जिभेचे चोचले : जे डब्ल्यू कॅफे – आलिशान बुफे
लग्झरी हॉटेलांच्या कडीत सर्वाधिक पॉश मानली जातात ती मुंबईतली जे डब्ल्यू मॅरिएटची दोन हॉटेल्स.

आता गेल्या काही वर्षात मात्र या लग्झरीच्या ब्रॅण्डसमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. ताजबरोबरच लिला, ललित, आयटीसी असे कितीतरी पंच आणि सप्ततारांकित ब्रॅण्डस गेल्या काही वर्षापासून होतेच पण त्यात खासकरुन मुंबईत फोर सिझन्स, सेंट रेजिस, वेस्टइन सारखी नवीन पंचतारांकित हॉटेल्सही उघडलीत. पण या लग्झरी हॉटेलांच्या कडीत सर्वाधिक पॉश मानली जातात ती मुंबईतली जे डब्ल्यू मॅरिएटची दोन हॉटेल्स. एक जुहूला तर दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळाला अगदी खेटून उभं आहे. सतत बॉलिवूडच्या तारेतारकांची पहिली पसंती असल्याने तर जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये जाणं आणखीच मोठं स्वप्न ठरतं सामान्यांसाठी.
अशा या जे डब्ल्यू मॅरिएटच्या विमानतळावरच्या हॉटेलमध्ये अनेक रेस्टॉरन्ट्स आहेत, पण त्यापैकी ‘जे डब्ल्यू कॅफे’चा संडे ब्रंच हा मुंबईतला सर्वौत्कृष्ट मानला जातो. जगातले सगळे पदार्थ एकावेळी एकत्र बघायचे आणि चाखायचे असतील तर जे डब्ल्यू कॅफेतल्या संडे ब्रंचला भेट द्यायची असं त्या बुफेचं छोटेखानी वर्णन.
इतके पदार्थ एकाचवेळी एकत्र असल्याने खरं तर तिथे काय काय होतं. ते सांगायला कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पडावा इतकी जास्त असते इथल्या पदार्थांची संख्या. एक तर हा ‘जे डब्ल्यू कॅफे’ अतिशय भव्य आहे, खूप मोठ्या एका हॉलमध्ये अतिशय आरामदायक टेबल खुर्च्या मोठ्या संख्येनं लावलेल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला हा बुफे सजवलेला आहे. त्या भव्यदिव्य रेस्टॉरन्टमध्ये नजर जाईल तिकडे एकापेक्षा एक सुंदर सजावट असलेले पदार्थ दिसतात. त्या पदार्थांमध्ये इतकं वैविध्य असतं आणि इतकी आकर्षक सजावट की या रविवारच्या निवांत जेवणाची सुरुवात कुठून करावी असा प्रत्येकाला प्रश्न पडतो.
अर्थात इतर सगळे पदार्थ असले तरीही कुठल्याही पंचतारांकीत हॉटेलाची खरी शान असते ती तिथली बेकरी आणि सगळ्यात महत्त्वाचे असतात ते बेकरी शेफ्स. केक, कपकेक्स, स्लाईस केक, पेस्ट्रीज, मॅकरुन्स, कॅण्डीज, चॉकलेटचे विविध प्रकार आणि त्याबरोबर बर्फी, रसगुल्ले, गुलाबजाम यासारखे भारतीय डेझर्ट ही अशा संडे ब्रंचंची खरी शान असते.
जे डब्ल्यू कॅफेमधला बुफेही त्याला अपवाद नाही, किंबहुना अशा डेझर्टसची सर्वात जास्त आणि वेगळी व्हेरायटी जर आपल्याला एकत्र बघायची असेल तर केवळ एकत्र इतके डेझर्टस बघण्यासाठी आणि ते चाखण्यासाठी आपल्याला जे डब्ल्यू मॅरियटच गाठावं लागणार.
या डेझर्टच्या अनेक काऊंटरवरचे ५ टक्केही पदार्थ पण चाखू शकत नाही इतकी त्यांची संख्या जास्त असते, पण ती डेझर्टस एकत्र बघणंदेखील एक आनंददायक अनुभव असतो, कारण एखादा कलाप्रकार आपण बघतोय असं वाटावं इतक्या आकर्षक पद्धतीने हे डेझर्टस तयार केलेले असतात आणि त्यांची टेबलावंरची सजावटही तितकीच आकर्षक असते. एका रांगेत ठेवलेले दहा बारा प्रकारचे आणि हटके फ्लेवर्सचे अगदी सुंदर आयसिंग केलेले केक तर इतके छान दिसतात की चाकूने कापून त्याचा तुकडा काढायचा म्हणजे त्याचं सौंदर्य आपण नष्ट करु असं वाटून जातं. इतर ठिकाणपेक्षा जे डब्ल्यूच्या बुफेचं वेगळेपण म्हणजे भारतीय आणि परदेशी पदार्थांचा बुफेमध्ये साधलेला समतोल. तोच समतोल आपल्याला अगदी डेझर्टच्याही मांडणीत दिसतो.
जितक्या आकर्षक पद्धतीने केक, छोटे मोठे कपकेक, पेस्ट्रीचे विविध प्रकार, चॉकलेटांचे आकार आणि चवी यांच्यानुसार केलेली मांडणी असं सगळं असलं तरी तितक्याच सुंदर रितीने मांडलेले असतात बर्फीचे प्रकार, काजु कतली, मॅंगो बर्फीपासून ते बेसनाच्या लाडूपर्यंत सगळं काही तिथे मांडलेलं दिसतं.
हे ड़ेझर्टसचं जग आणि त्याची आकर्षक मांडणी बघून जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खायचं असं ठरवून आलेली व्यक्तीही नकळत सुरुवातीलाच डेझर्टकडे वळते आणि इतर पदार्थांकडे वळण्यापूर्वीच डेझर्टसची चव चाखू लागते. अर्थात ही खरोखरच सुरुवात असते. कारण जगभरातल्या प्रत्येक खाद्यसंस्कृतीची झलक आपल्याला या बुफेमध्ये बघायला मिळणार असते.
मग एका कडेला थाय पदार्थांचं थाय काऊंटर दिसतं. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला थेट मुंबईचं स्ट्रीट फुड म्हणजेच चाट काऊंटर. एका कोपऱ्यात डाएटचा विचार करणाऱ्यांसाठी सॅलड आणि फळांचं काऊंटर दिसतं.
तर त्याच्याच समोर डाएटचा अजिबात विचार न करणाऱ्यांसाठी नॉन व्हेज ग्रीलचा भलामोठा पसारा दिसतो. सर्व प्रकारच्या मांसाचे कापलेले तुकडे तिथे मांडून ठेवलेले असतात आणि आपल्या आवडीनुसार तसंच आपल्या आवडत्या चवीनुसार तिथे उभा असलेला शेफ आपल्याला तो मासाचा तुकडा ग्रील करुन देतो.
एके ठिकाणी सध्या तरुणाईत अतिशय लोकप्रिय असलेले वॅफल्स अगदी गरमागरम आपल्यासमोर तयार करुन दिले जातात. तर त्याच्या शेजारी थेट जपानी सुशी सजवलेल्या दिसतात.
एक तवा पुलाव काऊंटरही दिसतो एका बाजुला, चार रंगांत शिजवलेला भात तिथे मांडून ठेवलेला असतो आणि आपण सांगू त्याप्रमाणे तिथे आपल्याला तवा पुलाव तयार करुन दिला जातो. एक स्पाईस काऊंटर सजवून ठेवलेलं असतंय त्या मसाल्यांचा वापर करुन तयार केलेली भाजी आपण मागितली की आपल्या डिशमध्ये आणून दिली जाते.
कुठे कांदा भजी दिसतात, कुठे इटालियन पिझ्झा आणि पास्ता दिसतो तर कुठे आईस्क्रीमचे विविध फ्लेवर्स. कोल्डड्रिंक्सच्या काऊटरवर ज्युस आणि शितपेयांबरोबर ताजा उसाचा रसही बाटलीत भरुन ठेवलेला दिसतो. या सगळ्यात आपण थोडंफारच खाऊ शकतो. पण इतका मोठा बुफे आणि पदार्थांचं वैविध्य पाहून खवय्यांचं मन मात्र तृप्त होतं. आजकाल अशा संडे ब्रंचेससाठी आईबाबांबरोबर येणाऱ्या लहानग्यांचाही विचार होतो, तो इथेही केलेला आहे.
खास रविवारी येणाऱ्या बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी जोकरची फौज असते आणि त्यांना खेळायला डॉल्स हाऊसपासून ते चित्रकलेच्या साधनांपर्यंत सगळं काही असतं. अर्थात मुंबईतला सर्वात मोठा संडे बुफे हा मुंबईतला सर्वात महाग संडे ब्रंचही आहे, तेव्हा खूपच मोठं सेलिब्रेशन असेल तर मात्र जे डब्ल्यू हे अगदी योग्य ठिकाण आहे.
संबंधित ब्लॉग :
जिभेचे चोचले : बडोदा – शेव उसळीचं शहर
जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश जिभेचे चोचले : चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’ जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो… जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी ‘ग्रॅण्डमामाज् कॅफे’ जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे जिभेचे चोचले – सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी – ‘द जे’ जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट



















