सिटी स्कॅन केलाय, व्हाट्स अॅपवर रिपोर्ट पाठवलाय, एकदा बघून घ्याना, असे अनेक मेसेज डॉक्टरांच्या मोबाईलवर रोज आदळत आहे. संशयित कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना निदान करणारी महत्तवपूर्ण चाचणी आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन करण्यापेक्षा थेट एचआरसीटी-चेस्ट करून डॉक्टरांना पाठवत असल्याचे चित्र सध्या देशभरात आहे. कारण कोरोना होतो म्हणजे काय होते ? शरीरातील कोणत्या अवयवावर त्याचा ताण पडतो आणि तो कसा निकामी होतो? याबाबतची बहुतांश माहिती सर्वसामान्य माहिती नागरिकांना ज्ञात झालीआहे. सगळ्यांना एक कळालं आहे की फुफ्फुस 'सलामत' म्हणजे सगळं काही आयुष्यात आलबेल चाललंय. कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह तर येऊ द्या गोळ्या खाऊ, हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होऊ बरे होऊन पुन्हा घरी येऊ, अशीच काहीशी धारणा सर्वसामान्य नागरिकांची आहे. पण फुफ्फुसाच्या चाचणीत काही गोंधळ आढळला म्हणजे 'कुछ तो गडबड है' असा समज होऊन डोळ्यासामोर ऑक्सिजन मास्क लावलेल्या माणसाचे चित्र समोर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या सध्याच्या या घडीला दैनंदिन आरोग्यातील फुफ्फुसाचे महत्त्व आणखीच अधोरेखित झाले आहे. हे सर्व फुफ्फुस पुराण सांगण्यामागे कारण म्हणजे आज 25 सप्टेंबर, जागतिक फुफ्फुस दिन.
वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या आजरांच्या जनजागृतीसाठी वर्षभर विविध दिवशी अनेक दिवस देशासह जगभरात साजरे केले जातात. त्या दिवशी त्या विशिष्ट आजाराबद्दल विशेष करून जनसामान्यच्या आरोग्याकरता चर्चा घडवून आणली जाते आणि तो आजार होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची इतंभूत शास्त्रीय माहिती तज्ञांमार्फत दिली जाते. 25 सप्टेंबर रोजी जगभरात फुफ्फुस आणि त्याचे आरोग्य कसे सांभाळावे यावर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या या कोरोनामय काळात या संसर्ग आजाराच्या महामारीत 'फुफ्फुसाचे' महत्त्व अख्या जगाने ओळखले आहे. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते, आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाची फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो. त्यामुळे सध्याच्या काळात आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन या कोरोना निदानाच्या अगोदर छातीचा सिटी स्कॅन करून सगळे काही व्यस्थित आहे की नाही बघून घेतो. त्या स्कॅनच्या अहवालाच्या आधारे त्याचे 90% निदान केले जाते, मग आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन असा हा उलटा प्रवास वाटत असला तरी वास्तवात हे घडताना दिसत आहे. त्यामुळे सिटी स्कॅन करून घेणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्यांची गंभीर सिटी स्कॅनची चाचणी सर्वांना परवडावी म्हणून शासनाने राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले असून 16 स्लाईसच्या चाचणीसाठी दोन हजार, 16 ते 64 स्लाईसच्या चाचणीसाठी 2500 रुपये आणि 64 ते 256 स्लाईसच्या चाचणीसाठी 3000 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.
पुणे येथील के इ एम रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, " या कोरोनाकाळात नागरिकांना फुफ्फुसाचे महत्त्व लक्षात आले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक रुग्ण कोरोना असो किंवा नसो भेटून फुफ्फुस व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावे लागते त्याची काळजी कशी घ्यायची असे प्रश्न विचारायला लागले आहे. लोकामंध्ये बऱ्यापैकी जनजागृती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या आधीच्या काळातही फुफ्फुसाशी निगडित बरेच आजार होते, विशेष करून क्षयरोग (टीबी), काही अस्थमा, अनेक अन्य फुफ्फुसाचे संसर्ग असायचे तेव्हा आम्ही त्यांना मास्क लावायला सांगायचो मात्र तेव्हा त्यांना मास्क लावणे आवडत नव्हते आता मात्र काही प्रमाणात तरी नागरिक मास्क लावू लागले आहे. त्यांना फुफ्फुसाचे महत्त्व लक्षात आले आहे. विशेष म्हणजे फुफ्फुस हा शरीरातील एकमेव अवयव आहे ज्याचा थेट बाहेरच्या वातावरणाशी संबंध जी काही हवा वातावरणात असते ती आपण नाकाद्वारे आत घेऊन थेट फुफ्फुसात जात असते. ती हवा व्यवस्थित फिल्टर करण्याची व्यस्था फुफ्फुसात असते. पण जर का फुफ्फुसच निकामी झाले तर सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसतात, रक्तात ऑक्सिजन व्यवस्थित प्रमाणात मिसळला जात नाही. त्यामुळे फुफ्फुसाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता फुफ्फुसाचा व्यायाम म्हणून लोकांनी प्राणायाम केले पाहिजे नियमित चालले पाहिजे. "
कोरोनाच्या बाबतीत फुफ्फुसाचे नाते सांगताना, डॉ कुलकर्णी पुढे असेही सांगतात की, " साधारणतः कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना न्युमोनिया किंवा फुफ्फुसाला संसर्ग होतो. यामध्ये फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला म्हणजेच अल्वेओलायला इजा होते. शरीरात ऑक्सिजन घेतल्यानंतर फुफ्फुसातील अल्वेओलाय मार्फत त्या ऑक्सिजनची रक्ताशी देवाण-घेवाण होते आणि त्यामुळे आपल्या सर्व शरीराला ऑक्सिजन मिळत असते. जर अल्वेओलाय इजा झाली तर शरीराला ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागते आणि मग रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या सुरु होतात. मग अशावेळी रुग्णाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिला जातो. जो पर्यंत रुग्ण नैसर्गिक दृष्ट्या ऑक्सिजन घेत नाही, तो पर्यंत त्याला कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिले जाते. कोविडच्या रुग्णाला साधारण 4-5 दिवस ऑक्सिजन दिल्यानंतर तो पूर्वपदावर येतो. विशेष म्हणजे एखाद्या रुग्णाला जेव्हा ऑक्सिजन देण्याची वेळ येते त्यासाठी काही मापदंड आहे त्यानुसार रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. रुग्ण जर अतिगंभीर झाल्यास त्याला अति दक्षता विभागात हलविण्यात येते."
