रोज सकाळी उठलं की काही तरी नकारात्मक बातमी इच्छा नसताना सुद्धा डोक्यावर येऊन आपटते, झोपताना मन बैचैन होतं. कितीही नकारात्मक विचार करायचा नाही म्हटलं तरी या माहिती देणाऱ्या स्त्रोताने येवढा उच्छाद मांडलाय की काही तरी सतत कानावर पडत राहतंच. एखादा किंवा एखादी खूपच नियोजन करुन ह्या सगळ्या पासून दूर राहतात आणि यशस्वी होतातही. मात्र या कोरोना काळात काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडत आहेत त्याची चर्चा घडत नाही हा एक प्रश्नच आहे. सकारात्मक विचार ही उत्तम आरोग्याची गुरु किल्ली आहे. दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर मुंबई विभागात 'अवयवदान' झालं. 61 वर्षीय महिलेच्या अपघातानंतर ती मेंदूमृत अवस्थेत गेल्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे एका व्यक्तीला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. काही जण मृत झाल्यानंतर दुसऱ्या मृत्यूशय्येवर असणाऱ्या माणसाला जीवनदान देऊन जातात यापेक्षा मोठी गोष्ट काय ती असू शकते. या कोरोनामय काळात आपल्या राज्यातच ही घटना घडली आहे, का नाही आपण अशा बातम्यांवर चर्चा करत. या आणि अशा अनेक सकारात्मक घटना सध्या घडत आहे.
61 वर्षाच्या शैला धारगावे, यांचा 10 जूनला उल्हासनगर येथे अपघात झाला. अपघात इतका जबरदस्त होता की त्यांना तेथील लोकल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. मात्र ही घटना घडण्यापूर्वी शैला धारगावे यांनी आपल्या मृत्यू पश्चात आपले अवयवदान करण्यात यावे असं प्रतिज्ञा पत्र भरून ठेवले होते याची त्यांच्या मुलाला कल्पना होती. त्याप्रमाणे त्यांनी डॉक्टरांना अवयवदान करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णलयात नेण्यात आले जेथे अवयव काढण्यात आले. त्याचं यकृत या अवयवाचं केवळ दान करण्यात आलं. अन्य अवयव घेणे हे वैद्यकीयदृष्ट्या योग्य नव्हते. त्यांच्या या यकृत दानामुळे अनेक वर्ष यकृताच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्या प्रतीक्षा यादीवरील त्या व्यक्तीवर या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे त्या व्यक्तीस यापुढे चांगलं आयुष्य जगता येईल.


कोविड बाधितांच्या सर्वतोपरी आरोग्य सेवेसाठी झटत असताना, मुंबई महानगरपालिकेने कोविडसह इतर आजारांनीही ग्रासलेल्या रुग्णांसाठी सेवेमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नसून त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. वरळी येथे उभारण्यात आलेले एनएससीआय कोरोना केंद्र. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग व कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले असून त्यातून 126 जण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे कोविड बाधित एकही कर्क रुग्ण दगावलेला नसून, हे दुर्मिळ असे उदाहरण असावे. संपूर्ण जगाला कोविड 19 कोरोना विषाणूच्या संसर्गाने जेरीस आणले आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांना प्राणांतिक धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी महानगरपालिका घेत आहे.


14 एप्रिल ते 15 जून या काळात नायर रुग्णालयात 315 कोरोनाबाधित मातांची व्यवस्थित प्रसूती करण्यात आली. यामध्ये सगळी बालके आणि माता सर्वजण सुखरूप आहेत. महापालिकेच्या या रुग्णालयात प्रसूतीपैकी एका महिलेने तिळ्याला तर एकीने जुळ्याला जन्म दिला आहे. हे यश येथे काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि वैद्यकीय सहाय्यकांचं आहे. याबाबत डॉ नीरज महाजन, असोसिएट प्राध्यपक आणि नोडल अधिकारी, स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग, सांगतात की, "या सर्व प्रसूती सुखरुपपणे पार पाडण्यामध्ये रेसिडेंट डॉक्टरांचा मोठा सहभाग आहे. रात्र - दिवस हे डॉक्टर या विभागात महान घेऊन रुग्णांना उपचार देण्याचं काम करत असतात. एका रुग्णालयात इतक्या कमी काळात आणि ते सुद्धा कोरोनासारख्या प्रादुर्भावात काम करणे म्हणजे खरंच या सगळ्या डॉक्टरांचं कौतुक आहे".


कोरोनाचं थैमान सुरु झाल्यानंतर बहुतांश सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रिया करण्याचं काम जवळपास बंद केलं होत. कॅन्सरवर उपचार करण्याकरिता देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या टाटा हॉस्पिटलने मात्र मागील 37 दिवसात अत्यंत जटील आणि अवघड अशा 494 यशस्वी शस्त्रक्रिया या काळात पार पाडल्या आहेत. महत्वाचे म्हणजे अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाच्या 'अयनल्स ऑफ सर्जरी' या शास्त्रीय जर्नलने याची दखल घेली आहे. या रुग्णालयाचे उपसंचालक आणि शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी जगाला दाखवून दिले आहे की, कोरोना सारख्या वातावरणात यशस्वी शस्त्रक्रिया करता येतात. सर्व सहकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बळावर ही कामगिरी पार पडल्याचे डॉक्टर सांगतात.


भारतीय वैदकीय संशोधन परिषदेने, कोरोनसाठी चाचणी करण्याकरिता अँटीजन डिटेक्शन टेस्ट, आरटी-पीसीआरच्या मदतीने वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे रुग्णाची अतिशय जलद गतीने चाचणी करणे सोपे होणार आहे. या चाचणीकरिता नाकातून नमुने घेण्यात येणार आहे. अवघ्या एक तासाच्या आत या चाचणीचा निकाल रुग्णाला मिळणार आहे. येत्या काळात आपणास दिसू शकेल या चाचणीचा रुग्णांना किती फायदा होईल.


या आणि अशा अनेक सकारात्मक बातम्या आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्या सुद्धा वाचल्या गेल्या पाहिजे. या वरील सगळ्या बातम्यांमुळे फायदा किंवा तोटा यापेक्षा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. चांगल्या आणि वाईट बातम्या ह्या रोज येत राहणारच आणि प्रसारमाध्यमे ती दाखवत राहणारच त्यातलं नेमकं काय घ्यायचं ते आपल्या हातात आहे. त्यामुळे कोरोना काळात फक्त वाईटच घडतं असं नाही बऱ्याच चांगल्या घटना घडतात. बाकी कोरोनाचा आकडा हा पुढे-मागे होत राहणारच आहे, त्याचा काळ संपला की तो आटोक्यात येईलच, तोपर्यंत आपण सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर करायचा.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग