एक्स्प्लोर

BLOD : Covid पॉझिटिव्ह झालो ती रात्र...

3 वर्ष झाली आज! Covid मधून बरा होऊन डिस्चार्ज मिळाला त्या दिवसाला. त्या आधीचे 10 दिवस प्रचंड क्लेशदायक पण सर्वांनी दिलेल्या मदतीचे आणि धीराचे होते. जेव्हा मला Covid झाला तेव्हा पहिल्या लाटेची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे Covid होणे हा एक शाप समजला जात होता. आज या रोगाला खूप हलक्यात घेतलं जातं. हॉस्पिटलमध्ये दाखल झालो त्या रात्री एक अनुभव लिहिला होता. अजूनपर्यंत कधी तो शेअर केला नाही, आज करतोय.... 

तारीख 12 एप्रिल 2020! 
वेळ संध्याकाळी 7 नंतर... 
आई बाहेर आणि मी दुसऱ्या घराच्या आत बसलेलो... गेले 2 दिवस मी अति काळजी घेत होतो, म्हणून आधीच आई घाबरली होती.. तिच्या मनातली भीती घालवायला म्हणून तिच्याशी गप्पा मारायचा प्लॅन होता... हळूहळू इकडचे तिकडचे विषय बोलून वेळ काढत होतो... दुसऱ्या दिवशी सोमवार होता, सो माझा एक आठवडा वर्क फ्रॉम होम सुरु होणार होतं... बोलण्यात आईला काही जाणवू न देण्यासाठी ओठ धडपड करत होते... पण मनाची साथ त्याला मिळत नव्हती... 11 तारखेच्या सकाळपासूनच माझ्या मनात विष पसरलं होतं... एखाद्या सापाने दंश करुन माणूस मरु नये... पण अंगात भिनत चाललेल्या विषाची त्याला जाणीव व्हावी... हळूहळू एक एक अवयव निकामी होण्याची जाणीव त्याला होत जावी... तशी अवस्था माझी होती... आदल्या दिवशी एका विचाराच्या सापाने मनाला दंश केला होता... त्यामुळे विष 2 दिवस अंगभर पसरत चाललं होतं... इतक्यात ई-मेल आल्याची एक रिंगटोन वाजली आणि... ई-मेलचं नाव बघून मनात कोरडं पडलं... आपसूक मन खोटी शाश्वती देऊ लागलं... काही होणार नाही... पण वाऱ्याच्या एका लहान झुळुकीसोबत सुकं पान गळून पडावं तशी ती शाश्वती गळून गेली... कारण रिपोर्ट होता तो माझा... त्यात ठळक अक्षरात लिहिलेलं "Detected"! 

एका कानात व्हेंटिलेटरचा आवाज तर दुसऱ्या कानात आईची हाक... नक्की ओ कोणाला देऊ? प्रश्न... अगणित प्रश्न एकामागे एक मनात येत होते... कोरड्या पडलेल्या घश्यातून आवंढा गिळला जात नव्हता... समोर उभा असलेला भविष्यकाळ बदलण्याच्या निरर्थक हालचाली सुरु झाल्या... ई-मेल बंद करुन पुन्हा उघडून तोच रिपोर्ट बघितला...तो डाऊनलोड करुन झूम करुन बघितला... नाव नक्की माझंच आहे ना? तेही बघितलं... प्रिंटिंग मिस्टेक तर नसेल ना झाली म्हणून अक्षर अन् अक्षर वाचून काढलं... पण नाही... काहीच बदल नाही... तो होणारही नाही हे लक्षात आलं... अचानक हिमालयाच्या पायथ्याशी उभा राहून त्याचं टोक शोधू लागलो... हा दगड बर्फाचा नव्हता... तो होता व्यथा, वेदना, अश्रू आणि अपरिमित दुःखाचा... एका संकटाचा... ज्यातून वाट काढू शकत नव्हतो... फक्त त्याला सामोरं जाणं हाच एक उपाय होता... 

