(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | हा तर नवा व्हॅलेंटाईन....
फेब्रुवारीचा हा 7 ते 14 चा काळ हा पूर्णच व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखला जातो.आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मानातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा खास आठवडा कामी येतो.
व्हॅलेंटाईन डे... ही सगळी थेरं त्या इंग्रजांची, आपल्याकडे नाही हो अशी संस्कृती.. कशाला पाहिजेत असे दिवस...? आम्ही काय प्रेम केलं नाही कधी? आम्हाला नाही लागली गरज अश्या दिवसांची.. अशी ओरड काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरातून ऐकू यायची.. व्हॅलेंटाईन डे हा शब्दचं स्वीकारणं याआधी किती कठीण होतं..
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीचा काळ हा काही खास दिवसांसाठी ओळखला जातो.. हग डे, किस डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे, टेडी डे अश्या वेगवेगळ्या गमतीदार दिवसांचा हा काळ.. बरं त्यात हे सगळं फक्त नवीन प्रेमात पडलेल्या तरुणांसाठी असतात अशी काहीशी कन्सेप्ट आपल्या मानावर बिंबवली गेली होती. मुलीनं व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी घराबाहेर पडणं म्हणजे तिने पापच केलंय अशी काहीशी वागणूक मुलींना मिळायची..
पण हीच वागणूक गेल्या काही वर्षांपासून थोडी बदललेली दिसते, बदललेली अर्थात या दिवसाला सकारात्मक पद्धतीने स्वीकारण्याची मनोवृत्ती समाजात निर्माण झालीये याचा प्रत्यय जागोजागी येतो.. यापूर्वी फक्त तरुणांसाठी म्हणून प्रसिद्ध असलेला हा दिवस आता प्रत्येक वयोगटातील लोकांकडून साजरा केला जातोय..
फेब्रुवारीचा हा 7 ते 14 चा काळ हा पूर्णच व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखला जातो.. आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मानातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा खास आठवडा कामी येतो.. 5-6 वर्षांपूर्वी असं काय वेगळं होतं आणि आता असं काय बदललंय की इतक्या सहज आपण सगळे या संस्कृतीचा एक भाग होऊन गेलोय?
गेल्या 5-6 वर्षांमध्ये जर काही बदललंय तर ते आपलं राहणीमान, सामाजिक माध्यमांचा वाढता वापर, व्यक्त होण्याच्या पध्दती, विचार करण्याचा कल...सर्वचं काही!
टीक टॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या माध्यमातून बरीच लोकं आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करत असतात.. आपणही याच माध्यमांचा भाग म्हणून त्यांना कंमेन्टच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असतो.. हे सगळं virtual असलं तरी याचा एक वेगळाच आनंद असतो जो खऱ्या आयुष्यातही जगण्याची एक वेगळीच मजा देऊन जातो.. आणि हा पूर्ण वीक तर आपल्याला सामाजिक माध्यमांवर भावनांचा पाऊस बघायला मिळतो आणि तो पाहून प्रत्येकाला आपल्या जवळच्या माणसाची आठवण येणं साहजिकचं.. अजून एक घडलेला बदल म्हणजे हा व्हॅलेंटाईन फक्त प्रियकर किंवा प्रेयसी यांपुरता राहिला नसून तो आई, बाबा, भाऊ, बहीण, मैत्रीण, मित्र या सर्वचं नात्यांमधल्या प्रेमाला एक नवीन पालवी द्यायला मदत करतोय..
या सर्व विचारसरणी मधील बदलामुळे व्हॅलेन्टाईन डे ची आपली कन्सेप्ट किंवा त्याबद्दल विचार करण्याची पध्दत बदलली आहे त्यामुळे आता तो दिवस आपल्या समाजात सहजरित्या स्वीकारला जातोय..
कोरोना काळानंतर प्रत्येक प्रेमाचं नातं हे किती गरजेचं आहे याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतलाय.. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन थोडा अधिकच स्पेशल म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही.. अरे 'हा तर नवा व्हॅलेंटाईन' ज्यामध्ये आपण आपल्या सर्वच प्रेमाच्या नात्यांना त्यांच्या असण्याचं महत्त्व पटवून देतो.. आपलं नातं अधीक मजबूत कसं बनवता येईल याचं गोड कारण तो बनतो.. 'मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे' या गाण्याचा खरा अर्थ समजावतो.