BLOG: 'बीआरएस'च आस्ते कदम...
राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील सगळेच महत्त्वाच्या पक्षांकडून यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. एकीकडे राज्यात अशी राजकीय परिस्थिती असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक घडामोड घडतेय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हळुवारपणे राज्याच्या राजकारणात एन्ट्री करतायत. सुरुवातीला नांदेड आणि आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील अनेक महत्त्वाचे नेते के सी आर यांच्या गळाला लागले आहे. विशेष म्हणजे बीआरएस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे. सोबतच 24 तारखेला संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बीआरएसच्या मेळाव्यात शेकडो नेत्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणासोबतच आता इतर राज्यात देखील वाढवण्यासाठी हालचाल सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. के सी आर यांनी आत्तापर्यंत मराठवाड्यातील नांदेडमध्ये दोन सभा घेतले आहे. तर तिसरी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. मात्र या सभेपूर्वीच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते कादिर मौलाना, काँग्रेस नेते फेरोज पटेल, संतोष माने यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तर काही शेतकरी नेते देखील बीआरएसच्या संपर्कात आहे. तर 24 तारखेला होणाऱ्या सभेत देखील अनेक प्रवेश होणार आहे. त्यामुळे बीआरएसमध्ये जणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
'बीआरएस'च आस्ते कदम....
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. तर राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. राज्याच्या राजकारणात अशी सर्व परिस्थिती असताना, दुसरीकडे के. चंद्रशेखर राव कोणताही गाजावाजा न करता हळुवारपणे आपला पक्ष महाराष्ट्रात वाढवत आहे. ज्या वेगाने त्यांच्या पक्षात पक्षप्रवेश सुरू आहे, ते पाहता बीआरएस पक्ष देखील लवकरच राज्यातील महत्वाच्या पक्षाच्या यादीत सामील होण्याचे चिन्ह दिसत आहे. राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्षात अनेक राजकीय नेते गेल्या काही दिवसात बाजूला पडले आहे. त्यामुळे अशाच नेत्यांना के सी आर आपल्या पक्षात स्थान देत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक बीआरएस मध्ये सामील झाले आहे. तर हा वेग आणखी काही दिवसात वाढण्याची देखील शक्यता आहे.
राष्ट्रवादीला मोठा फटका...
अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेमुळे आगामी काळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र दुसरीकडे के चंद्रशेखर राव यांनी प्रत्यक्षात राष्ट्रवादीला भगदाड पाडायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, राज्य सचिव प्रदीप सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष कदीर मौलाना, गंगापूर मतदारसंघातून गेल्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले संतोष माने यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्तापर्यंत बीआरएसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. तर अजून अनेक राष्ट्रवादीचे नेते वेटिंगवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी आलेल्या के चंद्रशेखर राव यांनी सुरुवातीला पहिला झटका राष्ट्रवादीला दिला असल्याची चर्चा आहे.
नाराजांचा गट 'बीआरएस'कडे...
आगामी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता सर्वच इच्छुक कामाला लागले आहे. पण प्रत्येक पक्षात एका इच्छुकाला दुसरा इच्छुकाचा विरोध आहेच. त्यामुळे पक्षात आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने किंवा उमेदवारीची शाश्वती नसलेल्या अनेक नेत्यांनी आता बीआरएसची वाट धरली आहे. सध्या तरी मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात शांतपणे एन्ट्री करतायत. पण आगामी काळात मात्र राज्याच्या राजकारणात बीआरएसची एन्ट्री धुमधडाक्यात झाल्यास नवल वाटू नये...!