एक्स्प्लोर
मराठी संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करणारा अवलिया : राहुल देशपांडे
मराठीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात'. म्हणजेच, एखादं लहान मुल भविष्यात कोणत्या क्षेत्रात नाव कमावेल, हे त्याच्या लहानपणातल्या कृतीतून दिसून येतं. राहुल देशपांडेंच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरते.

फोटो सौजन्य : राहुल देशपांडे ट्विटर अकाऊंट
मराठीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात'. म्हणजेच, एखादं लहान मुल भविष्यात कोणत्या क्षेत्रात नाव कमावेल, हे त्याच्या लहानपणातल्या कृतीतून दिसून येतं. राहुल देशपांडेंच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरते. कारण स्वर्गीय किशोरीताई आमोणकर यांच्या गाण्यात तल्लिन असल्याचं पाहून त्यांचे आजोबा आणि सुप्रसिद्ध गायक स्वर्गीय वसंतराव देशपांडे यांनी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली आहे. शास्त्रीय संगीताचा विशेष करुन नाट्य संगीताचा आपला वारसा पुढे चालू ठेवेल,असं वसंतराव देशपांडे यांनी आपल्या हयातीत सांगितलं होतं. वसंतरावांचा हा वारसा राहूल यांनी अगदी समर्थपणे पेलला आहे.
वसंतरावांची अजरामर नाट्यगीते ऐकण्यासाठी आज लाखो रसिक राहुल देशपांडेंच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. आणि तेही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.
पण राहुल देशपांडेंचा सुरुवातीच्या काळात तबला वादनाकडे जास्त ओढा होता. मात्र, आजोबांच्या त्यांच्या इच्छेमुळे राहुलच्या वडिलांनी म्हणजे विजय देशपांडे यांनी त्यांना गायनाचं शिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी राहुल देशपांडे यांनी इच्छा नसताना गंगाधरबुवा पिंपळखरेंचं शिष्यत्त्व पत्करलं.
वास्तविक, देशपांडे कुटुंबीयांवर कुमार गंधर्वंचा त्यांच्या मोठा प्रभाव होता. कुमार गंधर्व आणि राहुलजींचे आजोबा यांच्यात मित्रत्वापेक्षा गुरु-शिष्याचं नातं जास्त मोठं होतं. हे नातं इतकं घट्ट होतं की, कुमारजी वसंतरावांच्या कधी घरी आले, तर दाराच्या चौकटीतच वसंतराव कुमारजींच्या पायावर डोकं टेकवून, त्यांना नमस्कार केल्याशिवा त्यांना (कुमारजींना) घरात घेत नसतं. इतकी त्यांची प्रबळ गुरुभक्ती होती.
विशेष म्हणजे, कुमारजींच्या निधनानंतर दोनच महिन्यांनी वसंतरावांचंही निधन झालं. यानंतर एक दिवस राहुल कुमारजींचे भक्ती गीतांचे रेकॉर्ड ऐकत होते. कुमारजींच्या गाण्यांनी त्यांना इतकं पछाडलं, की दिवस-रात्र भक्तीगीतांचा रियाज करु लागले. भक्तीगीतांचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्यांनी ऊषाताई चिप्पलकट्टींचं शिष्यत्व पत्करलं. तसेच नंतरच्या काळातही मुकुल शिवपुत्र (कुमार गंधर्वांचे पुत्र) यांच्याकडूनही गायनाचं शिक्षण घेतलं. जवळपास सहा-सात वर्ष ते मुकुलजींकडे शास्त्रीय संगीताचं तंत्रशुद्ध शिक्षण घेत होते.
पण महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर, त्यांच्या गाण्याच्या सरावावर परिणाम होऊ लागला. कारण लहानपणीच सी.ए. होण्याचं ध्येय उराशी बाळगल्यानं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. रोज सकाळी उठून आधी क्लास, मग दिवसभर आर्टिकलशिप आणि नंतर रात्री अभ्यास. असा त्यांचा दिनक्रम ठरला होता.
राहुलजींची ही धडपड पाहून पु.लं. देशपांडेंनी त्यांना गाण्याकडेच लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला. यानंतर सर्व कुटुंबीयांना एकत्रित बसवून त्यांनी यावर मत विचारलं. आजोबांची आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही हिच अपेक्षा असल्यानं, गायन क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. यामध्ये काही काळ त्यांनी वसंतरावांच्या फोटोसमोर बसून रियाज केला. कारण त्यांच्या आयुष्यात सर्वात पहिला गुरु कोण असेल? तर ते वसंतरावच होते. त्यामुळे आजही प्रत्येक कार्यक्रमापूर्वी आपल्या या गुरुचं पूजन करुन ते कार्यक्रमाची सुरुवात करतात.
आज त्यांच्या गायिकीला 25 वर्ष झाली आहेत. याकाळात त्यांनी अथक प्रयत्नांनी त्यांनी ख्याल गायनात आपला दबदबा निर्माण केला आहे. याशिवाय नाट्यसंगीत, भावगीत, भजन आदी सुगम संगीताच्या प्रकारांवर त्यांची हुकुमत आहे. त्यांच्या आवाजातील 'घेई छंद मकरंद'जेवढं कानांना गोड वाटतं, तेवढंच'कानडा विठ्ठलू' काळजाला भिडतं.
पारंपरिक संगीताला पुढे घेऊन जात असताना, राहुल आजच्या काळातल्या माध्यमांवरही तितकाच सक्रिय असतो. मैफलीतलं गाणं थेट फेसबुकवर आणून 'ऑडिओ ब्लॉग'च्या माध्यमातून चाहत्यांची फर्माइश लाईव्ह पूर्ण करणं, हा एक नवीन ट्रेण्ड त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात आणला आहे. संगितकार सलिल कुलकर्णीच्या साथीनं त्यांनी नुकतंच 'स्वामी समर्थां'वर गाणं तयार केलं. हे गाणं सोशल मीडियात तुफान गाजतंय.
गाणंच नव्हे, तर अनेक संगीत नाटकांमधूनही राहुलने त्याचं अभिनय कौशल्यही सिद्ध केलं आहे. 'कट्यार काळजात घुसली', 'संगीत संशयकल्लोळ', 'संगीत मानापमान'सारख्या नाटकांचं पुनरुज्जीवन करण्याचं महत्त्वाचंकाम त्यांनी केलंय. शिवाय, सुबोध भावे दिग्दर्शित 'बालगंधर्व'सिनेमाधी ल केशवराव भोसलेंची साकारलेली छोटीशी भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.
अभिनेता आणि सिनेदिग्दर्शक सुबोध भावेच्या साथीनं आपल्या आजोबांचं 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक मोठ्या पडद्यावर आणून, नाट्यसंगीतांचं एकप्रकारे पुनरुज्जीवन केलं आहे. याशिवाय, कट्यार काळजात घुसली आणि संगीत संशयकल्लोळचे प्रयोग देश-विदेशात होत आहेत. संगीत संशयकल्लोळ नाटकाला रसिकांची होत असलेली गर्दी ही त्याच्या कार्याची पोहोचपावती म्हणावी लागेल.
म्हणूनच त्यांना शास्त्रीय संगीतातील अलौकीक कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. संगीत क्षेत्रात त्यांचं नवं घराणं उदयास येत आहे. एबीपी माझानंही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना माझा सन्मान-2017 पुरस्कारानं नुकतच गौरवलं आहे. विश्वातल्या या सुरेल ताऱ्याला'एबीपी माझा'च्या खूप खूप शुभेच्छा!
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग

























