेल फार्मसीजमध्ये काम करणाऱ्या माणसांनी हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून सतत गजबजलेला असतो.
सहाजिकच ह्या सगळ्यांना खायला घालणाऱ्या खानावळी (सॉरी आता ‘मेस’ म्हणायला पाहिजे),हॉटेल्सची कमी इथे पहिल्यापासूनच नाही.पण त्यातही नामवंत म्हणता येतील अशी मोजकीच हॉटेल्स बाकी फक्त आपले उदरभरण करणाऱ्या जागा.
टिळक स्मारक मंदिराच्या चौकातले “न्यू रिफ्रेशमेंट हाऊस”त्यापैकी एक.
वास्तविक नाव ‘न्यू रेफ्रेशमेंट हाऊस’ असलं तरी अनेक वर्ष इथे नियमित येणारे ग्राहकदेखील ह्याला ‘बादशाही’ नावानी ओळखतात.पण ‘बादशाही’ही पुण्यातली नामांकित खानावळ तर ह्याच्या शेजारी आहे.मग ह्याला बादशाही म्हणून ओळखायचं कारण काय?ती एक वेगळीच कथा आहे.

ह्याच जागेत ‘बादशाही’ सुरु केलं ते श्री.मोघे ह्यांनी,त्यात पहिल्यांदा भागीदार झाले दत्तात्रय उर्फ मामा सहस्त्रबुद्धे.ह्या दोघांनी टिळक रस्त्याच्या आसपास असणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदार लोकांकरता ‘बादशाही’ नावाने नाश्ता सेंटर सुरु केलं.सकाळपासून पोहे,शिरा,मिसळ,उसळ स्लाईस असे पदार्थ द्यायला सुरुवात केली.
ह्या उपक्रमात लवकरच खानावळ आणि अजून एक भागीदारांची भर पडली.सध्या आहे ती जागा कमी पडायला लागल्यावर शेजारी असलेली (सध्याच्या ‘बादशाही’खानावळीची)जागा घेण्यात आली.दोन्ही जागा एकत्र केल्यानंतर काही काळ दोन्ही व्यवसाय सुरु राहिले.पण जसे दोन्ही व्यवसाय वाढायला लागले तसे काही काळाने मामा सहस्रबुद्धे ह्यांनी भागीदारीतला खानावळीचा व्यवसाय सोडून,जुन्या कोपऱ्यावरच्याच जागेत एकट्यानेच पूर्वीचा म्हणजे नाश्ता सेंटरचा व्यवसाय सुरु ठेवायचा निर्णय घेतला,पण ‘बादशाही’ पेक्षा वेगळ्या नावाने.अश्या तर्हेने सुरुवात झाली जुन्याच जागी एका वेगळ्या नावाच्या हॉटेलची म्हणजे ‘न्यू रिफ्रेशमेंट हाऊस’ची.पण जरी त्यावेळी भागीदार वेगळे झाले असले तरी आधीच्या जागेच्या नावाच्या पसरलेल्या महतीमुळे,फक्त खानावळीचे नाव ‘बादशाही’ असूनही येणारे जुने लोक नाश्ता सेंटरलाही ‘बादशाही’च म्हणत राहिले.आणि ‘न्यू रिफ्रेशमेंट हाऊस’ हे जुन्या पुणेकरांच्या दृष्टीने केवळ कागदोपत्री उरले.
मामा सहस्रबुद्धे ह्यांच्यानंतर पहिल्यांदा त्यांचे पुत्र रमेश आणि त्यानंतर नातू कै.विनायक रमेश सहस्रबुद्धे ह्यांनी तोपर्यंत चांगलाच वहात्या झालेल्या ‘न्यू रिफ्रेशमेंट हाऊस’ची धुरा यशस्वीपणे सांभाळली.हॉटेलचे नाव उत्तम मराठी खाद्यपदार्थ मिळण्यासाठी पुण्यात प्रसिद्ध झाले.

२०१६ मध्ये कै.विनायक ह्यांच्या अकाली निधनाच्या आधी आपली सॉफ्टवेअर इंजिनीअरची शाश्वत नोकरी सोडून इथे अधूनमधून येणाऱ्या त्यांच्या पत्नी,श्रीमती मेधा सहस्रबुद्धे ह्यांनी हे हॉटेल पूर्णपणे बघायला सुरुवात केली.सोबतीला कै.विनायक ह्यांच्यासोबत काम केलेला आणि त्यांच्याही आधीपासून असलेला जुना स्टाफ मदतीला होता.

सुरुवातीचा काही काळ व्यवसायातले प्राथमिक खाचखळगे पार करण्यात गेल्यावर श्रीमती मेधा सहस्त्रबुद्धे ह्यांनी हॉटेलच्या किचन,मेन्युकार्ड,बिल अश्या प्रत्येक गोष्टीत बदल करायला सुरुवात केली.मुळात इथे आल्यावरचा वेळ फक्त कॅश काऊंटरवर पैसे मोजायला न बसता,आत भटारखान्यात एकेक पदार्थ बनवणे शिकण्यात घालवायला सुरुवात केली.अस्सल मराठी न्याहरीचे पदार्थ हीच आपली स्पेशालिटी आहे हे ओळखून त्यावर लक्ष केंद्रित केलं.

