BLOG : प्रताप सरनाईक यांनी रचलेल्या पायावर एकनाथ शिंदे यांनी रचला कळस
बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 10 जून 2021 ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. पत्र लिहिण्यापूर्वी प्रताप सरनाईक यांच्या विहंगवर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची अनेक तास चौकशीही झाली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिले आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राज्य सरकार अस्थिर झाले की काय अशी शंका व्यक्त केली जात होती.
प्रताप सरनाईक यांच्या पत्रात असे काय होते ज्यामुळे खळबळ माजली होती. तर त्या पत्रात सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटते. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत, पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरे होईल असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले होते.
प्रताप सरनाईक यांच्या या पत्रानंतर शिवसेनेचे आमदार, नेत्यांच्या मनात काय आहे ते समोर आले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले आणि ही नाराजी दिवसेंदिवस वाढू लागली. खरे तर मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नेते, आमदार नाराजी व्यक्त करीत होते, पण मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष देणे उचित वाटले नाही. आपण सत्तेत आहोत, सत्ता सोडून आपले नेते, आमदार जाणार कुठे? शिवसैनिक आहेत ते आपल्या मागेच राहाणार असा विश्वास त्यांना वाटत होता.
त्याचाच परिणाम म्हणजे आमदारांची नाराजी वाढण्यात झाला. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी मोठ्या प्रमाणावर दिला जातो मात्र शिवसेना आमदारांना अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत असा आरोप अनेक आमदारांनी केला. पण त्याकडेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही. दुसरीकडे ईडीच्या चौकशा चालूच होत्या. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नसल्याचा आरोपही शिवसेनेचेच नेते आणि आमदार करू लागले होते. त्यातच भर म्हणून की काय नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झाला आणि ईडीने त्यांना अटक केली. ते तुरुंगात आहेत तरीही त्यांना मंत्रीपदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूर केले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकत नाहीत असे शिवसेनेतच बोलले जाऊ लागले होते.
एकनाथ शिंदेच्या कारभारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दखल देत होते. एकनाथ शिंदेची प्रत्येक फाईल या दोघांना दाखवूनच पुढे जात असे त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते असे म्हटले जाते. काही ठराविक नेत्यांवरच उद्धव ठाकरे विश्वास ठेवत आहेत असाही एक मेसेज शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेला होता.
राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला. संजय राऊतही अगदी काठावर वाचले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत न केल्यानेच असे घडले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने आमदार फोडून पाचवा उमेदवार शून्य मते असताना निवडून आणला. तेथेच सरकारमधील मंत्री आणि आमदारांची नाराजी समोर आली होती.
या सर्व प्रकरणांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कळस चढवला आणि विधान परिषद निवडणुकीच्या रात्रीच शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सूरत गाठले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. हिंदुत्वासाठी तडजोड नाही असे त्यांनी ट्विट करून स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोलतानाही त्यांनी विचार जुळत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी तोडावी आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असे म्हटले. नवाब मलिक तुरुंगात असल्याने सरकारची बदनामी होत आहे एवढेच नव्हे तर पक्षप्रमुखांनी प्रचंड वैचारिक तडजोड केल्याचेही एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रतोदांची निवडही बेकायदेशीर ठरवत रद्द केली आणि भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली.
संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना एकनाथ शिंदेंचा उल्लेख न करता कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असे म्हणत समोर येऊन मुख्यमंत्रीपदी बसू नका असे बोलण्याचे आव्हान दिले. पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना मविआतून बाहेर पडण्याचे सर्वप्रथ आवाहन करणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्यासह 40 आमदार आहेत. आणि त्याचा फटका शिवसेना विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नक्कीच बसण्याची चिन्हे दिसत आहेत.