एक्स्प्लोर
Advertisement
तारक मेहतावाल्यांची हिंमत होते कशी?
मुंबईत किमान वर्ष काढलेल्या माणसाला आरामात मराठी येणे अपेक्षित आहे... पण पिढ्यानपिढ्या मुंबईत गेलेली माणसे जेव्हा मराठी माणसाशी हिंदीत बोलू लागतात, तेव्हा प्रश्न पडतो, की इतकी वर्षे यांना इथल्या भाषेशी जुळवून का घेता आले नाही? की मुळात जुळवूनच घ्यायचे नव्हते?
मुळात सीमाभागातला असल्याने मला मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि थोडीफार गोव्याची कोकणी भाषा जमते... म्हणजे त्या राज्यात गेलं की काही अडत नाही! आजोळ कोकणातलं असल्याने मालवणी तर हातखंडा... आता गेल्या १५ वर्षांपासून संबंध आला नसला तरी बेळगावात गेल्यावर कानडी आणि गोव्यात गेल्यावर कोकणी आपोआप ओठावर येते... माझा अनुभव तर असा आहे... की गडहिंग्लज ते सावंतवाडी या प्रवासात आपल्या सहप्रवाशांसह आपली भाषाही कधी बदलते ते कळत नाही!
इतकच काय, त्या भागातला मित्र जरी मुंबईत भेटला, तरी ती भाषा आपोआप जिभेवर रुळते...
कोल्हापुरात गेलो की दोन वाक्यात तीन शिव्या येतातच! कोल्हापुरी मित्र भेटला, तर मग काय विचारायची सोयच नाही! कारण त्या वाक्यांमध्ये शिव्यांचा अलंकार नसेल, तर ती कोल्हापुरी होऊच शकत नाही!
मल्याळम चित्रपटांची आवड असल्याने त्याही भाषेची थोडी फार तोंड ओळख झाली आहे!
सांगायचा मुद्दा हा, की आपण ज्या प्रांतात जातो, तिथले होऊन राहणे, याला कुणी धूर्तपणा म्हणेल, कुणी समंजसपणा म्हणेल... पण असा धूर्तपणा किंवा समंजसपणा आपल्या आजूबाजूला दिसतो का? तर प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे द्यावे लागेल!
दोन वर्षापूर्वी लडाखमध्ये शिक्षणाच्या वेगळ्या वाटा शोधणारे सोनम वांगचुक माझा कट्ट्यावर आले होते... थ्री इडियट्स फिल्ममधलं ‘फुनसुक वांगडू’ हे पात्र ज्यांच्यावर आधारित आहे तेच हे सोनम वांगचुक! त्यांच्या मते वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून मराठी न येणे... किंवा परप्रांतात राहून त्या प्रांताची भाषा न येणे ही अभिमानाची नाही, तर शरमेची गोष्ट आहे! इतकंच नाही... तर फक्त दोन आठवडे द्या... मी मराठी शिकून दाखवतो असे खुले आव्हानही त्यांनी दिले...
सोनम वांगचुक यांनी ज्या आत्मविश्वासाने हे आव्हान दिले... ते पाहता... मुंबईत किमान वर्ष काढलेल्या माणसाला आरामात मराठी येणे अपेक्षित आहे... पण पिढ्यानपिढ्या मुंबईत गेलेली माणसे जेव्हा मराठी माणसाशी हिंदीत बोलू लागतात, तेव्हा प्रश्न पडतो, की इतकी वर्षे यांना इथल्या भाषेशी जुळवून का घेता आले नाही? की मुळात जुळवूनच घ्यायचे नव्हते? आमच्या सोसायटीतल्या अनेक गुजराती कुटुंबाचंच उदाहरण घ्या... त्यांच्याशी मी कधी मराठीत बोलल्याचं मला आठवत नाही... आता मी त्यांच्याशी मराठीत बोललो नाही, ही माझी चूक असली... तरी त्यांनीही मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला नाही... हे ही तितकंच खरंय....
शेजारपाजारचेच काय... अगदी महानायक अमिताभ बच्चन यांचेच उदाहरण घ्या. गेल्या ५ दशकांपासून ते मुंबईत राहतात! कर्मभूमीने त्यांना जितकं दिलं, तितकं जन्मभूमीनेही दिले नाही! पण म्हणून त्यांनी कर्मभूमीची भाषा मात्र आत्मसात केली नाही! आता मुद्दाम केली नाही, की त्यांना करता आली नाही? हा वादाचा मुद्दा असू शकतो... शहारुख खानपासून अनेक दिग्गज कलाकारांनाही कधी मराठी बोलताना पाहिलेलं नाही...
अर्थात, त्याला अपवादही आहेत. आमिर खान, अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांना मराठीत बोलताना पाहिलं, की बरं वाटतं! पण बहुतांशी परप्रांतीय कलाकारांना कर्मभूमीची मराठी भाषा येत नाही, हे वास्तव आहे. कारण मराठीविना आपलं काही अडत नाही, हा आत्मविश्वासच नव्या भाषेच्या शिकण्यातला सर्वात मोठा अडथळा आहे!
आता परराज्यातून येणारे प्रशासकीय अधिकारी मात्र तोडकं-मोडकं का होईना, मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात... अवघ्या काही महिन्यांच्या सेवेमध्ये ते मराठी वृत्तवाहिन्यांना चटपटीत मराठीत बाईट देतात... त्याचं मुख्य कारण आहे... त्यांना महाराष्ट्रात काम करताना स्थानिकांशी जुळवून घ्यायचं असतं... आणि स्थानिकांशी जुळवून घेण्याचं उत्तम माध्यम म्हणजे त्यांची भाषा...
खरं तर देवनागरी लिपी असल्यानं किमान उत्तरेकडच्या कलाकारांना तर मराठी आत्मसात करणे काहीच अवघड नाही... बंगाली, उडिया, गुजराती, राजस्थानी या भाषा तर मराठीशी साधर्म्य साधतात... मग तरीही मराठीशी वावडं का?
आपण दक्षिणेत गेलो, की हिंदी बोलणाऱ्या भाषिकाचे पानही हलत नाही! कारण तिथल्या जनतेला हिंदीचा गंधही नाही! शिवाय मातृभाषेविषयी तिथल्या समाजात असलेले निस्सीम प्रेम, हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे! त्यामुळे तुमच्या भाषेत बोलण्यापेक्षा आपल्याच भाषेत संवाद साधण्याचा त्यांचा आग्रह असतो!
पण आपल्या महाराष्ट्रात तसे होते का? तर नाही! मुळात आपणच आपल्या मातृभाषेविषयी इतके निराशावादी आहोत, की तिला हेटाळण्यासाठी दुसऱ्या कुणाची आवश्यकता भासत नाही!
रिक्षाचालक हा परप्रांतीयच असणार, असा ग्रह करुन आपण त्याच्याशी भैया.... अंधेरी चलोगे अशा मजकुरासहीत.... हिंदीत संवाद सुरु करतो!
लोकलमधल्या भांडणांचे भरतवाक्य हे, चलो भाई, अंदर चलो... असे हिंदीतच असते!
नाक्यावरच्या वडापाववाल्याकडेही आपण हिंदीतच ऑर्डर सोडतो! भैया... जरा खोबरेकी चटनी देवो... अशा धेडगुजऱ्या हिंदीची चिंधी करतो!
पण हे असं का होतं? आपण आपली मुंबई ही हिंदी भाषिकांचीच आहे हे मान्य केले आहे का? मराठीतून संवाद साधला, तर आपण डाऊन मार्केट होतो का? की याचे मूळ कुठेतरी शिक्षणात दडले आहे?
मुळात शाळेपासूनच याची सुरुवात होते... मराठीविषयी प्रेम उत्पन्न व्हावे असे आपल्या शालेय अभ्यासक्रमात काहीच नव्हते! आताची कल्पना नाही, पण आमच्याकाळी भाषेविषयी गोडवा निर्माण करण्याऐवजी धास्तीच जास्त वाटायची!
संधी, समास, विग्रह, अलंकार, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, गण, आर्या अशा अगम्य गोष्टींनी आम्हाला मराठीपासून लांब नेलं... शुद्धलेखनाचा आग्रह असावा, पण अट्टाहास नको! पण आमच्याकाळी संवादापेक्षा शुद्धतेलाच जास्त महत्त्व...
शाळेतल्या कवितांचे अर्थ समजण्याऐवजी.... तिच्या पाठांतराचीच धास्ती वाटायची! रसग्रहण वगैरे राहिले बाजूला... कवितेतला तरल अर्थ कणसासारखा राहायचा बाजूला, आणि आम्ही कडबा रवंथ करायचो!
मराठी विषयीची अशी अनास्था पुढे वाढीला लागते, आणि त्याचे असे हे दूरगामी परिणाम दिसायला लागतात!
बरं शाळेतला हा धडा, पुढे बाहेरही गिरवला जातो! कारण घरातल्या पोरांना आपल्याच मातृभाषेपासून परावृत्त करण्यासाठी पालकही सज्ज असतात! आपलं कार्टं फाडफाड इंग्रजी बोलायला लागल्याशिवाय त्याचे कल्याणच होणार नाही, असा एक भ्रम पसरला आहे! त्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच इंग्रजी शाळेत घातलं जातं! आणि मग सोसायटीच्या गेटवर अगम्य इंग्रजीत भांडणारी पोरे पाहिली की हसूही येतं आणि चिंताही वाटते!
बरं या पोरांचे पालक मात्र जिल्हा परिषदेच्याच मराठी शाळेत शिकलेले असतात... पण पोरं मात्र कॉनव्हेंटमध्ये! मी पैज लावून सांगतो, 100 पैकी 99 मुलांना मुळाक्षरे एका दमात सांगता येणार नाहीत! पण एबीसीडी मात्र 100 पैकी 100 जण म्हणतील!
याचाच अर्थ मुळातच काही तरी चुकतंय! आताही सराकारने आपल्या कार्यालयांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य केला आहे! पण अशाने मराठीविषयी प्रेम, आपुलकी आणि अभिमान वाढेल? उलट आपण मराठीपासून दूर जाऊ!
सायनचे शीव किंवा बांद्र्याऐवजी वांद्रेपर्यंत ठीक आहे, पण उत्साहाच्या भरात फाईल मॅनेजमेंट सिस्टिमला 'धारिका व्यवस्थापन प्रणाली' असं भाषांतर करु नका! मराठी भाषा ही मोठ्या मनाची आहे, तिने अनेक परकीय शब्द आपल्यात सामावून घेतले आहेत! मराठीने आपल्या बाराखडीची चौदाखडी केली...अॅ आणि ऑ या दोन स्वरांचा अंतर्भाव केला... त्यामुळे मराठीला अनिवार्य करण्यापेक्षा अनुकूल करा! आणि त्यापेक्षा शाळेतली मराठी सुसह्य करा!
आता सरकार ते करेल की नाही माहित नाही... पण आपण काय करु शकतो... तर आपण जिथे आहोत... ती भाषा जपण्याचा प्रयत्न करु शकतो... महाराष्ट्रात आहात... तर अभिमानाने मराठीत बोला... कुणी मराठी बोलत नसेल... तर त्याला मराठीत बोलण्यासाठी प्रोत्साहित करा... तुम्ही परराज्यात गेलात... तर तिथली भाषा शिका... तिथे त्या भाषेत बोला... कारण दुसरी भाषा शिकल्याने मराठीविषयी प्रेम कमी होत नाही... उलट मराठी समृद्ध होईल... मराठी रुजेल... जगेल... वाढेल...
दोष तारक मेहतावाल्यांचा नाहीये, मराठी ऑप्शनला टाकणाऱ्या मराठी माणसांचाच आहे! मराठी ऑप्शनला टाकली नाही, तर तारक मेहतावाल्यांची अशी हिंमत होणार नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement