एक्स्प्लोर
खादाडखाऊ : 'धुंधुरमास' स्पेशल
सूर्य धनु राशीत भ्रमण करतो; तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून, या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्त्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूंमध्ये पचायला जड असलं, तरी या महिन्यात/ ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलं.

मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो. आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या. “वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला?” मग ‘वहिनींनीही किंचित खोकत, “होहो, आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नाही हो उशीर होणार!”, बोलत दोघी पुढे निघून गेल्या. मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.
मग विचार केला की, धुंधुरमास शब्द ऐकल्यावर म्हणजे काय? हा प्रश्न तरी निदान मला आणी माझ्या मित्राला पडला नाही. कारण नशिबाने माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय? हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते. पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो. त्यामुळे आजच्या मुलांना ‘धुंधुरमास’ म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच पाहिजेत.
सूर्य धनु राशीत भ्रमण करतो; तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून, या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्त्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूंमध्ये पचायला जड असलं, तरी या महिन्यात/ ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलं. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, एवढं याचं प्रचंड महत्त्व पूर्वजांकडून सांगितलं गेलं आहे. आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी. कारण, आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात; तिथे कालनिर्णयमध्येही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार?
या ऋतूमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार, फरस बी, वांगी, मटारसारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं, पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते, त्यावेळी खाण्यातली मजा आणी त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार, जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह” म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेला. हे लक्षात आलं की, त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.
काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही, तर अगदी पुण्यात देखील ठिकठीकाणी ‘धुंधुरमास’ वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा. शहरातल्या जुन्या, प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची. घराघरातून सूर्याला अर्घ्य देऊन, नैवेद्य दाखवून, पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची. तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगैरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल, तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं.
काही दिवस आधी, रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो. आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतः च्या शेतावर हजर होतं. तो नजारा पाहण्यासारखाच असतो.
तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार, गवार, गावरान गाजरं यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते. माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते. शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फर्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं, हिरवं वांगं गोवऱ्यांवर भाजण्यात दुसऱ्या सुनबाई दंग असतात. काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात. मुठीत मावतील एवढ्या हिरव्या मिरच्या, हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच. भाजत, गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं. घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या, मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो. नैवेद्याचं ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात.
चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात. घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं. एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत, आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.
चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते. तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची, “सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की गं!”, अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई, आत्ता ठीकाय, पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका, मला नै कधी लग्न करायचं”, म्हणत लाजून पसार होते. ते ऐकून समस्त काका, काकू, आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो. त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात. हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.
तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून, खांद्यावरचा पदर सावरत, कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मुगडाळीची खिचडी ढवळत, मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत, लाजत कोपर्यात उभी असते. सगळ्यांना तिची आठवण होते; ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना. नवीन धाकट्या काकुला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात. “धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”, असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.
कुटुंबातले थोरले अण्णा, तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात. गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या या जेवणावळी म्हणजे, एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.
माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अशा जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही. असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल.
पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं, तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत. रा. स्व. संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते. जे जे लोक, संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकांनी स्वागत करायला हवं. पुन्हा घरोघरी अशा धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी.
कारण धुंधुरमासाच्या या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमेली व्हॅल्यू” आहे. त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी 125 ग्रॅम पंजाबी भाजी, बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन, वरती प्रत्येकी एक स्कूप आईसक्रिमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.
संबंधित ब्लॉग
खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन
हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख
खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव
खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने
खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी
खादाडखाऊ : पुण्यातले इराणी
मित्रो !!! आज खिचडी पुराण
खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ
खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?
खादाडखाऊ : जखमा उरातल्या
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे
खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड
खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं
खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ
खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’
खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची
खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी
खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
View More
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण

























