BLOG : 'रामशाम गुणगान' अल्बम नव्हे अलौकिक अनुभव
दोन भारतरत्न प्राप्त गायकांना एकत्र आणण्याची ताकद एका पद्मभूषण प्राप्त संगीतकारातच असू शकते आणि या प्रतिभेच्या त्रिवेणी संगमातून ज्या सुरावटी अवतरल्या त्या स्वर्गीय होत्या. "राम शाम गुणगान" या अल्बमच्या प्रत्येक गाण्यात त्या दैवी सुरांची अनुभूती येते. या अल्बमसाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता मंगेशकर या दोघांना पहिल्यांदाच कोणी एकत्र आणलं असेल तर होते पद्मभूषण श्रीनिवास खळे!
आज हे सगळं लिहायचं निमित्त इतकंच की, काल राम नवमी होती. त्यामुळं "राम शाम गुणगान" पासूनच दिवसाची सुरुवात होणार हे निश्चित होतं. दिवसाचा शेवट पण तीच गाणी ऐकत झाला, हे ही निश्चित होतं. बाकी वर्षभर पण असे अनेक दिवस असतात ज्यांची सुरुवात "बाजे मुरलिया" "राम का गुणगान" अशा याच अल्बमच्या गाण्यांनी होते आणि त्या प्रत्येक दिवशी खळे काकांना धन्यवाद बोलायला मन विसरत नाही. 8 गाणी यात आहेत... सगळी राम आणि कृष्णाची भजनं आहेत. काही पंडितजी आणि लताबाईंनी एकत्र गायली आहेत तर काही सिंगल आहेत. पंडित नरेंद्र शर्मा यांनी ही सर्व गाणी लिहिली आहेत. तर अनिल मोहिते हे अरेंजर होते.
या अल्बमची आणि माझी पहिली भेट झाली मोठ्या मामांच्या घरी... पाचवी सहावीत असेल... पंडितजींचा तो खडा आवाज, एखाद्या पर्वताप्रमाणे, नव्हे गोवर्धनच म्हणा ना... तसा वाटला... आणि त्याच गोवर्धनाच्या खाली कृष्णाने कोमल स्वरांची बासरी वाजवावी तसा लताबाईंचा आवाज! या दोघांच्या सानिध्यात मंत्रमुग्ध झालेली झाडं, वेली, पक्षी, गायी, वासरं, गोप-गोपिका म्हणजे आपण... असंच काहीसं वाटलं! आणि हो जिथे कृष्ण आहे, त्याची बासरी आहे, गोवर्धन आहे तिथे यमुनेला विसरून कसं चालेल? खळे काकांनी लावलेल्या चाली पण तशाच होत्या. म्हणजे बघा हां, यमुनेच्या काठावर येणाऱ्या हलक्या हलक्या लहरींच्या आवाजाच्या चालीवर गोवर्धन आणि कृष्णाची बासरी गातेय... हा अनुभव अलौकिक नसेल का?
या अल्बमच्या रेकॉर्डिंगवेळी पण अनेक गंमती झाल्यात… ज्या स्वतः लताबाईंनी सांगितल्यात... पंडितजी आणि लताबाई दोघेही आपापल्या क्षेत्रात दिग्गज.. त्यांना एकत्र घेऊन गाणी गाऊन घ्यायची म्हणजे मोठं दिव्य... त्यात लताबाई पंडितजींसमोर आधीच नर्व्हस झालेल्या... शेवटी खळे काकांनी हृदयनाथ यांनाच एक कार्डबोर्ड घेऊन दोघांच्या मध्ये उभं केलं आणि मग गाण्याची रेकॉर्डिंग केली. तर "बाजे मुरलिया" गाण्याला दोघांच्या वेळा जमून येतच नव्हत्या... शेवटी दोघांनी वेगवेगळ्या वेळी येऊन गाणं रेकॉर्ड केलं.
ते मग खळे काकांनी एकत्र केलं... पण हे ही लक्षात असू द्या त्यावेळी आता प्रमाणे असंख्य ट्रॅक्स असलेले मिक्सर नव्हते. ते खळे काकांनी कसं काय एकत्र केलं त्यांनाच माहित... कसं आहे ना, अल्बम एकच पण त्यावर लिहू तितकं कमी आहे... तुम्ही जर आजपर्यंत तो ऐकला नसेल तर आवर्जून ऐकावा, यासाठी हा खटाटोप... आपण तर आता फक्त रेकॉर्डिंग ऐकू शकतो... तिकडे स्वर्गात खळे काका पंडितजी आणि लताबाईंकडून प्रत्यक्षात हीच गाणी ऐकत असतील... नाही का?