कोरोनाचं आगमन झाल्यावर महिन्याभरातच जगभरातील औषधनिर्मात्या विविध कंपन्यांनी औषध आणि लस काढण्याचे दावे केले आहे. मात्र अजून कुणीही कोणतं ठोस औषध-लस देण्यात यशस्वी झालेलं नाही. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी तर जाहीरपणे सांगितलंय की लस यायला किमान वर्ष-दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR)आपल्याच देशातील एका कंपनीला 15 ऑगस्ट पूर्वी मानवी चाचण्या करून ती सर्वत्र उपलब्ध करून दयावे असे सूचित केले आहे. मात्र इतक्या कमी कालावधीत ह्या लसीच्या मानवी चाचण्या करण्याचं आव्हान ही कंपनी कशापद्धतीने पेलणार यावर वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळी मतमतांतरे आहेत. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लस लवकरात - लवकर यावी ही अपेक्षा करणं चांगलं आहे, मात्र त्या लसीच्या निर्माण कार्यात त्या लसीच्या उपयुक्ततेबरोबर सुरक्षितता या दोन्ही गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे.


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या भारत बायोटेक Bharat Biotech कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोवॅक्सीन' Covaxin या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैदराबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. संपूर्ण देशात विविध संस्थांमध्ये मानवी चाचण्या करून त्याचे एकत्रित विश्लेषण करून दीड महिन्याच्या आत लस बाजारात उपलब्ध करून देणे, तसे अवघड असले तरी येत्या काळातच आपणास कळू शकेल की, ही लस इतक्या कमी कालावधीत नागरिकांसाठी उपलब्ध होईल किंवा नाही. माणूस आशावादी असतो त्यामुळे आशा धरायला हरकत काहीच नाही.


या लसीच्या मानवी चाचण्या करण्याकरिता देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये विशेष म्हणजे एक संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संस्थेचे नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे आहे. निवड करण्यात आलेल्या संस्थांनी लवकरात या चाचणीकरिता स्वतःहून इच्छुक असणारे आणि कोणताही आजार नसणारे निरोगी व्यक्तीची निवड करावयाची आहे. निवड झालेल्या संस्थानी लवकरच मानवी चाचणी करण्याकरिता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे देऊन परिषदेकडून परवानगी घेणं अपेक्षित आहे.


या प्रकरणी गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, यांनी एबीपी माझा ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, " खरं तर ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही या कोरोना या आजारावर उपयुक्त ठरणाऱ्या लसीच्या चाचणीचे काम करण्याचे भाग बनलो आहोत. या अगोदर सुद्धा आम्ही अशा पद्धतीच्या तीन लशी विकसित करण्याच्या चाचण्यांमध्ये सहभाग घेऊन हे काम पूर्ण केलेलं होते. तसे बघायला गेले तर आम्हाला अशा पद्धतीने काम करण्याचा चांगला अनुभव आहे. ज्या कंपनीने आमची निवड केली आहे त्याच कंपनीबरोबर आम्ही हे काम केले आहे. सध्या फक्त अडचण एवढीच आहे की हे काम आम्हाला दीड महिन्याच्या आत करून द्यायचे आहे. मी गेली 25 वर्ष डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम करीत असून अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत. हा दीड महिन्याचा कालावधी कमी असून मानवी चाचण्या करताना अशी एक विशिष्ट डेडलाईन ठेवून काम करणं थोडं अवघड ठरू शकते. त्यामुळे आता आम्ही निश्चित सांगू शकत नाही की आम्ही त्याच वेळेत चाचण्या पूर्ण करू. कारण या काळात आम्हाला या चाचण्या करण्याकरिता निरोगी व्यक्तीची निवड करावी लागते. त्यांची सहमती घेऊन त्यांच्यावर ही चाचणी घेतली जाते. पहिल्या टप्प्यात आम्ही 30-40 जणांवर याची चाचणी करणार आहोत. अशी माणसे शोधणं अवघड असते. मात्र माझं नागपूरमधील सर्व लोकांना आवाहन आहे की त्यांनी या मानवी चाचणी करण्याकरिता पुढे यावे आणि एक प्रकारे देशसेवेला हातभार लावावा."