बसल्या जागेवरुन उठलो... दरवाजा बंद केला...खिडकी लावली... एका जागी सुन्न होऊन बसलो... आई बाहेर होती... चाळीत नेहमीपेक्षा जास्तच गोंगाट सुरु होता... पोरं ओरडत होती... पण कानापर्यंत पोचणारे ते आवाज डोक्यात शिरत नव्हते... मनातलं विष अंगभर पसरलं होतं... आता फक्त त्याच्या पसरण्याची नाही तर त्याच्यामुळे होणाऱ्या वेदनांची जाणीव सुरु झाली होती....एक एक करुन अवयव सुन्न होत जात होते… पण आता या विषावर औषध नव्हतं… जे काय होईल ते सहन करणं हेच उरलं असल्याने थाऱ्यावर आलो… आधी काही कॉल केले… महत्वाच्या काही लोकांना ही गोष्ट सांगितली… जे माझ्यासोबत होते… 

एक दिवस आधीच मी टेस्ट केली होती… 11 तारखेला सकाळी मुंब्र्यात होतो… तिथेच समजलं होतं की एका पोलिसाला कोविड 19 झालाय… पाण्यावर विषारी साप सर्रकन सरपटत जावा तशा सर्व आठवणी डोळ्यांसमोर आल्या होत्या… त्याला कधी भेटलो? त्यावेळी काय काय केलं? मास्क होता का? सॅनिटायझर लावलेलं का? त्यानंतर शरीरात काही बदल झालेले का? सगळं आठवायचा प्रयत्न केला… पण मन राहवत नव्हतं… म्हणून माझ्यासोबत अजून दोन सहकाऱ्यांनी टेस्ट करुन घेतली होती… त्याचाच रिपोर्ट आज आला… रिपोर्ट केल्यापासून मनात खोल कुठेतरी माहीत होतं की रिपोर्ट काय येणार ते… काही गोष्टी मनाला आधीच ठावूक होतात म्हणे… असो… त्यामुळे धक्का बसलेला असला तरी 10 टक्के मनाची तयारी होती… 90 टक्के झाली नव्हती कारण मन ते एक्सेप्ट करायला तयार नव्हतं… पण आता तर सर्वच क्लिअर झालं होतं… टेस्ट चुकीची देखील येते हा बहाणा करुन पाहिला पण शेवटी सगळं सोडून तयारीला लागलो… 

इतक्यात वावटळीसारखी बातमी पसरली… कॉल सत्र सुरु झाले… एकीकडे माझी मनस्थिती त्यात धीर देणारे कॉल… कोणाला सांगू की लपवू? असे मनात उद्भवलेले प्रश्न… सर्वात मोठा प्रश्न… आई बाबा, बायको आणि बाकी जवळच्या लोकांना काय सांगू? की मी तुम्ही सांगून, ओरडून, बजावून, धमकी देऊन पण तेच केलं जे करायला नको होतं? की पत्रकार म्हणून मी इतका वाहवत गेलो, एक फॅमिली आपल्या जीवावर आहे हे विसरुन गेलो? बाहेर नको पडू, पडलास तर खूप काळजी घे, आमचा विचार कर, गरोदर बायकोचा विचार कर… असं सगळं आई रोज निघताना सांगायची… काय केलं मी हे सर्व ऐकून? ज्या गोष्टीसाठी जीवावर उदार होऊन पत्रकारिता केली ती गोष्ट आज ढाल बनून समोर उभी राहिली का? 

वणवा पेटलेला… विचारांचा… भावनांचा… माझ्या डोळ्यांसमोर मला दिसत होता… एक दोन बाजूंनी नाही, चहुबाजूंनी धुमसत होता… त्यात एक एक आधार जळून जात होते… मध्यभागी मी उभा होतो… फक्त मीच नाही… आई, बाबा, बायको, तिचे आई वडील, आजूबाजूची माणसं… एक चूक आणि सर्व भस्मसात! माझी चूक, जाणूनबुजून केलेली… वणवा विझवायला काही साधन आहे का पाहत होतो… पण पश्चाताप सोडून काहीच मिळालं नाही… इतकंच काय डोळ्यातलं पाणी पण आज ओघळू पाहत नव्हतं… दुःखात सर्वात पहिले धावून येणारे अश्रू… आज त्यांनी पण गद्दारी केली होती… माझ्या चुकीला क्षमा करायला ते पण आज नव्हते… 

तेव्हा बायकोचा कॉल आला…

सगळं ठीक आहे ना? … तिने विचारलं..

होय… थोडा मूड ऑफ आहे.. होईल नीट… मी म्हणालो…

विश्वास बसला तिला ( कदाचित )... म्हणून फोन ठेऊन ती गेली… इथे माझ्यामुळे तिला येणाऱ्या काळात भोगाव्या लागणाऱ्या वेदनांची जाणीव होऊन मी अर्धमेला झालो… इतक्यात आईने हाक दिली… जेवण घेऊन येऊ का विचारत होती.. बिचारी… कदाचित तिला भविष्यात डोकावता आलं असतं तर याच प्रेमाने, काळजीने तिने विचारलं नसतं… रागावून का होईना जेवण मात्र दिलं असतं… पुन्हा हाक ऐकू आली तेव्हा खिडकीतून तिने विचारलं.. 

काय झालंय नक्की… तुला तर ते झालं नाही ना? असेल तर आताच सांग… आम्ही मरायला मोकळे… 

असं म्हणत ती जेवण आणायला गेली…तिचा एक एक शब्द एखाद्या रागीट ऋषींच्या तोंडून निघालेल्या भविष्यवाणी सारखा वाटत होता… 

अखेर तिला किंवा कोणालाच काहीही न सांगता उद्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं… असं ठरलं… जेवलो… भांडी वगैरे घासून, दुसऱ्या दिवशीच्या काळ्या दिवसाची तयारी करायला लागलो… सर्व तयारी झाली आणि आईला खोटं खोटं निर्धास्त केलं… मला काहीही झालं नाही, मला काही होणार नाही… पण काही दिवस घरापासून लांब राहिन… असं सांगून तिचे प्रश्न अर्धवट ठेऊन घर बंद केलं… बिछाना तयार केला.... आज खरंच तो बिछाना एक मृत्यूशय्या दिसत होता… जो जिवंतपणी मला त्यावर झोपायला भाग पाडत होता… तिथे आडवा झालो… आजची निद्रा ही चिरनिद्रा का नाही होऊ शकत यावर विचार करत होतो… माझ्यामुळे घरच्यांना जे सहन करावं लागणार आहे त्याची प्रचिती येऊन मनात विचार येत होते… वर पंखा फिरत होता… छताचे लोखंडी अँगल दिसत होते… बाजूला लांब साडी दिसत होती… पण तो विचार करायला मन तयार नव्हतं… या प्रसंगातून घरच्यांना मीच बाहेर काढू शकतो ही जाणीव होत होती… 

तशी रोज मला लवकर झोप नाहीच येत… आज मात्र डोळे झोंबत होते… कदाचित संध्याकाळपासून रडायला आसुसलेले असल्याने असेल… भरलेल्या पाण्याने जड झाले होते… पण अश्रू… आज प्रसन्न व्हायला तयार नव्हते… दुसरीकडे तोच वणवा पेटलेला दिसत होता… आता इतका जवळ आलेला की त्याचा दाह जाणवत होता… अंगाला चटके बसत होते… बाजूला नजर गेली तर त्याच वेदना आई, वडील, बायको, आजूबाजूचे सहन करत होते… माझ्यामुळे माझ्यासोबत एक कुटुंब वणव्यात जाताना दिसत होते… या वणव्याला अंत नव्हता… निदान पुढचे काही दिवस त्याला कोणीच शांत करु शकणार नव्हतं… त्याच दिवसांचा विचार सुरु असताना डोळ्यांनी हार मानली आणि झोपेच्या स्वाधीन मला केलं.


BLOD : Covid पॉझिटिव्ह झालो ती रात्र...

अक्षय भाटकर!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
Embed widget