शरद पवार यांना खुलं पत्र, "पवार साहेब महाराष्ट्राला पुन्हा एक आरआर आबा द्या"
पवार साहेब उमेदवारी जाहीर करताना उद्याच्या महाराष्ट्रासाठी एक-दोन आर आर आबा द्या. जे उद्याचा पुरोगामी महाराष्ट्र घडवतील. कारण मोहिते, पाटील, विखे, निंबाळकर किंवा छत्रपतींच्या गादीचे वारसदार कोणत्या पक्षात आहेत, याचा महाराष्ट्राला जेवढा परक पडत नाही. तेवढा सध्या आर आर आबांसारखा माणूस कोणत्याच पक्षात नसण्याचा पडतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी पोकळी आहे.
प्रति, शरद पवार (वयाच्या ऐंशीतही महाराष्ट्र पिंजून काढणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष )
प्रश्न - पवार साहेब तुम्हाला आर आर आबांबद्दल एवढं प्रेम का?
उत्तर - एखाद्या संस्थेचं नेतृत्व करणारा व्यक्ती कोणाच्या पाठीमागे उभा राहतो, याचा संदेश समाजात जात असतो. तो संदेश गेला की चांगल्या लोकांना प्रेरणा मिळत असते.
आठवतोय पवार साहेब हा प्रसंग? आर.आर. पाटील (आबा) यांच्या सत्कार कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही हेच उत्तर दिलं होतं. मुंबईत चार भिंतीच्या खोलीत तुम्ही बोलत होतात. टीव्हीवर सुरू असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रानं पाहिला. तुमच्या उत्तरानंतर त्यावेळी कितीतरी घरात आजोबा ते नातू अशा तीन पिढ्यांनी सोबत टाळ्या वाजवल्या. आपल्या माणसाबद्दल तुम्ही बोललात याचा महाराष्ट्राला आंनद झाला होता. जनतेबद्दल तळमळ असलेला आबांसारखा चारित्र्यवान, मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असा नेता तुम्ही महाराष्ट्राला दिला. त्यामुळेच तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यासारखे शाश्वत कार्यक्रम राज्याला मिळाले. कोणती गोळी कोठून येईल आणि त्यावर कधी मृत्यू लिहिलेला असेल हे सांगता येत नसलेल्या गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचं पालकत्व घेणारा एक संवेदनशील गृहमंत्री पाहायला मिळाला. भरधावपणे लालदिव्याच्या ताफ्यातून फिरणारे, पांढरे झब्बे घातलेले नेते (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) कधीच आपले वाटायचे नाही. मात्र आबांबद्दल असं नव्हतं. त्यांच्यात नेहमीच महाराष्ट्राला आपला नेता दिसला. पोलीस दलाचे प्रश्न, डान्सबारचा मुद्दा असे अनेक प्रश्न आबांनी सोडवले. ग्रामीण महाराष्ट्रासाठी तर झिरो बजेटमध्ये त्यांनी लाखमोलाचं काम केलं. गृहमंत्रीपदी असताना देखील कोट्यवधींची माया जमवल्याचं कधी वाचण्यात आणि ऐकीवात आलं नाही. निवडणुकीच्या शपथपत्रात देखील आबा साधेच राहिले. त्यामुळे तर वंचित, शोषित घटकाला ते आपला नेता वाटायचे.
शरद पवारांमुळे आपण घडल्याचे आबा आनंदाने महाराष्ट्राला सांगायचे. "सत्तेसाठी भांडायचे नाही, झगडा करायचा नाही. खूप दिलं मला पक्षानं पण सोडलंही तितक्याच आनंदाने. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात माझ्या इतका लाभार्थी कोणी नाही. एका रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराला राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याची दानत फक्त पवार साहेबांमध्ये आहे", जाहीर सभेत व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना हे त्यांनी सांगितल्याचे तुम्हाला देखील आठवलं असेल.
सत्तेचं राजकारण करताना साहेब तुम्ही भक्कमपणे पाठीशी उभं राहत आबांसारख्या नेत्याला जसं घडवलं, तसं काहींना बिघडवलं हे देखील तितकच खरं आहे. तेलगी घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा असे अनेक आरोप छगन भुजबळ यांच्यावर झाले. तुम्ही खाजगीत त्यांचे कान टोचले की नाही? हे भुजबळ आणि तुम्हाला माहीत. पण सार्वजनिक व्यासपीठावर मात्र भुजबळांना अंतर दिलं नाहीत. तुम्ही म्हणाल, राजकीय आरोप ते सिद्ध होईपर्यंत गुन्हा नाही, हे मान्य. पण तरी प्रश्न उरतोच जामिनावर तुरुंगाबाहेर असलेले भुजबळ निर्दोष आहेत का? मात्र, तुम्ही जामिनावर असलेल्या भुजबळांचं फुल्यांच्या पुण्यात एखाद्या वीरासारखं स्वागत केलं? भुजबळांच्या डोक्यावर 'फुले पगडी' ठेऊन नेमका कोणत्या समानतेचा संदेश तुम्हाला द्यायचा होता? कोट्यावधींचा 'राजमहाल' बांधणारे भुजबळ शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा समर्थपणे चालवत असल्याचं जणू हे प्रशस्तीपत्रचं होतं. ते देत असताना समाजात कोणता संदेश जातो हा विचार करायला हवा होता? ओबीसी मतदाराला चुचकारण्यासाठी उचललेलं हे पाऊल नक्कीचं स्वागतार्ह नव्हतं.