ते पुढे असेही म्हणाले की," या चाचणीसाठी 18 ते 55 या वयोगटातील निरोगी व्यक्ती असणे अपेक्षित आहे. आमच्या अनुभवावरून सांगू शकतो की चाचण्या तशा सुरक्षित असतात. या चाचणी दरम्यान कुणा व्यक्तीस काही झाल्यास त्यांचावर सर्व उपचार मोफत केले जातात. त्यांच्याकरिता त्यांचा इन्शुरन्स काढून ठेवलेला असतो, तो किती असावा आणि काय यावर आज आमचे कंपनीबरोबर बोलणे होणार आहे. या चाचणीचे 2-3टप्पे असतात. एकदा त्या व्यक्तीवर चाचणी केली की, 15 दिवसाने त्याचे निकाल तपासले जातात. आम्हाला अपेक्षित असे निकाल आल्यास त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरवात होते. आम्ही सर्वच जण हे काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत".


लस बनविण्याकरिता किंवा त्यावरील क्लीनिकल ट्रायल झाल्यानंतर मानवी चाचण्या करणे हा खरा तर महत्वाचा टप्पा मनाला जातो. कारण त्या चाचण्यांचा मानवी शरीरावर कशापद्धतीने परिणाम होतो. त्या चाचण्यांचे काय निकाल येतात यावरच त्या लसीचे यश अवलंबून असते. कारण ह्या चाचण्या भारताच्या विविध भागात केल्या जाणार आहेत. या चाचण्या ह्या 2-3 टप्प्यात केल्या जातात. ह्या चाचण्या करण्याकरिता संस्थांनी योग्य तो वेळ घेऊन करणे अपेक्षित आहे, मात्र कोरोनाचा कहर पाहता त्यांना हे काम युद्धपातळीवर करावे लागणार आहे.


राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी, एन्डोक्राओनॉलॉजिस्ट (अंतःस्रावी तज्ञ) सांगतात की, "अख्ख्या जगभरात लस विकसित करण्याची एक पद्धत अवलंबली जाते. एखाद्या आजारावरची लस बनविताना त्याचे कोणते मोठे असे कोणते साईड इफेक्ट्स तर नाही ना या सगळ्या शक्यता तपासल्या जातात. एखाद्या लसीचे मानवी शरीरावर चाचण्या करण्याचे काही निकष ठरलेले असतात ते त्या पद्धतीनेच केले जातात. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही, कारण अंतिमतः त्या लसीचा उपयोग आजारी नागरिकांना बरे करण्यासाठी होत असतो. त्यामुळे निश्चितपणे त्याची सुरक्षितता आणि उपयुक्तता तपासली पाहिजे. दीड महिने म्हणजे हा कालावधी फार थोडा वाटतो. माझं मत आहे अशावेळी थोडा वेळ जास्त गेला तरी चालेल परंतु जी काही लस निघेल ती व्यवस्थितच असली पाहिजे."


"ज्यापद्धतीने ही लस विकसित करून बाजारात आणण्याकरिता धावपळ चालू आहे, त्या कष्टाचे चीज व्हावे अशीच अपेक्षा आहे. कारण लस लवकर बाजारात आली तर कोरोना या आजारामुळे आज जे मृत्यमुखी पडत आहे ते वाचण्यास नक्कीच मदत होणार"


कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत अशा पद्धतीने फास्ट-ट्रॅक ट्रायल घेणे आहे. ही चांगली गोष्ट आहे मात्र ज्या व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे त्याच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. सगळे नियम काटकोरपणे व्यवस्थित पाळून सर्व मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करून या मानवी चाचण्या केल्या पाहिजे. तसेच अशा पद्धतीची लस सर्वासाठी विकसित करून बाजारात आणताना कोणत्याही प्रकारचे खूप काळ शरीरावर असणारे साईड इफेक्ट्स होणार नाही याची काळजी घ्यावी." असे परळ येथील के इ एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता, डॉ. अविनाश सुपे सांगतात.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग