BlOG | सावध ऐका पुढल्या हाका!

ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज (हवामान बदल) हे शब्द आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत, पण कायम पर्यावरणवाद्यांचा एखादा ग्रुप सोडला तर त्याच्याशी आपलं फार काही देणघेणं नाही असा सर्वसामान्य पवित्रा असतो. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ हे शब्द आपल्यासाठी नाहीतच मुळी असा सुशिक्षितांचाही समज आहे. पण आत्ता येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मात्र हे पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आता थेट आपल्या दाराशी येऊन पोचलेत आणि जसजसे दिवस जातील तसतसे आपल्याच अत्यंत बेजबाबदार वागण्यामुळे हवामान बदलाचे याहूनही तीव्र परिणाम आपल्याला आणि आपल्या पुढल्या पिढीला भोगावे लागणार आहेत.
तौक्ते चक्रीवादळाशी सामना करण्याची मुंबईची तयारी बघायला मंत्री आदित्य ठाकरे वॉर रुममध्ये आले असताना, एक वाक्य बोलले की मुंबईला अशा चक्रीवादळाची सवय नाही. ते अगदी बरोबर आहे. जर या बाबतीतली आकडेवारीच द्यायची झाली तर आत्ता येऊन गेलेलं तौक्ते चक्रीवादळ हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ (Extremely severe cyclone) असल्याचं हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं होतं. हवामान विभागाच्या वेबसाईटवर 1891 सालापासूनच्या वादळांची माहिती पाहिल्यास या तीव्रतेचं वादळ मुंबई जवळून पहिल्यांदाच गेल्याचं दिसतंय. याचाच अर्थ मुंबई किंवा पश्चिम किनारपट्टीला मोठ्या तीव्रतेच्या वादळांची फारशी सवय नाही.
अर्थात, मुंबईचा इतिहास पहिला तर 1940 साली एका वादळामुळे अपोलो बंदर, माझगाव डॉक हे भाग उद्धवस्त झाल्याचा आणि अनेकांच्या मृत्यूचा उल्लेख सापडतो. तसंच पुन्हा 1948 साली एका मोठ्या तीव्रतेचं वादळ आल्याचाही उल्लेख सर्वत्र दिसतो. पण तरीही तौक्तेची तीव्रता कितीतरी अधिक होती, कारण तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग 17 मे ला दुपारी दोन वाजता 114 किमी प्रतितास इतका होता. हा वाऱ्याचा वेग मुंबई शहराने यापूर्वी कधीही अनुभवलेला नाही. आणि 300 मिमीहून अधिक पाऊस मे महिन्यात तर यापूर्वी कधीच झालेला नाही. तरी आपलं सुदैव असं की हे अतितीव्र चक्रीवादळ आपल्या किनारपट्टीच्या 120 किमी अंतरावरुन गेलं. पण जर या वादळाचा लँडफॉल आपल्या राज्यातल्या एखाद्या किनारपट्टीला झाला असता तर वाऱ्याची तीव्रता किमान 150 किमी प्रतितास राहिली असती. अशावेळी अत्यंत दाटीवाटीच्या मुंबई शहराची काय अवस्था झाली असती याचा विचारही करवत नाही. अर्थात भविष्यात हे संकट आपल्यावर आदळणारच नाही असं नाही कारण आता अशा वादळांचा सामना करण्याची आपल्याला सवयच करायची आहे. गेल्या चार वर्षात प्रत्येक वर्षी मान्सूनच्या काही दिवस किंवा काही आठवडे आधी पश्चिम किनारपट्टीवर एक वादळ धडकलंय. गेल्या वर्षी अगदी मान्सूनच्या तोंडावर निसर्ग चक्रीवादळ निर्माण झालं होतं आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरचे ते धडकलंही होतं. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला होता आणि मुंबई मात्र निसर्ग वादळाच्या तडाख्यातून थोडक्यात बचावली होती.
