एक्स्प्लोर
गोष्ट कोपर्डीची...
कोपर्डी हे तसं अत्यंत छोटं गाव. साधारण दोन-अडीच हजार लोकवस्तीचं. तिथून पाच-सहा किलोमीटरवर आहे कुळधरण जिथे निर्भयाची शाळा आहे. याच शाळेत जाऊन तिच्या मैत्रिणींना बोलतं करण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न होता. कोपर्डीची घटना घडल्यावर तिथल्या मुलींच्याही आयुष्यात भूकंप आला अनेक अर्थांनी.
आज सकाळपासूनच सगळ्यांचं लक्ष अहमदनगरच्या सत्र न्यायालयाकडे होतं. कोपर्डीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल येणार होता. साडेअकराच्या दरम्यान कोर्टाने तिनही आरोपींना फाशी सुनावली आणि राज्यभरातून समाधानाची भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
कोपर्डीच्या निमित्ताने राज्यभरातल्या मुलींचे अनेक प्रश्न चर्चेत आलं. अगदी सुरक्षेपासून ते त्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल. आज फाशी म्हणजे न्यायव्यवस्थेतली सर्वोच्च शिक्षा मिळालीय. पण या एका शिक्षेने सगळे प्रश्न मिटणार का, संपणार का हाच मोठा प्रश्न आहे. या घटनंतर मी दोनदा कोपर्डीला गेले. तिथलं जे वातावरण मी नजरेनं टिपलं. ज्या प्रतिक्रिया ऐकल्या त्या या लेखातनं मांडण्याचा प्रयत्न करतेय.
खरंतर गेल्या वेळी जेव्हा कोपर्डीला गेले तेव्हाच काहीतरी लिहिणार होते. पण नेहमीप्रमाणे राहूनच गेलं. ऑफिसच्या कामानिमित्त गेल्याच आठवड्यात पुन्हा कोपर्डीला गेले. गेल्या तीन महिन्यातली ही दुसरी फेरी. कोपर्डीच्या या घटनेचे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक अंगावर उमटलेले परिणाम तर आपल्या नजरेसमोर आहेतच. मी पहिल्यांदा कोपर्डीत १३ जुलै २०१७ ला म्हणजे निर्भयावर अत्याचार झाल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण होत असताना गेले. तर आता २२ नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर.
कोपर्डी हे तसं अत्यंत छोटं गाव. साधारण दोन-अडीच हजार लोकवस्तीचं. तिथून पाच-सहा किलोमीटरवर आहे कुळधरण जिथे निर्भयाची शाळा आहे. याच शाळेत जाऊन तिच्या मैत्रिणींना बोलतं करण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न होता. कोपर्डीची घटना घडल्यावर तिथल्या मुलींच्याही आयुष्यात भूकंप आला अनेक अर्थांनी.
खरंतर मी अत्यंत शहरी भागात लहानाची मोठी झाले, प्रचंड सुरक्षित वातावरणात वाढले, शिक्षणासाठी कसरत करावी, अनेक दिव्य पार करावी असं काहीही मी अनुभवलं नाही. पण मी कोपर्डीला गेले आणि ग्रामीण भागातल्या मुलींच्या आयुष्याचं, शिक्षणाचं वास्तव काय असतं याचं सत्य समोर आलं.
या घटनेतून सावरायला या सगळ्या मुलींना खूप वेळ लागला. अगदी आदल्या दिवशीपर्यंत जी मुलगी त्यांच्यासोबत खेळत होती, डबा खात होती, हसत होती, प्रवास करत होती अचानक तिच्यावर पाशवी पद्धतीनं अत्याचार होऊन तिची हत्या व्हावी या घटनेनं मुलींना मुळापासून हादरवलं. खरंतर यातल्या अनेक मुलींच्या घरातून शिक्षणाला पोषक वातावरणच नाही. आणि त्यात या घटनेची भर.
शहरातली मुलं हे कधीच समजू शकणार नाहीत की पुन्हा शाळेत येणं आणि नॉर्मल आयुष्य सुरु करणं या मुलींसाठी किती कठीण होतं. गेल्या सव्वा वर्षात या घटनेच्या भीतीने किंवा आपल्या मुलींच्या सुरक्षेच्या चिंतेनं या शाळेतल्या जवळपास १५ ते १७ मुलींची लहान वयातच लग्नं लावली गेली.
कुळधरणच्या शाळेत आसपासच्या अनेक गावातली मुलं येतात, कमीत कमी पाच किलोमीटर ते जास्तीत जास्त २० किलोमीटरचं अंतर कापत. येण्याचं साधन काही फिक्स नाही. बऱ्याच मुली चालत येतात एकमेकींच्या सोबतीनं, काही एस.टी बसने तर काही सायकलवरुन.
निर्भयाची घटना घडल्यावर या मुलींपेक्षा त्याचे आई-वडील अधिक हादरले. कुणीही मुलींना शाळेत पाठवण्यास तयार नाही. आई-वडिलांची समजूत काढली तर आजी-आजोबांचा शाळेत सोडण्यास तीव्र विरोध. जितक्या मुलींना मी भेटले, जितक्या मुलींशी बोलले त्या सगळ्यांची शिकण्याची तीव्र इच्छा आहे हे जाणवलं. ही घटना त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होती.
साधारण आठ-दहा दिवस लागले त्यांना नॉर्मल व्हायला. हळूहळू हिंमत करत त्या शाळेत येऊ लागल्या. पण आज सव्वा वर्ष लोटलंय तरीही त्यांच्या आयुष्यातले प्रश्न आणि समस्यांना अंतच नाहीय. त्या मुलींच्या अडचणी आणि मागण्या थोडक्यात सांगते
1. या मुलींना शाळेच्या वेळेत एस.टी बस हवी आहे. शाळा सुटते साडेचारला तर एसटीची वेळ आहे संध्याकाळी सहाची. दीड तास या मुली थांबणार कुठे, साधा एस.टी स्टँडही आसपास नाही
2. महत्त्वाची मागणी पोलिस स्टेशनची. कुळधरण आणि कोपर्डीपासून पोलिस स्टेशन आहे ३० किलोमीटरवर कर्जतला. या मुलींना तक्रार करण्याचं हक्काचं ठिकाणच इथे नाही. छेडछाड, गावगुडांचा त्रास यासारख्या गोष्टी घरी सांगितल्या तर शिक्षण थांबण्याचा धोका. त्यामुळे तक्रार निवारणासाठी किमान पोलिस हवेत ही खूप बेसिक मागणी.
3. या २०-२५ किलोमीटरच्या परिसरात ही एकच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे, बारावीपर्यंतची. यापुढचं शिक्षण घ्यायचं तर मुलींना कर्जत किंवा अहमदनगर हे दोनच पर्याय. जिथे शाळेसाठी सात आठ किलोमीटरंच अंतर कापायला मारामार तिथे २०-२५ किलोमीटरची काय बात. या मुलींना तिथे कॉलेज हवंय, उच्चशिक्षणासाठी. अनेक वर्ष ही मागणी पेंडिंग आहे.
4. सगळ्याच गोष्टी मोकळेपणानं सांगता येत नाहीत त्यामुळे एका तक्रार पेटीची सोय व्हावी अशी त्यांची इच्छा.
निर्भयासोबतच्या काही मुली राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत खेळतात. पण या मुलींच्या प्रॅक्टिसचे वांदे. कारण शाळा सुटल्यावर प्रॅक्टिससाठी थांबायला जेमतेम चार-पाच मुलींच्याच घरातून परवानगी आहे. इतरांच्या पालकांना मुली उशिरा आल्या तर त्यांच्या सुरक्षेची चिंता वाटते. संध्याकाळी सहानंतर मुलगी एकटी घरी येणार हे मान्य नाही आणि म्हणून त्यांच्या खेळावरही संक्रात.
आम्हाला सुरक्षित प्रवास हवा आहे असं या मुली कळकळीनं सांगतात. किती छोट्या आणि सहज पूर्ण होणाऱ्या मागण्यांसाठी या मुलींना झगडावं लागतंय. खरंतर या घटनेनंतर मुलींना मानसिक रित्या सावरायला शाळेनं खूप मदत केली. मुलींचं काऊंसिलिंग केलं. त्यांना कराटेचं प्रशिक्षण दिलं, त्यांच्या पालकांनाही विश्वास दिला. शाळेने त्यांच्यापरीनं सगळं केलं. पण शाळेलाही संस्था म्हणून अनेक बंधनं येतात आणि लहान वयात मुली शाळा सोडताना किंवा त्यांची लग्न होताना शाळाही हतबल असते.
गेल्या वेळी म्हणजे जुलै २०१७ ला मला निर्भयाच्या घरी किंवा कोपर्डीत जाता आलं नव्हतं. पण यावेळी २२ नोव्हेंबरला शाळेतला कार्यक्रम संपल्यावर मी कोपर्डीत गेले. तिकडे जाताना आमचा रिपोर्टर खरंतर वर्षभरापूर्वी तिथे कसं वातावरण होतं हे सांगत होता. अगदीच सूनसान रस्ता. चिटपाखरुही नसतं ना तसा. सिंगल डांबरी रोड आणि आजूबाजूला माळरान. बराच वेळ वस्तीची चाहूल नाही. ती निर्भया आणि तिच्या मैत्रिणी कशा प्रवास करत असतील याचा विचार मनात. कुणी मदतीसाठी ओरडलं तर दूरदूरवर कुणाला ऐकू जाणार नाही इतका निर्जन परिसर.
नकळत मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. प्रचंड रहदारीचा पण तितकाच सुरक्षित रस्ता. स्कूलबसमधून होणारा प्रवास. सोबतीला ओळखीचे ताई-दादा. मुंबईपासून ३५०-४००किमी दूर गेल्यावर चित्रं इतकं बदलू शकतं यावर विश्वासच बसेना.
