BLOG : अखेर खाजगी निर्माताच तयार करणार महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट
कोणतेही सरकार हे उठता बसता समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव घेत असते. या दोघांमुळेच देशात मुली शिक्षण घेऊ शकल्या आहेत. महात्मा फुले यांची जयंती पुण्यतिथी आली की सगळे राजकारणी सोशल मीडियावर त्यांना वंदन करतात. या दोघांचे देशावर किती उपकार आहेत हे दाखवत असतात. महात्मा फुलेंच्या नावाने समतेच्या गप्पा मारतात. मात्र त्यांचे नाव घेणारे आणि राजकारण करणारे त्यांच्याप्रती किती कृतघ्न आहेत हे त्यांच्या चित्रपटांच्या घोषणांवरून दिसते. याच महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट तयार करण्याबाबत मात्र राज्य सरकार हे नेहमीच उदासीन असल्याचं आजवर दिसून आलंय. सरकार राणा भीमदेवी थाटात महात्मा फुलेंच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा करते आणि नंतर ती फाईल वर्षानुवर्षे लाल फितीत अडकली जाते.
आज महात्मा फुले यांची जयंती. बॉलिवूडमधील प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी यानिमित्ताने महात्मा फुले यांच्या जीवनावरील 'फुले' चित्रपटाला सुरुवात करीत असल्याची आज घोषणा केली. या चित्रपटात प्रतीक गांधी महात्मा फुले यांची भूमिका साकारणार आहे तर सावित्रीबाईंची भूमिका पत्रलेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. पुढील वर्षी चित्रपट रिलीज करण्याचा अनंत महादेवन यांचा विचार आहे. अनंत महादेवन यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहाता ते हा चित्रपट तयार करून प्रदर्शित करतील यात शंका नाही.
महात्मा फुले यांच्या जीवनावर पहिला चित्रपट आचार्य अत्रे यांनी 1955 मध्ये तयार केला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या मुहुर्ताला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरही उपस्थित होते. त्यांच्यासोबत कर्मवीर भाऊराव पाटील, माई आंबेडकर, शाहीर अमर शेख उपस्थित होते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या चित्रपटात भाऊराव पेंढारकर यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली होती.
पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की अशी इच्छाशक्ती राज्य सरकारकडे का दिसत नाही?
24 जुले 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस सरकारने नवीन पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनाची ओळख व्हावी म्हणून महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी व पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याची घोषणा केली. त्यानंतर एक वर्षाने सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारने एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. याचे काम राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे (एनएफडीसी) सोपवण्यात आले. 10 कोटी रुपये खर्च करून तयार केल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी जब्बार पटेल यांच्यावर सोपवण्यात आली. चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारने निधीही दिला. पण आज 20 वर्षे झाली तरी या चित्रपटाबाबत काहीही हालचाल झाली नाही. ते पैसे कुठे गेले याची माहिती कोणालाही नाही.
त्यानंतर 2017 मध्येही युती सरकारने महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचेही पुढे काहीही झाले नाही. त्यानंतर युती सरकार गेले आणि आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे मविआ सरकार सत्तेवर आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये पुन्हा एकदा जीआर काढून या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली आणि २ कोटी २० लाखांचा निधी देणार असल्याचेही घोषित केले. पण 20 वर्षांपासून हा चित्रपट का तयार होऊ शकला नाही याचा विचार सरकारमधील कोणीही का केला नाही?
साधारणतः दोन वर्षांपूर्वी समीर विद्वांस यांनी महात्मा चित्रपटाला सुरुवात केल्याचे सांगितले गेले. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटाला अजय अतुल यांचे संगीत असेल असेही सांगितले गेले होते मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या भूमिका कोण करणार ते गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल असेही सांगितले गेले होते. दोन भागांमध्ये चित्रपट तयार करण्याची योजना आखण्यात आली होती. 'क्रांतिसूर्य' नावाच्या चित्रपटात ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र तर 'क्रांतीज्योती' नावाच्या चित्रपटा सावित्रीबाईंची गाथा सांगण्यात येणार होती. पण या चित्रपटाचे पुढे काय झाले ते कोणालाही ठाऊक नाही.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचे या महाराष्ट्रावर आणि विशेषतः महिलांवर प्रचंड उपकार आहेत. केवळ या दोघांमुळेच महिलांना शिक्षण घेणे सोपे झाले आणि त्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रात आपला झेंडा रोवत आहेत. सरकारही फक्त जयंती, पुण्यतिथीला या दोघांची आठवण काढते, फुले वाहते आणि नंतर सर्व थंड. पुन्हा वाट पाहायची पुढील जयंती आणि पुण्यतिथीची. आणि त्या दिवशी सरकारकडून महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट काढण्याच्या सरकारच्या घोषणेची.
महाराष्ट्राचे दुर्देव दुसरे काय?