साहेब भुजबळांसारखच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या कोकणातील भास्कर जाधवांना तुम्ही मानाचं पान दिलं. महाराष्ट्रात दुष्काळ होता. मुलीचं लग्न करू शकत नाही म्हणून गळफास घेतल्याची बातमी दररोज पेपरात येत होती. तुमच्या सारखा नेता सुन्न व्हायचा. त्यावेळी तुम्ही जाधवांच्या मुलीच्या लग्नाचा पाहुणचार घेतलात. भव्य-दिव्यता पाहून तुमचेही डोळे दिपले. लक्ष्मीदर्शन घडवणाऱ्या जाधवांचा उद्योग काय? मला याच्या खोलात जायचं नाही. पण तुमच्याच पक्षाचं प्रदेशाध्यक्ष सांभाळलेल्या आबा कुटुंबीयांनी कधी लक्ष्मी जमवली नाही आणि त्याचा बडेजावही मिरवला नाही, हे आठवलं म्हणून विषय काढला. तुमच्या सारख्या नेत्यांना हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही जाणते राजे आहात, असो.
नुकतेच भाजपात गेलेले तुमचे सोयरे पद्मसिंह पाटील यांच्याबद्दल तुम्हाला नगरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही संतापलात. पण तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून पद्मसिंह पाटील यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं.(अर्थात ते जनसेवेसाठीच) पवनराजे खून प्रकरण, अण्णा हजारेंना जीवे मारण्याची सुपारी पाटलांनी दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर ही या 'सम्राटाला' तुमचा आशीर्वाद होता. सध्या तुरुंगात असलेला, अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम हा तुम्ही अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. हे मनाला बोचतं हो. राज्यात सहकार पंढरी तुम्ही उभारलीत. पण राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याच्या बातम्या वाचल्या. त्यामधील सर्वपक्षीय नेत्यांची यादी बघितली की प्रश्न पडतो. हे पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा चालवणार? तुमच्यासारखंच कमी वयात मुख्यमंत्री झालेले. आतापर्यंत स्वच्छ चारित्र्याचे आहेत असं म्हटलं जातं,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या सरदारांच्या हातात महाराष्ट्राचं भविष्य दिसतंय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पावन करून घेत आहेत. राष्ट्रवादीत असो की भारतीय जनता पार्टी खरं तर त्यांचा अपराध दुर्लक्षित करता येणार नाही. पण सत्तेपुढे शहाणपण कुठे चालतं, असो. राजकारण काही साधू-संतांचा मेळा नाही. कुरघोडी, डावपेच, शह इथं सारंच आलं.
पत्र लिहिण्याचा महत्वाचा मुद्दा तसाच राहिला. तुमचा पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढून छत्रपतींच्या स्वप्नांची पेरणी करत आहे. तुम्ही स्वतः महाराष्ट्रभर फिरत आहात. तुमचं फिरणं आश्वासक आहे. माझ्या सारख्या तरुण तुमच्या शब्दात उद्याचा महाराष्ट्र पाहतोय. कारण त्या शब्दाला कर्तृत्वाचं वजन आहे. शेती, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातलं तुमचं काम वादातीत आहे. तुम्हाला चांगल्या-वाईट माणसांची पारख आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलंय. तुमचा पक्ष देखील दोन-चार दिवसात उमेदवाराची संपूर्ण यादी जाहीर करेल. तेव्हा उमेदवारी जाहीर करताना उद्याच्या महाराष्ट्रासाठी एक-दोन आर आर आबा द्या. जे उद्याचा पुरोगामी महाराष्ट्र घडवतील. कारण मोहिते, पाटील, विखे, निंबाळकर किंवा छत्रपतींच्या गादीचे वारसदार कोणत्या पक्षात आहेत, याचा महाराष्ट्राला जेवढा परक पडत नाही. तेवढा सध्या आर आर आबांसारखा माणूस कोणत्याच पक्षात नसण्याचा पडतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी पोकळी आहे. तेव्हा तुमच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी तेवढी ती भरा. महाराष्ट्राला एक-दोन आर आर आबा द्याच.
(सत्तेत पक्ष कोणताही असो, मात्र महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झेपावत राहिला पाहिजे असं मत असलेला एक मतदार, आप्पासाहेब शेळके)