कोरोनाच्या आजरात विषाणूचा घशावाटे फुफ्फुसांवर प्रहार होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे की नाही ते ठरवतात. काही कोविडबाधित रुग्णांना फुफ्फुसाचे आजार होत असल्यामुळे या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लागण्याची शक्यता जास्त असते. कोरोनाच्या या आजरात फुफ्फुसाचे आरोग्य पाहण्यासाठी वैद्यकीय तज्ञांनी विशेष अशी गुणांकन पद्धती निश्चित केली आहे. ही गुणांकन पद्धती फुफ्फुसाच्या पाच भागात विभागण्यात आली आहे, फुफ्फसांच्या उजवा भाग म्हणजे वरचा कप्पा, मधला कप्पा आणि खालचा कप्पा तर डावा भाग म्हणजे वरचा कप्पा आणि खालचा कप्पा. प्रत्येक कप्प्याला 1 ते 5 गुण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार त्या कप्प्यानां किती इजा झाली आहे ते स्कॅनच्या चाचणीत डॉक्टरांना कळतं त्यानुसार गुण देऊन त्याचा एकूण गुणांकन केले जाते. त्यांच्यानुसार डॉक्टर त्याच्या फुफ्फुसाच्या इजांबाबत आपले मत व्यक्त करून उपचाराची दिशा निश्चित करत असतात.
गेली अनेक वर्षे रुग्णाचे केवळ फुफ्फुसाचे आरोग्य तपासणारे परळ येथील ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ञ डॉ समीर गर्दे सांगतात की, श्वास आहे तर जीवन आहे. ज्यावेळी फुफ्फुसाला इजा होते त्यावेळी श्वास घेता येत नाही, इतकं फुफ्फुसाचे आपल्या आयुष्यात महत्त्व आहे. फुफ्फुसाच्या आरोग्याची आजच्या काळात नव्हे तर आपण जो पर्यंत या भूतलावर आहोत तो पर्यंत घेणे गरजेचे आहे. नियमितपणे विविध फळे खाल्ल्याने आपण निश्चितच फुफ्फुसांच्या व्याधीला दूर ठेवू शकतो. कारण फळांमध्ये अँटीऑक्सिडेंन्ट असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहेत. त्याशिवाय विशेष म्हणजे प्रदूषणापासून दूर राहणे आवश्यक असले तरी ते अनेकवेळा शक्य होत नाही. मात्र आपल्या हातात जे आहे ते म्हणजे " घरात कुठल्याही पद्धीतीने धूर होणार नाही याची काळजी घेणे याची सुरुवात अगरबत्ती न लावणे, धूप न जाळणे, कुठल्याही पद्धतीच्या मच्छरविरोधी कॉइल्स न लावणे त्याचप्रमाणे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक लीक्विड न लावणे याचा थेट फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य राखणे आपल्या हातात आहे ते आपणच राखले पाहिजे हे कोरोनामुळे चांगलेच लक्षात आले आहे. तोंडावर मास्क लावणे आणि रस्त्यावर न थुंकणे या गोष्टी बऱ्यापैकी कोरोनाला आळा घालू शकतात."
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोरोनाचे उपचार करणाऱ्या रुग्णालयातील ऑक्सिजन वापरा संदर्भातील तपशील जाहीर केला आहे. त्याप्रमाणे राज्यात 1084 रुग्णालये आहे जी कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देत आहे आणि उपचारकरिता ऑक्सिजनचा वापर करत आहेत. त्यानुसार जवळपास 800 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन राज्यात दिवसभरात वापरला जात आहे. या सर्व ज्या रुग्णांना ऑक्सिजची गरज भासते याचा अर्थ त्याच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता काही काळापुरती मंदावते आणि कृत्रिम ऑक्सिजन दिल्यानंतर ती चांगली होत आहे. त्यामुळे या कोरोनाकाळात नागरिकांना फुफ्फुसाच्या आरोग्याचं महत्त्व व्यवस्थित कळले आहे आणि भविष्यात पण त्यांनी अशीच फुफ्फुसाची काळजी घेतली तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास त्यांना मदत होऊ शकते.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे