(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : क्रिकेट आणि चित्रपट... हातात हात घालून चालणारे दोन प्रवाह
क्रिकेट आणि चित्रपट. दोन्हीमध्ये मनोरंजन. दोन्हीमध्ये पैसा, दोन्हीमध्ये रोमांच, दोन्हीमध्ये ग्लॅमर, दोन्ही मध्ये अंगभूत कलागुणांना मिळणारा वाव, दोन्हीमध्ये वंशवाद नव्हे तर प्रतिभेची आवश्यका आणि दोन्हीमध्ये प्रशंसकांची कोट्यावधींची संख्या. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रे वेगळी असली तरी त्यांच्यात खूप साम्य आहे. क्रिकेटच्या सामन्यांना चित्रपट कलाकार हजेरी लावतात तर चित्रपटांच्या मुहुर्ताला क्रिकेटर हजेरी लावतात. त्यामुळेच क्रिकेटवर आधारित अनेक चित्रपट आजवर तयार झालेत आणि पुढेही होत राहाणार आहेत. शाहिद कपूरचा जर्सी आणि वर्ल्ड कप विजयावर 83 असे दोन चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
चित्रपट आणि क्रिकेट यांच्या नात्यावर विचार करताना लगेचच शर्मिला टागोर डोळ्यासमोर येते. प्रख्यात क्रिकेटपटू मंसूर अली खान पतौडी यांच्याशी शर्मिला टागोर यांनी प्रेमविवाह केला होता. बंगाली शर्मिला टागोर यांची आणि पतौडीची भेट कोलकात्यात एका मित्राच्या घरी झाली आणि पहिल्या भेटीतच दोघांनी एकमेकांना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. पतौडी शर्मिलाला भेटवस्तू पाठवू लागले. एकदा तर त्यांनी त्या काळात सगळ्यात महागडी वस्तू म्हणजे फ्रीज शर्मिलाला भेट म्हणून पाठवला होता, असे सांगतात. तसेच पटौदी जेव्हा मॅच खेळायचे तेव्हा जर शर्मिला तिथे गेल्या तर शर्मिलाकडे ते सिक्सर मारायचे. शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
शर्मिलानंतर काही वर्षांनी रीना रॉयनेही पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले होते. परंतु नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. रीनाला सनम नावाची एक मुलगी आहे. यानंतर काही अभिनेत्रींचे पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर नाव जोडले गेले परंतु ती प्रेम प्रकरणे लग्नापर्यंत पुढे सरकली नाहीत. सलमानची प्रेमिका असलेल्या संगीता बिजलानीने मोहम्मद अझरुद्दीनबरोबर लग्न केले. परंतु या दोघांनीही नंतर घटस्फोट घेतला. हरभजन सिंहने अभिनेत्री गीता बसराबरोबर, युवराज सिंहने अभिनेत्री हेजेल कीचबरोबर, विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर आणि झहीर खानने सागरिका घाटगेबरोबर लग्न केले. या सगळ्यांचे संसार सध्या अत्यंत सुखात चालले आहे.
आता नजर टाकूया क्रिकेटवर आधारित चित्रपटांवर. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालला होता. गेल्यावर्षी स्वर्गवासी झालेल्या सुशांत सिंहने या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावर आधारित अजहर चित्रपटही तयार करण्यात आला होता. इमरान हाशमीने अझहरची भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली होती.
क्रिकेट विषय घेऊन तयार केलेल्या चित्रपटांमध्ये लगान हा पहिल्या क्रमांकावरील चित्रपट म्हणता येईल. देशात इंग्रजांची राजवट असताना ते शेतकऱ्यांकडून कर वसूल करायचे. हा कर माफ करण्यासाठी गावातील शेतकरी इंग्रजांच्या क्रिकेट टीमबरोबर मॅच खेळतात आणि मॅच जिंकून कर माफ करायला लावतात. आशुतोष गोवारीकरने अत्यंत उत्कृष्टपणे ही कथा पडद्यावर मांडली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला होता.
मात्र देव आनंद यांनी सर्वप्रथम म्हणजे 1959 मध्ये लव्ह मॅरेज चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका साकारून एका क्रिकेटपटूची प्रेमकथा पडद्यावर दाखवली होती. याच देव आनंद यांनी 1990 मध्ये आमिर खानला घेऊन अव्वल नंबरची निर्मिती केली होती. चित्रपटाची कथा क्रिकेटवर आधारितच होती.
एका मुक्या, बहिऱ्या मुलाचा क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा प्रवास इकबाल चित्रपटात दाखवण्यात आला होता. श्रेयस तळपदेने इकबालची तर नसिरुद्दीन शहा यांनी त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका या चित्रपटात साकारली. इकबालचा भारतीय क्रिकेट टीममध्ये कसा समावेश होतो ते अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. त्यानंतर ऑल राऊंडर नावाचाही एक चित्रपट आला होता, ज्यात कुमार गौरवने क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. राणी मुखर्जीने ही दिल बोले हडिप्पामध्ये महिला क्रिकेटपटूची कथा सांगण्याचा प्रयत्न केला होता.
आता हीच परंपरा जर्सी आणि 83 चित्रपट पुढे नेत आहेत.