एक्स्प्लोर
Advertisement
BLOG : 5 लाख चुलीत घाला...
22 कुटुंबाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चौकशी करु, पाठपुरावा करु अशा पोरकट आश्वासनांच्या पिपाण्या वाजवून त्या 22 जणांचं आयुष्य परत मिळणार आहे का? हाच खरा सवाल आहे.
आमचं काय चुकलं? तुमच्या हातात सत्ता दिली ते? की रेल्वे प्रवासात सुरक्षेची हमी मागितली ते? नियमित कर भरुनही सुविधांची अपेक्षा करुन आम्ही चूक केली आहे का?
चेंगराचेंगरीत प्रवाशांचा मृत्यू व्हावा इतका स्वस्त झालाय आम्हा मुंबईकरांचा जीव?
आज दसरा आहे, मात्र त्याआधीच 22 कुटुंबाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चौकशी करु, पाठपुरावा करु अशा पोरकट आश्वासनांच्या पिपाण्या वाजवून त्या 22 जणांचं आयुष्य परत मिळणार आहे का? हाच खरा सवाल आहे.
शब्दांचा सुकाळ तिथे बुद्धीचा दुष्काळ
अंगावर काटा येणारी, काळजाचा ठोका चुकावणारी ही दृश्यं पाहून कोणाच्या मनात उद्या मुंबईत येणाऱ्या बुलेट ट्रेनची स्वप्नं रंगणार आहेत? हृदयाला चटका लावणारी ही दृश्यं पाहून कोणत्याही सामान्य मुंबईकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल. दहशतवादी हल्ले झाल्यानंतर सामान्यपणे म्हटलं जायचं, मुंबईकर घरातून बाहेर गेला की परत येईल याची शाश्वती नसते. आज नाईलाजाने सरकारच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा या शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली आहे.
दुरुस्तीसाठी पैसे नसल्याच्या बाता मारणाऱ्या सरकारला जपानकडून बुलेट ट्रेनसाठी कर्ज घेण्याची अक्कल येतेतरी कुठून? मोदींनी व्हीआयपींच्या डोक्यावरचे लाल दिवे हटवले, पण त्याऐवजी मंत्र्यांच्या डोक्यात थोडा प्रकाश ओतला असता, तर आज या 22 जणांचं आयुष्य असं अंधारात गेलं नसतं मोदीसाहेब. ज्यांच्या जीवावर आज सत्तेची मुक्ताफळं चाखत आहात, त्यांना जर असं वाऱ्यावर सोडाल तर, 2019 मध्ये पापांची फळ घशात कोंबली जातील, हे ध्यानात ठेवा.
पैसे भरुनही वेळोवेळी सुरक्षा आणि सुविधांची मागणी करावी लागणं म्हणजे स्वत:च्याच घरी जेवणासाठी भीक मागितल्यासारखं आहे. अशीच अवस्था आज मुंबईकरांची झाली झाली आहे. रोजच्यारोज त्याच मागण्या करुन, तीच कटकट सहन करुन, स्वत:च्या जीवाशी खेळ करुन मुंबईकर पुरता हतबल झाला आहे. आणि तरीही सरकारला बुलेट ट्रेनची थेरं सुचत आहेत.
70 वर्षांमध्ये देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा ओतणाऱ्या मुंबईकरांच्या पोटी इतकी उपेक्षा? आज मुंबईत गेली ७ वर्षे मी प्रवास करतेय. सीसीटीव्ही, रेल्वे फलाटांची उंची, रेल्वेचं वेळापत्रक वा डब्बे किंवा फेऱ्यांची संख्या असो, यांसारख्या एक ना अनेक कटकटींना आम्हाला सामोरं जावं लागतं. संधीसाधू कावळे या घटनेचं भांडवल करून कावकाव करतील, मात्र तुमच्याही काळात परिस्थिती काही वेगळी नव्हती. तुम्ही आज सत्तेत असाल, उद्या कोणी दुसरा असेल, तुमचे दावे-प्रतिदावे होतील, आश्वासनं द्याल, पण ती खरंच आता चुलीत टाका. आश्वासनांचं गाजर दाखवणाऱ्यांना जागेवर आणण्याचं काम जनतेनंच केलं, त्यामुळे तुम्हालाही जनता तिथेच नेऊन ठेवेल, हे विसरू नका. आग लागल्यावर विहीर खणायला जाल, तर अंगाशी येईल.मुंबईकरांचा अंत पाहू नका.
शेवटी एकच, आपल्याला कोणी वाली नाही उरला.
त्यामुळे ‘कृपया धावती लोकल पकडणं अत्यंत धोकादायक आहे’ एवढंच लक्षात ठेवा!
संबंधित ब्लॉग
ब्लॉग : ...पण लक्षात कोण घेतो?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement