एक्स्प्लोर
माझे रेडिओ पुराण
आज आकाशवाणीचा वर्धापन दिवस आहे. 23 जुलै 1927 ला आजच्याच दिवशी मुंबईमध्ये पहिल्या रेडिओ केंद्राची सुरुवात झाली. त्यानंतर कोलकाता येथे दुसरे केंद्र सुरु झाले. हीच सेवा पुढे जाऊन ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. घराघरात टीव्हीचे साम्राज्य येण्याआधी, रेडिओलाच अनन्य साधारण महत्त्व होते. हा ब्लॉग रेडिओ आणि सामान्य माणसाच्या जीवनाचे नाते सांगतो. हा लेखकाचा नुसता नॉस्टेल्जिया नाहीए तर एक प्रवास आहे, रेडियो सोबत जगण्याचा!

तशा आठवणी खूप आहेत... अगदी पहिली आठवण जी डोक्यात येतेय ती "उठी उठी गोपाळाची", नाही तर "दे रे कान्हा चोळी न लुगडीची".... साडे बाराची शाळा असायची... रोज हां.. रोज आई भरवायची आणि वर कोपऱ्यात असलेला कोणत्या तरी कंपनीचा रेडिओ सुरु असायचा त्यावर ही रोजची गाणी... या दोन गाण्यांशिवाय घरातून निघायचो नाही कारण त्यांची वेळ आणि शाळेची घंटी वाजायची वेळ पुढे मागे असायची... एखाददिवशी ते गाणेच लागले नाही की मग बोंब... आकाशवाणीवर इतका विश्वास होता मला...
एफएम म्हणा, आकाशवाणी म्हणा पण माझ्यासाठी रेडिओच. आईचा रोजचा दिनक्रम साडे चार-पाचला सुरु व्हायचा, ज्यात आजपर्यंत अंतर झालेलं नाही. तेव्हा दिवस सुरु होण्याच्या आधी आमच्या घरी रेडिओ सुरु व्हायचा... साडे पाचला देवाची गाणी, मग क्रम हळूहळू सुगम संगीत आणि नाट्य संगीताकडे यायचा. शेवटी नवीन फिल्मी मराठी गाणी. सोबत मध्येच एखादं पुस्तक वाचन, संस्कृतच्या श्लोकांचा अर्थ, नाही तर कोणत्यातरी विषयावर चर्चा असायची... मला आठवतंय, बोस यांच्यावरचं महानायक पुस्तक मी आकाशवाणीवरच ऐकलंय... शेवटी बोस अपघातात गेले तेव्हा दिवसभर सुन्न होतो... असो.
तोपर्यंत सकाळची शाळा सुरु झालेली... पण आकशवाणी बदलली नाही... फक्त एक नवीन सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम सुरु झालेला तेव्हा तो आठवतो... बाकी जैसे थे... साडेसातची शाळा असायची... आई चपाती वगैरे करुन डबा भरुन द्यायची... आणि मी रेंगाळत तिथेच. त्यावेळी एक धक्का बसला... घरी रंगकाम करताना तो जुना रेडिओ बंद पडला... त्यात कॅसेट टाकून ऐकता पण यायचं.. पण परिस्थिती नव्हती सो कधी कॅसेट विकत घेता नाही आल्या... कदाचित म्हणून आकाशवाणी आम्ही ऐकायचो... बरं घरात कोणाला त्या डब्ब्यात जास्त इंटरेस्ट नव्हता... त्यामुळे ताई आणि आणि पप्पा रोजच्या रहाटगाड्यात होते... मी मात्र दुःखाचा डोंगर वगैरे कोसळल्याप्रमाणे काही दिवस गप्प... आणि जिथे कॅसेट घ्यायची ऐपत नाही तिथ टीव्हीचं नाव पण काढलं नाही आम्ही कधी... त्यामुळे विरंगुळा वगैरे आयुष्यातून थेट हद्दपार... ते वर्ष तसंच गेलं...
मग सहावी-सातवीमध्ये होतो वाटतं... तेव्हा माझा काका, किशोर काका, त्याने कुठून तरी एक जुना डब्बा घरी आणला... आयताकृती, लांबट, स्पीकर नसलेला, आणि थोडासा विद्रुप. जेव्हा त्याने सांगितलं की तो एफएम रेडिओ आहे तेव्हा डोक्यात ट्यूब पेटली... त्याच वेळी आमच्या बाजूचे चाळीतले, घर विकून दुसरीकडे राहायला जात होते... त्यांनी जाताना आशीर्वाद म्हणून एक स्पीकर मला दिला... कसला आनंद झाला... कारण एफएमचा तो डब्बा याच्याशिवाय घरी बंद पडून होता आणि स्पीकर विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. मला आठवतं आईला एक दिवस म्हणालो मी आपण स्पीकर घेऊया तर आईने दीड हजार रुपयांचा हिशोब मला सांगितला आणि नंतर म्हणाली इतकाच पगार आहे तुझ्या पप्पांना... आपण गरीब आहोत याची जाणीव आधीपासूनच होती पण तेव्हा खात्री झाली, ते आमच्या भाषेत म्हणतात ना; कन्फर्म झालं! असो. म तो स्पीकर आला... मागे कशातरी वायरी जोडून, जुगाड वगैरे करुन त्याला काकाने सुरु करुन दिला... पण हे एफएम वगैरे प्रकरण मला काही आवडलं नव्हतं कारण त्यात आकाशवाणी नव्हती, मुळात त्याला अँटिनाच नव्हता... मग काही दिवस गेले मला हे पचवायला की यापुढे आकाशवाणी नाही. त्याच वेळात एफएम कसा चालवायचा ते शिकतो. बरं तेव्हा रिमोट नव्हते सो स्वतः जाऊन हाताने ते गोल बटन फिरवून प्रत्येक चॅनेल सेट करावं लागायचं... झालं... ही नवीन कसरत... पण घरात पुन्हा गाणी सुरु झाली... आठवी, नववी, दहावी हाच एफएमचा डब्बा आणि भलामोठा स्पीकर सोबत होता... हिंदी गाणी आणि कलाकार यांची ओळख तेव्हा सुरु झाली... मराठी गाणी, त्यांचे संगीतकार, गायक. गीतकार यांची ओळख आकाशवाणीने करुन दिलेली होतीच. बरं इथे हिंदी गाणीच जास्त, मराठी गाणीच नाही त्यामुळे आईचा इंटरेस्ट गेलेला.. तिच्यासाठी मग देवाने ऐकलं आणि १०७ एफएम रेन्बो हे एफएम चॅनेल सुरु झालं ज्यावर निदान सकाळी ५ ते ८ मराठी गाणी असायची... क्रम तोच. आधी देवाची गाणी, मग मधल्या काळातली गाणी, नाट्यसंगीत, बालगीत मधेच बातम्या आणि मग नवीन मराठी गाणी... भीमसेन जोशी, वसंत देशपांडे, अभिषेकी बुआ, किशोरी ताई, अगदी प्रल्हाद शिंदे या दिव्य स्वरभास्करांच्या "सा" ने दिवसाची सुरुवात व्हायची तेव्हा... पुन्हा एकदा सकाळच्या स्टोव्हच्या लयीसोबत आई गुणगुणू लागली... सोबत आम्ही... नाश्त्याला चहा-चपातीसोबत आईचे गावचे किस्से... मग शाळा आणि पुन्हा घरी येऊन रात्रीपर्यंत एफएम...
ज्यावेळी माझ्या मित्र मैत्रिणींना अंडी ओळखीच्या लोकांना अजय अतुल, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांचे गाणे आवडायला लागले होते, त्याच्या काही वर्ष आधीपासून मी त्यांना ओळखत होतो... राधा हि बावरी, कोंबडी पळाली आणि अशी बरीच गाणी तेव्हा एफएमवर पूर्ण ऐकायला मिळायची... नंतर फोनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे ती लोकांना माहित झाली... एक फायदा हाही झाला की घरात टीव्ही नसून सगळी नवीन जुनी गाणी माझी पाठ झाली... कारण त्यावेळी तीन वेळा होत्या... सकाळी मराठी, दुपारी आणि संध्याकाळी नवीन हिंदी गाणी आणि झोपायच्या वेळी तेव्हा सगळ्या एफएम चॅनेल्सवर गोल्डन इरा म्हणजे साठ सत्तर ऐंशी अश्या दशकातली जुनी गाणी लागायची... त्यामुळे सर्वच गाणी पाठ... अभ्यास मात्र सपाट.... किशोर, रफी, मन्ना डे, मदन मोहन, आशा, लता सगळे तेव्हा भेटले मला.... अजून तसेच आहेत मनात... यांच्या सोबत इतर संगीत क्षेत्रातील नवीन कलाकार पण भेटले... तोपर्यंत दहावी आली... आणि माझी शाळेला निघण्याची नवीन वेळ निश्चित झाली... आता "ऋणानुबंधाच्या..." सुरु झालं कि ते ऐकून मी निघायचो... कुमार गंधर्व खूप आवडायचे तेव्हा...
दोन गमती आठवतात तेव्हाच्या.. या नवीन एफेमच्या डब्ब्याच्या.. माझा अर्धा दिवस हीच दोन कामं करण्यात जायचा... काही दिवस व्यवस्थित साथ दिल्यानंतर आणि उत्साहात मी हवी तशी एफेमची चॅनेल्स बदलल्या नंतर त्या डब्याचे चॅनेल बदलण्याच्या गोल स्विचने अचानक एक दिवशी स्वतःहून वेगळे होऊन आत्महत्या केली... थेट हातातच आला ना राव... आता? स्विच तर तुटला मग चॅनेल बदलणार कसे? फ्रिक्वेन्सी जुळणार कशी? पुन्हा एक जुगाड केला... त्या स्विचच्या आतमध्ये एक बारीक दोरा होता जो फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी वापरला जायचा... त्याला बाहेर काढून एका पेनाला गुंडाळले आणि पुन्हा त्याच स्विचच्या जागी तो पेन लावला... पुढची दोन वर्ष मग पेन फिरवून फ्रिक्वेन्सी सेट केलीये मी... आणि दुसरी गंमत म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे याला अँटिना नव्हता, त्याजागी एक वायर होती जशी आता चारचाकी गाड्यांमध्ये असते.. ती वायर योग्य जागी ठेवणे आणि ती तशीच पुढचे काही दिवस राहिल याची खातरजमा करणे यात माझ्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया गेलाय... चांगलं गाणं लागलं की मग तर जिथे फ्रिक्वेन्सी येईल तिथे मी उभा असायचो.. अगदी हलायचं पण नाही... नाहीतर कधी खिडकीवर कधी दरवाज्यावर कधी घराच्या पत्र्यावर ती वायर अडकवण्याची कसरत असायची... यामुळे अभ्यास बुडाला आणि त्यामुळे आईने शिव्या आणि मार दिला तो तर वेगळाच.... असो.
दहावीनंतर एक वर्षाच्या आतच या डब्याने पण माझी साथ सोडली... एकदा जो कोमामध्ये गेला तो बाहेर आलाच नाही... फक्त घुरघुरचा आवाज यायचा... जसा की तो व्हेंटिलेटरवर होता.. स्पीकर बिचारा एकटा पडला... त्यापेक्षा जास्त मी... तोपर्यंत आमच्याकडे टीव्ही नव्हता... त्यामुळे पुन्हा एकदा आयुष्यातून विरंगुळा हरवला आणि मी पुन्हा अनाथ झालो... त्यानंतर पुन्हा आमच्याकडे कधीच रेडिओ, एफएम, म्युजिक प्लेयर अशी कोणती गोष्ट आली नाही... हा डब्बाच शेवटचा, ज्याने मला दगा दिला... तब्बल दहा वर्ष हे नातं होतं... खूप काही शिकवलेलं या रेडिओने, मनावर गाण्याचे संस्कार केले, एक अनाकलनीय ओढ निर्माण केली, आयुष्य व्यापून टाकलं, सुखदुःखाच्या क्षणात एक अखंड सोबती मिळवून दिला... आणि एक दिवशी स्वतःच आयुष्यातून गेला... खूप महिने याचा त्रास झाला... जोपर्यंत अभय दादा. माझ्या मामाचा मुलगा, याने आम्हाला टीव्ही गिफ्ट म्हणून दिला नव्हता... त्यानंतर स्वरुप बदललं, जे फक्त ऐकायचो ते बघू लागलो, अनेकांची काल्पनिक चित्र मनात तयारी केलेली, ती बदलू लागली, ज्यांना आवाजाने ओळखायचो त्यांना डोळ्यांनी ओळखायला सुरुवात झाली... टीव्हीने नवीन गोष्टी आयुष्यात आणल्या.. पण जे नातं रेडिओ सोबत होतं ते कधीच निर्माण नाही झालं... त्या नात्याची निशाणी म्हणून ठेवलेला तो एफएमचा डब्बा आणि त्याचा साथीदार स्पीकर एक दिवशी घर सोडून निघून गेले... आमच्या दहा बाय बाराच्या घरात टीव्हीमुळे तयार झालेली अडचण त्यांनी जणू आधीच ओळखली होती... कदाचित त्यांना हे देखील माहित होतं, की जोपर्यंत ते या घरात जिवंत आहेत तोपर्यंत या घरातली माणसं आयुष्यात पुढे जाणार नाहीत... नवीन बदल आत्मसात करणार नाहीत... कदाचित म्हणून त्या डब्ब्याने स्वतःहून इच्छा मरण स्वीकारले असेल.... असो.
घरातला रेडिओ गेला तरी आज हातात असलेल्या मोबाईलमुळे तो कुठेतरी जिवंत आहे... किंबहुना मी त्याला ठेवलाय... आजही एफएम ऐकल्याशिवाय मन रमत नाही... घरातून निघताना, गाडीमध्ये बसल्यावर, काम करताना, झोपताना एफएम रेडिओ एकदातरी लागतोच... त्यात जर ट्रेनचा प्रवास असेल आणि कानात एफएमवाजत असेल तर आयुष्य याहून सुंदर नकोय मला... मोबाईलच्या माध्यमातून जुनं नातं पुन्हा एकदा सापडलं... रोज टीव्हीवर दिसतो तरी एफएमवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी अधून मधून कॉल करत असतो, मग स्वतःचाच आवाज एफएमवर ऐकला की क्षणिक अभिमान वाटतो स्वतःचा... असो.
आज आकाशवाणीचा वर्धापन दिन आहे... आकाशवाणीची आधीची प्रसिद्धि आणि गरज दोन्ही आज लयाला गेली आहे... हे लक्षात आल्यावर का कोण जाणे जुन्या दिवसांचे थेम्ब डोळ्यात जमा झाले... आठवणी ओघळल्या... मग म्हंटल या अश्याच वाहून जाण्यापेक्षा शब्दबद्ध का करू नये... म्हणून हे पुराण लिहिलं... बाकी रेडिओ आणि मी काल होतो, आज आहे, आणि उद्याही राहणार... असेच सोबत!
View More

