इथल्या किचनमधला स्टाफ कोकणातला आहे हे ओळखायला अस्सल खवैय्याला वेळ लागणार नाही.इथल्या जवळपास प्रत्येक पदार्थांमध्ये ओल्या खोबऱ्याचा मुक्तहस्ते केलेला वापर,हा त्याचा पहिला पुरावा.इथे सकाळच्या वेळी मिळणाऱ्या पोह्यांमधेही तुम्हाला शेंगदाणे दिसणार नाहीत पण कोकणी पद्धतीतलं ओलं खोबरं मात्र रग्गड दिसेल.त्यामुळे इथले अनेक पदार्थ दिसायला तिखट,चवीला किंचित गोडसर पण चविष्ट असतात,हा स्वानुभव आहे.

आधी म्हणालो तसं,मराठी नाश्ता हीच ‘न्यू रिफ्रेशमेंट हाऊस’ ची खरी खासियत.इथल्या एवढे नाश्त्याचे मराठी पदार्थ,“स्पेशालिटी मराठी क्युझीन्स”देण्याचा दावा करणाऱ्या अनेक ठिकाणी मिळत नाहीत.इथे गेले अनेक वर्ष ते मिळतात ते कुठलाही गाजावाजा न करता त्यामुळे त्याची किंमत अनेकांना समजत नाही.

इथे मिळणारी पुणेकरांची लाडकी “मटार उसळ”-पुरी,पुणेरी+कोकणी म्हणता येईल अशी फरसाण न घालता पोह्यांचा चिवडा आणि शेव घातलेली मिसळ,कांदा भजी,कोथिंबीर वडी त्याहीपेक्षा त्याच्याबरोबर वाढली जाणारी कोरडी चटणी ही माझी वैयक्तिक आवड.लसूण,मिरची आणि दाण्याच्या कुटात खोबरं आणि त्यात कांदा भजीचा तळलेला चुरा घालून [हे ‘ट्रेड सिक्रेट’ फक्त फुडफिरस्ताच्या ब्लॉग वाचकांसाठी ]रोज ताजी बनवली जाणारी ही चटणी मला स्वतःला भयंकर आवडते.पझ्न खर बघायला गेलं तर फक्त ही चटणीच नाही, तर इथला प्रत्येकच पदार्थ रोज ताजाच बनतो.तसंच हॉटेलमध्ये जगमान्य आणि सर्रास वापरला जाणारा खायचा सोडाही इथे वापरत नाहीत.येवढेच नाही तर एकदा वापरलेले तेलही दुसऱ्या दिवशी वापरले जातच नाही,तर ते फेकून देण्यात येते.

’इन हाऊस’बनवल्या जाणाऱ्या भाजणीचे थालीपीठ,कोकणी पद्धतीने केलेली घावनं आणि दादरच्या प्रकाशमधल्या चवीच्या जवळपास जाईल असं ' पियुष ' देणारं पुण्यातलं कदाचित हे एकमेव हॉटेल असावे,असा माझा अंदाज आहे.

उपासाच्या पदार्थात तर इथे रग्गड व्हरायटी असते.साबुदाणा खिचडी,उपास मिसळ,उपासाचा वडा,बटाटा टोस्ट,उपासाचे वडासांबार,उपासाचे घावन,दही साबुदाणा,साबुदाणा फ्राय अश्या अनेक गोष्टी पुणेरी ग्राहकांना भरल्या पोटी उपास करायला भाग पाडतात.पण अनेकजणांना माहिती नसलेला आणि इथल्या मेन्युकार्डवरही नसलेला एक पदार्थ इथली सिक्रेट स्पेशालिटी आहे.तो म्हणजे उपासाचे शाही कबाब.दाण्याचे कुट,आलं-मिरची आणि चक्का (हो श्रीखंडाचाच)बटाट्याच्या आवरणात घालून केलेले आंबट-गोड,तिखट चवीचे हे कबाब चवीला अफलातून लागतात.फक्त संकष्टी चतुर्थीलाच आणि तेही थोडक्याच प्रमाणात बनवले जाणारे उपासाचे शाही कबाब हातोहात खपतात.ते खाण्यासाठी,इथे शक्यतो सकाळीच भेट द्यायला लागते.

सध्या आपल्याकडच्या सतराअठरा जणांच्या स्टाफला घरच्या लोकांसारखेच मानणाऱ्या आणि त्याप्रमाणेच वागणाऱ्या मेधा सहस्रबुद्धे ‘न्यू रिफ्रेशमेंट हाऊस’ ह्या क्षेत्रात नवीन असूनही लीलया चालवतात.अर्थात कुठलेही ‘हाऊस’ चालवणे,अनेक पुरुषांना अवघड जात असले तरी एखाद्या स्त्री करता ते विशेष अवघड जात नाही.
फूडफिरस्ता सदरातील आधीचे ब्लॉग फूडफिरस्ता : फ्रुटशेक प्या, मुखाने हरिओम म्हणा ! फूडफिरस्ता : हरवलेल्या पुण्यातला सरदारचा ढाबा फूडफिरस्ता : पुण्यातील अमृततुल्य चहा फूडफिरस्ता : राजा आईसेस फूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली
