पण अचानक अरबी समुद्रात वादळांचं प्रमाण का वाढतंय? यापूर्वी कायम चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाल्याच्या बातम्या आपण ऐकत आलोत. यापूर्वी पारंपरिक मत असं होतं की भारताला लाभलेल्या दोन बाजुंच्या दोन समुद्रांमध्ये मूलभूत फरक आहे. बंगालच्या उपसागराचं तापमान अरबी समुद्राच्या तुलनेनं जास्त असल्यानं कायम वादळं बंगालच्या उपसागरात तयार होतात. अरबी समुद्र मात्र त्यामानाने अधिक सुरक्षित मानला जायचा कारण अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरच्या पाण्याचं तापमान कायम कमी असायचं. पण गेल्या शतकात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हळहळू अरबी समुद्रही तापू लागलाय आणि त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे वाढत्या संख्येनं पश्चिम किनारपट्टीवर धडकणारी चक्रीवादळं. अरबी समुद्रात निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या तीव्रतेनी धडकणारी वादळं हा जागतिक तापमानवाढीचाच परिणाम असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. खरं तर कुठलंही चक्रीवदळ निर्माण होण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावरचं तापमान आणि वाऱ्यांची दिशा या दोन गोष्टी पोषक असाव्या लागतात आणि साधारण समुद्राच्या पृष्ठभागाचं सापमान 28 डिग्री किंवा त्याहून अधिक असेल तर चक्रीवादळं निर्माण होण्यास योग्य वातावरण मानलं जातं. कारण समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचं तीव्र वादळात रुपांतर होण्यासाठी पृष्ठभागावरील तापमानाची साथ असावी लागते. एकूणच अरबी समुद्राच्या तापमानात झालेल्या बदलामुळे वादळाला पोषक वातावरण मिळू लागलंय हे उघड आहे.
जागतिक तापमानवाढीमुळेच वादळाची समुद्रात निर्मिती झाल्यानंतर अगदी काही तासात त्या वादळाची तीव्रता वाढतेय असंही एक निरीक्षण आहे. आत्ताच्या तौक्ते चक्रीवादळाच्या बाबतीतही अगदी काही तासात हे वादळ अत्यंत तीव्र वादळात रुपांतरित झाल्याचं दिसलं. अशा अचानक तीव्रता वाढीमुळे जर किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही तर नुकसान जास्त होण्याची शक्यता वाढते. मात्र या सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की गेल्या काही वर्षात हवामान शास्त्रज्ञ या वादळांचा अत्यंत अचूक अंदाज बांधतायत, त्यामुळे वादळाची तीव्रता जास्त असतील तर त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी करता येतेय. जीवितहानी टाळता आली तरी गेल्या काही वर्षात या वादळांमुळे होणारं नुकसान वादळागणिक वाढतच चाललंय. कोकणातल्या आंबा, काजू, सुपारीच्या बागा गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळात पार उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्यातून सावरण्यापूर्वीच पुन्हा तौक्तेने तडाखा दिलाय.
जगभरातले शास्त्रज्ञ, अभ्यासक वेळोवेळी धोक्याची सूचना देत असतानाही गेली कित्येक वर्ष अवघ्या जगानेच ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय, आपण अजुनही असंच दुर्लक्ष करत राहिलो तर चक्रीवादळासारखी कितीतरी संकटं पुढच्या काळात आपल्यासाठी आपणच निर्माण करुन ठेवलेली आहेत, हे वेगळं सांगायलाच नको. केवळ चक्रीवादळच कशाला, आपल्या महाराष्ट्राच्या विविध भागात अवेळी पडणाऱ्या पावसाचं प्रमाण वाढलंय, कमी कालावधीत खूप जास्त पावसाची उदाहरणं तर गेली काही वर्ष आपण अनुभवतोच आहोत. मुंबईनंतर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच पावसानं होणाऱ्या नुकसानाचा प्रत्येक पावसाळ्यात आपण अनुभव घेतलाय. अशा घटनाही येत्या काळात वाढल्या तर आश्चर्य वाटायला नको. आपण कार्बन उत्सर्जन, ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन या प्रश्नांबाबत जोपर्यंत सामान्यांना जागरुक करणार नाही, तोवर बदलाची सुरुवातही होणार नाही. केवळ काही पॉलिसी मेकर्स आणि तज्ञांपर्यंत सीमित हा विषय राहता कामा नये, तरच भविष्यातल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींपासून बचावाच्या दृष्टीने पावलं तरी उचलली जातील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
