एक्स्प्लोर
फूडफिरस्ता : ब्युफे
जगातल्या प्रत्येक धर्मात अन्नदानाचं मोठं महत्व सांगितलेलं आहे. अन्न पिकवणाऱ्या व्यक्तीच्या श्रमाचा, त्याच्या होणाऱ्या नासाडीचा विचार ज्यांना करता येत नाही. त्यांनी,निदान अन्नदानाचं पुण्य वगरे कमवायच्या नावाखाली तरी अन्नाची नासाडी टाळून गरजूंकडे असे अन्न पोचवायची काळजी घ्यावी.

काही महिन्यांपुर्वी फ्रान्समधून, भारतातली निरनिराळ्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करायला तरुण ते अनुभवी वयस्कर अश्या मिश्र वयोगटातील मंडळींचा एक ग्रुप पुण्यात आला होता. त्यांच्या पुणे भेटीत त्यांना पारंपरिक मराठी पदार्थांशी परिचय करुन देण्याचे काम योगायोगाने माझ्याकडे आले होते.
त्यांच्याशी खाण्याविषयी झालेल्या गप्पा हा खरतर एका स्वतंत्र ब्लॉगचाच विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल सविस्तर नंतर केव्हातरी. पण थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी, भारतीय खाद्यपदार्थांचा एक उत्पादक आणि मराठी खाद्यसंस्कृतीचा एक प्रचारक म्हणून, या पाहुण्यांना त्याचा परिचय करन देता आला. हा एक फायदा त्यातून झाला.
त्यानिमित्ताने भारतीय खाणं म्हणजे फक्त चिकन टिक्का, बटर चिकन, छोले, आलू टिक्की किंवा ढोकळा, पापड आणि डोसा, सांबार, इंडियन ‘पिकल’ नव्हेत; हे या लोकांना समजावून सांगता आलं. पुरणपोळी, मोदक, आयोजकांनी केलेले नियम धाब्यावर बसवून घरुन करून नेलेलं उंधियोच्या तोंडात मारतं असं, तळकोकणातलं ‘खतखतं’ (पदार्थाचं हे वर्णन अर्थातच त्यांना न सांगितलेलं ) यावर हे पब्लिक बेहद्द खुश झालं.
फ्रेंच जेवण म्हणजे तर्हेतर्हेचे ब्रेड, चिकन, मासे आणि त्यांची आलटून पालटून केलेली कॉम्बिनेशन, त्यांचा बरोबरीने आस्वाद घ्यायला शॅम्पेन, वाईन्स चॉकलेट ह्यांच्या पलीकडे नाही हे माझं मत जरी झालं असलं तरी, फ्रेंच लोकांची जेवणाबद्दलची मतं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे ‘वारुणी’वर अगदी देशभक्ती समान वगैरे असलेले प्रेम, त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं. जेवणाकडे फार गांभीर्याने बघणं आणि तरीही त्याचा रसिकतेने आस्वाद घेणं हे आपल्याकडे फार कमी व्यक्तींना जमतं. किंबहुना ते मुळातच असावं लागतं. कोणताही फ्रेंच मनुष्य मात्र बहुदा ही गोष्ट उपजतच घेऊन येत असावा. मी त्यांच्या या गुणावर फिदा झालो.
त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून आयुष्याचा आनंद लुटणाऱ्या- जेवणाला आयुष्यातली सगळ्यात मोठी ‘रिच्युअल’ मानणाऱ्या फ्रेंच लोकांच्या खाण्याविषयी, त्यांच्या सवयींविषयी भरपूर रंजक माहिती मिळाली. त्यातच मी त्यांना कुतूहलापोटी फ्रेंच भाषेतून आलेल्या ‘बुफे’ शब्दाबद्दल विचारलं. तो उच्चार चुकीचा आहे हे पुढची १०-१५ मिनिटं वेगवेगळ्या स्वरात ऐकत होतो
Buffet असं स्पेलिंग केला जाणारा हा मुळचा फ्रेंच भाषेतून नंतर जगभरात पोचलेला शब्द. टेबलावर ठेवलेले अन्न आपल्याला हवे तेवढे वाढून घेणे, हा त्याचा फ्रेंचमधला शब्दशःअर्थ. आणि खरा उच्चार ब्युफे किंवा बफे! ह्याचे उच्चार फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरात फार गमतीशीर पद्धतीने आणि बहुतेकदा चुकीचेच (बुफे, बफेट वगैरे) केले जातात. एकीकडे मन लावून जेवत असताना वेगवेगळ्या देशात त्यांच्या होणाऱ्या उच्चाराच्या,फ्रेंच मंडळींनी केलेल्या साभिनय नकला बघताना; मी आणि आजूबाजूला हजर असलेल्या समस्त भारतीय प्रेक्षकांची अक्षरशः हसून हसून पुरेवाट झाली होती.
फ्रेंच लोक मात्र या शब्दाचा उच्चार फार ‘नजाकतीने’ करतात, ब्युफे किंवा बफे! त्यातही फ्रेंच ललना ज्यावेळी ओठांचा चंबू करून ‘ब्युफे’ असा उच्चार (इथे ब्युफेमधला यु जरा लांबवून) करतात त्यावेळी फारच गोड दिसतात, पण ते असो.
त्यानिमित्तानी आज ह्या ब्युफे/बफे प्रकाराबद्दल थोडं मनातलं.
ज्यांना जे पाहिजे ते त्यांनी स्वतःच वाढून घेणं ही ब्युफे /बफे मागची कल्पना. फ्रेंच उच्चाराचं विसरुन आपण आपल्या जेवणाचा विचार केला तर, मराठीत त्याला अतिशय योग्य प्रतिशब्द आहे, तो म्हणजे 'स्वेच्छाभोजन’.
या पध्दतीने शुभकार्यात जेवताना ही अनेक लोकांना भेटत, बोलत जेवण होतं. शेकडो लोकांची जेवणंही पटापट उरकतात, केटरर लोकांनाही वाढपी लोकांची गरज कमी लागते, समारंभाचीही कामं लवकर होतात.
अशा अनेक फायद्यांमुळे आजकालच्या घाईगडबडीच्या काळात आपली पारंपारिक भारतीय 'पंगत' सोडून आपण स्वेच्छाभोजन प्रकारची कास धरली. कालानुरुप खूप स्वाभाविक आणि स्वागतार्हच गोष्ट आहे. पण दुर्दैवानी आपल्याकडे ‘ब्युफे’ ही पध्दत फक्त प्रचलित झाल्ये, झेपलेली बिलकुलच नाहीये. आपल्याकडे लोक आजही बेसुमार अन्न आपल्या हाताने डिशमधे वाढून घेतात आणि ते निर्लज्जपणे टाकून देतात.
ज्यांच्या घरी लहानपणापासून 'अन्न हे पूर्णब्रह्म' हे शिकवल गेलंय, त्यांच्या डोक्यात तर हे प्रकार जाण स्वाभाविक आहे. त्या न्यायाने माझ्या स्वतःच्या तर जातातच.
काही वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात ह्याचा कळस पाहिला. वधूचा भाऊ माझा जवळचा मित्र, त्यामुळे त्यांच्या बाजूनी आमंत्रित म्हणून गेलो होतो. जेवण घ्यायला उशीर झाल्याने आजुबाजूची गर्दीही कमी झाली होती. ब्युफेमधून डिश वाढून घेऊन बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मित्रांबरोबर निवांत गप्पा मारत बसलो होतो तर नवऱ्याकडची मंडळी ब्युफेमध्ये टेबलपर्यंत आग्रह करायला आली. आमचं सगळ्यांचंच जेवण खरतर संपत आलं होतं. पण आम्ही अनेकवेळा नको म्हणत असतानाही त्या लोकांचा नाहक आग्रह सुरुच होता. स्वतः व्याही वाढायला आलेले असल्याने मित्राचे वडीलही त्यांच्यामागे ( उगाचच) हसत, आपल्याकडच्या लोकांना हात जोडून पानात थोडे काहीतरी घ्यायचा आग्रह करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे कसंनुसे भाव बघवत नव्हते. शेवटी आम्ही ३-४ मित्रांनी नको असतानाही त्यांच्याकडे बघून पानात थोडं श्रीखंड घेतलं. पण मुलाकडच्या (हक्काच्या लोकांना) मात्र त्यांच्याही इच्छेविरूध्द पानात श्रीखंड वाढलंच जात होतं. ती ताटं नंतर तशीच्या तशी डस्टबीन मधे फेकली जात होती. ते दृश्य बघूनही माझा संताप होत होता.
नंतर समजलं की कार्यक्रमाची वेळ संपत आलेली असताना, वरपक्षाकडची लोकं बऱ्याच कमी प्रमाणात आल्याचा साक्षात्कार त्या लोकांना झाला. त्यामुळे त्यांच्या हाती जे 'धडधाकट' सापडले, त्यांच्यावर आग्रहाचा भडीमार झाला होता.
ही आग्रह करायची पद्धत खरंतर पंगतीमधली ना? पंगतीत जेवायची मजा वेगळी असायची, अजूनही आहे. त्यात आग्रह न चुकता होत असे, तो झाला नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. पण त्यावेळी तो आग्रह करणारे होते तसेच तो आग्रह करवून घेऊन जेवणारेही असायचे. बहुतेक लोक आता अनेक कारणामुळे फारसे जेवत नाहीत. आतातरी आग्रह ही पद्धत कालबाह्य झाली नाहीये का?
पण शुभकार्यात एकदा पंगत नाही तर ब्युफे आहे असं दोन्ही बाजूंनी ठरवल्यावर, नाहक आग्रह करून समोरच्याशी सलगी दाखवायची (आग्रह केल्यामुळे समोरच्याशी आपली सलगी वाढते,ही तर पुरातन काळापासून चालत आलेली प्रचंड मोठी अंधश्रद्धा आहे) आपली खोटी मानसिकता संपणार कधी?
आपल्याकडे खरच हजारो, लाखो लोकं रोज अर्धपोटी, उपाशी झोपत असताना नाही म्हणत असलेल्या व्यक्तींना आग्रह करुन वाढायची खरंच काही गरज असते का?
पंगतीत जेवायची मजा वेगळी असायची, अजूनही आहे! त्यात आग्रह न चुकता होत असे,तो झाला नाही तर काहीतरी चुकल्या सारखं वाटायचं.पण त्यावेळी तो आग्रह करणारे होते तसेच तो आग्रह करवून घेऊन जेवणारेही असायचे.
पण आपल्याकडे खरच हजारो, लाखो लोकं रोज अर्धपोटी, उपाशी झोपत असताना नाही म्हणत असलेल्या व्यक्तींना,आग्रह करुन वाढायची खरंच काही गरज उरल्ये का?
जी गोष्ट मंगल कार्यालयांची तीच गोष्ट हॉटेल्समधली देखील! माझ्या बघण्यात पुण्यातली अनेक नामवंत हॉटेल्स
मुठेच्या उजव्या कॅनॉलमध्ये ( ज्यातून सबंध पुण्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि ते पाणी पुढे फार पुढे जाते ) किंवा मुळामुठेच्या पात्रात रोज रात्री शिल्लक राहिलेल्या अन्नानी भरलेले टब रिकामे करतात. त्याच्यामुळे दूषित होणारे कॅनॉल,नदीपात्र हा अजूनच वेगळा आणि गंभीर विषय.
आता ह्यावर्षीचा लग्नांचा हंगाम सुरु झालाय. पुण्यातल्या काही मंगल कार्यालयांमध्ये, हॉटेल्समध्ये लोकांनी अन्नाची नासाडी करू नये म्हणून काही स्तुत्य (पुणेरी) पाट्या लावलेल्या दिसतात. (सोबतचा फोटो डिंगणकर बंधू संचालित पुण्यातल्या महालक्ष्मी सभागृहातला) त्यांची चेष्टा होण्यापेक्षा खरंतर त्यावर विचार आणि कृती होणं अपेक्षित असत.
तरीही कधी आपलाच आमंत्रणाचा अंदाज चुकतो, कधी अचानक काही कारणांमुळे लोकं येत नाहीत, अन्न बऱ्याच प्रमाणात उरतं. अश्यावेळी ते गरीब लोकांच्या वस्तीत आपण स्वतः देऊ शकतो. बहुतेक सगळ्या मोठ्या शहरात "रॉबीनहुड आर्मी" सारख्या सेवाभावी संस्था असे अन्न अगदी आयत्यावेळीही स्विकारतात आणि गरजू लोकांना त्याचे त्यादिवशीच रात्री वाटप करतात.
(अगदी " अमुकतमुक ह्यांच्या सौजन्याने वगेरे सांगून ").
पूर्वी आपल्याकडे, "एकवेळ खाऊन माजावं पण टाकून माजू नये", असं म्हणायची पद्धत होती. अनेक चांगल्या गोष्टींबरोबर आपण असे संस्कार घडवणारे वाक्यप्रचारही विसरत चाललोय.
जगातल्या प्रत्येक धर्मात अन्नदानाचं मोठं महत्व सांगितलेलं आहे. अन्न पिकवणाऱ्या व्यक्तीच्या श्रमाचा, त्याच्या होणाऱ्या नासाडीचा विचार ज्यांना करता येत नाही. त्यांनी,निदान अन्नदानाचं पुण्य वगरे कमवायच्या नावाखाली तरी अन्नाची नासाडी टाळून गरजूंकडे असे अन्न पोचवायची काळजी घ्यावी.
ही पोस्ट वाचून थोडं अन्न खऱ्या गरजू लोकांच्या मुखी लागलं तर ब्लॉग लिहिण्याचा उद्देश सफल.
नाहीतर उपाशीपोटी झोपणार्यांची कमी भारतात आधीही नव्हती आणि आत्ताही नाही.
तरीही कधी आपलाच आमंत्रणाचा अंदाज चुकतो, कधी अचानक काही कारणांमुळे लोकं येत नाहीत, अन्न बऱ्याच प्रमाणात उरतं. अश्यावेळी ते गरीब लोकांच्या वस्तीत आपण स्वतः देऊ शकतो. बहुतेक सगळ्या मोठ्या शहरात "रॉबीनहुड आर्मी" सारख्या सेवाभावी संस्था असे अन्न अगदी आयत्यावेळीही स्विकारतात आणि गरजू लोकांना त्याचे त्यादिवशीच रात्री वाटप करतात.
(अगदी " अमुकतमुक ह्यांच्या सौजन्याने वगेरे सांगून ").
पूर्वी आपल्याकडे, "एकवेळ खाऊन माजावं पण टाकून माजू नये", असं म्हणायची पद्धत होती. अनेक चांगल्या गोष्टींबरोबर आपण असे संस्कार घडवणारे वाक्यप्रचारही विसरत चाललोय.
जगातल्या प्रत्येक धर्मात अन्नदानाचं मोठं महत्व सांगितलेलं आहे. अन्न पिकवणाऱ्या व्यक्तीच्या श्रमाचा, त्याच्या होणाऱ्या नासाडीचा विचार ज्यांना करता येत नाही. त्यांनी,निदान अन्नदानाचं पुण्य वगरे कमवायच्या नावाखाली तरी अन्नाची नासाडी टाळून गरजूंकडे असे अन्न पोचवायची काळजी घ्यावी.
ही पोस्ट वाचून थोडं अन्न खऱ्या गरजू लोकांच्या मुखी लागलं तर ब्लॉग लिहिण्याचा उद्देश सफल.
नाहीतर उपाशीपोटी झोपणार्यांची कमी भारतात आधीही नव्हती आणि आत्ताही नाही.
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
भारत
महाराष्ट्र



















