BLOG : मैदानाबाहेर क्रिकेटवॉर नकोच
बुधवारचा दिवस क्रिकेट विश्वातल्या एका बातमीने गाजवला. जी बातमी कोणत्याही फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची नव्हे, तर ती बातमी होती कोहली-अश्विन यांच्यात बेबनाव झाल्याची. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा मुकूट ज्याच्या शिरपेचावर आहे, त्या विराट कोहलीची ऑफ स्पिनर अश्विनने थेट बीसीसीआयकडे तक्रार केली.
आधी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील हार, त्यानंतर इंग्लंडमधील मालिकेत जरी भारतीय संघाने दोन सामने जिंकले असले तरी त्यांचा झालेला एक पराभव अत्यंत मानहानीकारक होता, हे विसरता कामा नये. सर्वबाद 78 असा केविलवाणा स्कोअरबोर्ड पाहण्याची दुर्दैवी वेळ याच दौऱ्यात आपल्यावर आली, त्यातच आणखी एक चर्चा रंगली ती या मालिकेच्या एकाही कसोटीत संघातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज अश्विनला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याची.
कर्णधार कोहली आणि रवी शास्त्री हे कॉम्बिनेशन सक्सेसफुली वर्क झालं असलं तरी त्यांच्याबद्दलच्या नकारात्मक बातम्याही अनेकदा आल्यात. हेकेखोरपणा, मनमानी हे शब्द या बातम्यांमध्ये काही वेळा आलेत.
दोघांचं किलर इन्स्टिंक्ट, दोघांचा आक्रमक बाणा यामुळे हे समीकरण अपोझिशनसाठी डोकेदुखी ठरतंय. टीम इंडिया परदेशात जाऊन सातत्याने सामने जिंकतोय, हे उत्तमच आहे. त्याच वेळी जर संघातील काही खेळाडू कोहलीबद्दल थेट नाराजी व्यक्त करत असतील तर, ही गंभीर बाब आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद फायनलमधील पराभवानंतर पुजारा, रहाणे यांनीही बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त केल्याची बातमी आलीय. त्यात भर अश्विनच्या नाराजीची. कोहलीची गणना ऑल टाईम ग्रेट्समध्ये करायला सुरुवात झालीच आहे. त्याच वेळी तो सध्याच्या जनरेशनच्या केन विल्यमसन, ज्यो रुट, स्टीव्ह स्मिथ यांच्यासह सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. अलिकडच्या दोन वर्षातील त्याची कामगिरी सोडल्यास कोहलीचं सातत्य अमेझिंग आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समध्ये तो तितकाच कन्सिस्टंट आहे. त्याच वेळी एकही आयसीसी इव्हेंटचं विजेतेपद नावावर नसण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर आहे, हे सत्य नाकारता येत नाही. त्यात इंग्लंड भूमीवर एकाही कसोटीत संघातील बेस्ट स्पिनर असलेल्या अश्विनला जागा न मिळणं, ही साधी बाब नव्हती.
विशेषत: संघातील अष्टपैलू फिरकीपटू रवींद्र जडेजाची गोलंदाजी म्हणून कामगिरी अप टू द मार्क होत नसतानाही त्यालाच खेळवत ठेवणं, हे भुवया उंचावणारं होतं. वन टू वन कम्पॅरिझन करायची झाली तर जडेजाची आक्रमकता, त्याचं चपळ क्षेत्ररक्षण ही त्याची जमेची बाजू आहे. असं असलं तरीही कसोटी क्रिकेटमध्ये अपोझिशनच्या वीस विकेट्स काढण्यासाठी तुम्हाला क्वालिटी बोलिंग अटॅकची गरज असते. तिथे अश्विन त्याच्यापेक्षा केव्हाही सरस आहे, हे कोहलीही मान्य करेल. शिवाय ऑस्ट्रेलियन भूमीवर एका कसोटीत हनुमा विहारीच्या साथीने अश्विनने कांगारुंच्या वेगवान आक्रमणाचे वार अंगावर झेलत खिंड लढवली. ती मालिका आपण जिंकण्याचा जो कळस गाठला, त्या खडतर वाटेवरची ही ड्रॉ कसोटी महत्त्वाची पायरी होती. इतकं सगळं असताना त्यातही जडेजा गोलंदाज म्हणून आणि एखाददोन इनिंगजचा अपवाद वगळता फलंदाज म्हणूनही फ्लॉप होत असताना त्याला चारही कसोटी सामन्यात खेळवण्यात आलं आणि आता ही बेबनावाची बातमी. या धुसफुशीची क्रोनॉलॉजी बघा. विराट कोहली टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर कॅप्टन्सी सोडण्याची घोषणा करतो. त्या संघनिवडीच्या वेळीही अश्विनच्या विरोधात तो उभा असल्याचं वृत्त येतं. रोहित शर्माकडून उपकर्णधारपद काढून घ्यावं, अशी मागणी त्याने केल्याचीही पुन्हा बातमीच. या घटनाक्रमाला काय म्हणावं.
जरा इतिहासाची पानं चाळली तर, अनिल कुंबळे कोचपदावरुन जाण्यासाठीही कोहलीच जबाबदार असल्याच्याही बातम्या याआधी येऊन गेल्यात. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाककडून पराभव पत्करावा लागल्यानंतर कुंबळे-कोहली यांच्यात कटूता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून आली होती. कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये अनेक मालिका जिंकल्या असल्या तरी मैदानाबाहेरील या बातम्यांची मालिका त्याच्याबद्दल संशयाचं धुकं निर्माण करणारी आहे.
या बातम्यांमध्ये जर तथ्य नसेल तर कोहलीने त्या त्या प्लेअरला सोबत घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सर्व बातम्यांचं खंडन करावं आणि वस्तुस्थिती समोर आणावी. त्याच वेळी जर त्या बातम्या खऱ्या असतील तर मात्र कोहलीने आणि बीसीसीआयनेही याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. टीम इंडियाचा परदेश भूमीवरील विजयाचा आलेख उंचावण्यात कोहली-शास्त्री जोडगोळीचा मोलाचा वाटा आहे, हे कुणीही नाकारण्याचा प्रश्नच नसला तरी अशा नकारात्मक बातम्यांचे व्हायरस ड्रेसिंग रुमचं आरोग्य बिघडवू शकतात. पर्यायाने मैदानावरच्या कामगिरीचंही.
बीसीसीआयची धुरा सध्या सौरव गांगुली यांच्याकडे आहे. कर्णधारपदी असताना टीम इंडियामध्ये आक्रमकतेची वात लावणाऱ्या गांगुली यांना आता ही संघातील मतभेदांची कथित आग विझवताना फायर ब्रिगेडची भूमिका बजावावी लागणार आहे. या धुसफुशीचा क्लायमॅक्स पॉझिटिव्ह नोटवर होईल, अशी अपेक्षा करुया, कारण कोहलीच्या संघाला परदेश भूमीवर जिंकताना आम्हाला अजूनही भरभरून पाहायचंय आणि त्याला आतापर्यंत हुलकावणी देणारी आयसीसीची ट्रॉफीही त्याच्या हातात आल्याचं दृश्य मनात साठवायचंय.