खरंतर निर्भया कशी दिसत होती याचं चित्रं तिच्या मैत्रिणींच्या बोलण्यातून मी तयार केलेलं. अगदी दोन दिवस आधीपर्यंत किती सहजपणे ती याच रस्त्यावरुन गेली असेल. इथूनच येता जाताना आपल्या भविष्याची किती सुंदर स्वप्नं तिनं रंगवली असतील हेच विचार मनात असताना गाडी थांबली.
डाव्या बाजूला एक छोटसं घरं होतं. त्याला खेटून एक कुडाच्या भिंतींच खोपटं. समोरच्या अंगणात बांधलेली एक शेळी आणि पोलिसांचे मुक्कामाचे दोन तंबू. हेच निर्भयाच्या आजी-आजोबांचं घरं. याच घरातून त्यादिवशी मसाला घेऊन आपल्या घरी जाताना हा प्रसंग घडला.
तिथल्या वातावरणात कमालीची शांतता होती. जरा मागे वळले तर समोरच्याच शेतात असलेलं निर्भयाचं स्मारक दिसलं. घरात तशी कुणाचीच चाहुल नाही. कारण निकालाची अपेक्षा असल्याने सगळेच अहमदनगरला गेलेले. आम्ही थोडे पुढे गेलो. आमच्यासोबत असलेल्यांनी घटना नेमकी कुठे घडली त्या ठिकाणी नेलं. ती जागा बघणं आणि सोबतच्या माणसांकडून ती घटना ऐकणं खरंच त्रासदायक होतं. त्या कोवळ्या जीवाला किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच करवत नाही.
तिच्या आजी आजोबांच्या घरापासून मोजून १५० पावलांवर ही घटना घडली. नॉर्मल परिस्थातीत कुणी मोठ्यानं खोकलं तरी ऐकू जाईल इतकंच अंतर आहे हे. मधोमध पायवाट. एका बाजूला शेत आणि एकाबाजूला माळरान. त्या माळरानावरच ही घटना घडली. तिचा आवाज कुणालाच कसा ऐकू आला नाही? त्या कालावधीत त्या रस्त्यावरुन कुणीच कसं गेलं नाही? तिचं मन अजूनही तिथे भिरभिरत असेल का..? तिला काही सांगायचं असेल का..? तिच्या घरचे त्या जागेवरुन जाताना त्यांना काय वाटतं असेल..? हे विचारच खूप टोचतात, अस्वस्थ करतात.
आम्ही पुन्हा तिच्या घरी आलो. निर्भयाची आजी आली होती तोवर. आजीने ओट्यावर सतरंजी अंथरली आम्हाला बसायला. आजी फार काही बोलत नव्हत्या. दोन चार मिनिटं बसून आम्हीही उठत असताना आजी एकदम म्हणाल्या "अंगणातल्या गुलाबाला चांगली फुलं आली आहेत हवी असतील तर दोन चार घेऊन जा" मी फक्त हसले. माझा सहकारीअभिजीत म्हणाला, "आजी राहू दे, फुलं झाडावरच शोभून दिसतात". मी उठून अंगणात आले. त्या झाडाकडे पाहिलं. गुलाबाच्या फुलांनी ते गच्च भरलेलं होतं. मनात आलं या अंगणात हे झाडं तर चांगलं डवरलंय, फुललंय पण याच अंगणात बागडणाऱ्या एका कळीला मात्र बाजूलाच दीडशे पावलांच्या अंतरावर पाशवी मनोवृत्तीने कुस्करुन टाकलं.
निर्भयाच्या शाळेतल्या कार्यक्रमाच्या शेवटाला जी वाक्य बोलले तीच पुन्हा लिहिते. खरंतर निर्भायाच्या निमित्ताने इथल्या मुलींच्या शिक्षणाचा, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेला आला. तसं पाहिलं तर अशी अनेक गावं, वाड्या-वस्त्या असतील जिथल्या मुलींच्या वाट्याला हा असाच संघर्ष असेल.
आज निर्भयाच्या मारेकऱ्यांना शासन झालंय. पण इथल्या मुलींच्या आयुष्यातले प्रश्न दूर होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या मुलींची शिकण्याची इच्छा आहे तर शाळा नाही, शाळा आहे तर तिथे यायला वेळेत बस किंवा सुरक्षित साधनं नाहीत. ती आहेत तर रस्ते नाहीत, रस्ते आहेत तर त्यावर सुरक्षा नाही. पोलिस स्टेशन नाही. काही वर्षातच कोपर्डीतल्या आणि या परिसरातल्या मुलांच्या हातात 5G असलेला फोन येईल. एका मिनिटात कितीही मोठा व्हीडीओ डाऊनलोड होऊ शकेल. पण जेव्हा याच कोपर्डीच्या रस्त्यावर एक मिनिटं कोणतीही मुलगी कोणत्याही वेळी निर्भयपणे उभी राहू शकेल, तिला सुरक्षित वातावरण मिळेल तीच निर्भयाला खरी श्रद्धांजली आणि खरा न्याय असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement