तो पण एक काळ होता, ज्यावेळी राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण कोरोनाच्या प्रादुर्भावावरील आकडेवारीनुसार केली जात होती, म्हणजेच ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा तीन झोन मध्ये त्यांची विभागणी करण्यात आली होती. तो काळ होता एप्रिल महिन्यातील. त्यावेळी आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितचं प्रमाण नसल्यासारखं होत. मात्र दिवसागणिक परिस्थिती बदलत गेली आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुणे शहराच्या जोडीला अख्खा महाराष्ट्र जोडला गेला. शहरापुरता मर्यादीत असणारा कोरोना आता ग्रामीण भागात चांगलाच पसरलाय. या काळात 'झोन' ची टप्पेवारी कधी नाहीशी झाली ही कोणलाही कळली सुद्धा आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे झोन ही संकल्पनाच मुळात संपुष्ठात आली.


ग्रीन झोन म्हणजे राज्यातील असे जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही, तर ऑरेंज झोन याचा अर्थ असा होता कि ज्या जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. रेड झोनच तर सांगायलाच नको, मोठ्या संख्यने ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे असा परिसर. सध्या राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


त्यावेळी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर हे जिल्हे रेड झोन मध्ये येत होते. तर ऑरेंज झोन मध्ये येणाऱ्या ह्या जिल्ह्यात रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ग्रीन झोन मध्ये येणारे या जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होता.


मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉक डाऊनचे 40 दिवसाचे दोन टप्पे पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती. या काळापर्यंत सगळं काही बरं चाललं होतं, शहरातल्या कोरोनाने ग्रामीण भागात फारसं डोकं न्हवतं काढलं. ग्रामीण भागातील लोकं शहरातील लोकांची विचारपूस करायचे, कसं चाललंय काही त्रास तर नाही ना असे विचारायचे. पण लॉकडाऊन शिथिलतेनंतर जसे शहरी भागातील लोकं, "गड्या, आपला गाव बरा" पद्धतीने जे गावाकडे धावत सुटलीत, त्यानंतर ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाने आपलं रूप दाखवायला सुरु केलं आणि पाय घट्ट करायला सुरुवात केली. ग्रामीण भागातील बऱ्यापैकी तालुक्यात जिल्ह्यात दिवसागणिक कमी संख्यने का होईना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील एकही जिल्हा नाही की जिथे कोरोना पोहचला नाही, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर हे तीन जिल्हे सोडले तर दुर्दैवाने सर्वच ठिकाणी कमी जास्त संख्यने या आजराने मृत्यू झाले आहेत.


ज्या या सहा जिल्ह्यांचा समावेश मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रीन झोनमध्ये येत होता उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा अशा सर्व जिल्ह्यामध्ये आज कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्याच्या घडीला पूर्ण राज्यच कोरोनामय झालं आहे.


अनेकांचं असं म्हणे आहे की, शहरी भागातील लोक गावाकडे गेले आणि त्यांनी कोरोना पसरवला. याप्रकरणी, राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी, डॉ प्रदीप आवटे सांगतात की, प्रत्येकाला आपल्या गावाकडे जाण्याचा अधिकार आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या गावाकडची वाट धरली. या अशा काळात शहरात राहण्यापेक्षा लोकांना आपल्या गावाकडे सुरक्षित वाटतं म्ह्णून ते तिकडे गेले. मात्र शहरातून गावाकडे जात असताना नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पळाले पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जे नियम आखून दिले आहेत त्याचे पालन केले पाहिजे. आता ग्रामीण भागातही तपासणीच्या सुविधा असून लोकांनी तिकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. उगाच लक्षण लपवून घरात बसणे योग्य नाही. योग्य वेळी इलाज केला तर कोरोना हा तसा बरा होणार आजार आहे".


या सगळ्या राज्याभर पसरलेल्या कोरोनामुळे आता शहरातील आरोग्य व्यवस्थेबरोबर प्रशासनाला ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना आता नियंत्रित करण्यात आरोग्य विभागाला यश प्राप्त होताना दिसत आहे. मात्र ज्या पद्धतीने शहरात आरोग्याच्या सुविधा मुबलक प्रमाणात आहे तेवढ्या सुविधा आजही ग्रामीण भागात उपलब्ध नाही हे कटू वास्तव आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे . त्यामुळे कोरोनाचे काही रुग्ण उपचारासाठी शहराकडे धाव घेताना दिसत आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यावर प्रशासनाला फोकस करावे लागणार आहे. खरं तर शासनाने राज्यभरात 103 प्रयोग शाळांची निर्मिती करून ठेवली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी चाचणी करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेतली आहे. ज्या पद्धतीने शहरी भागात ऑक्सिजनयुक्त बेड्सची निर्मिती करून ठेवण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता काही जिल्ह्यामध्ये प्रशासनाला तयारी करून ठेवावी लागणार आहे आणि करून ठेवली असेल तर उत्तमच आहे.


विशेष म्हणजे ग्रामीण भागात आजही नागरिक शासनाने कोरोना पासून बचाव करण्याकरिता जे नियम आखून दिले आहेत, ते पाळताना दिसत नाही. त्यामुळे या भागात त्यांना अजून या आजाराची जनजागृती करण्याची गरज आहे. कोरोनाचा फैलाव अधिक होण्या अगोदरच या ग्रामीण भागातील लोकांना दक्ष राहावे लागणार आहे. सुदैवाने ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा कमी असला तरी तो तेवढाच ठेवून किंवा कमी कसा करता येईल यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. शहरात जितकी वाढ होणे अपेक्षित आहे ती झाली आहे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र ग्रामीण भागात ज्या ठिकाणी रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात आहे तिथे वाढ होणारच नाही याकरिता नागरिकांनी सहभाग दर्शविला पाहिजे. नागरिकांच्या सहभागाशिवाय कोरोनाला हरविणे शक्य नाही, त्यामुळे नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. सुरक्षिततेचे सगळे नियम पाळून प्रत्येक गावकऱ्यांनी आपला गाव कोरोनमुक्त कसा राहील याचा विचार केला पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग