(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची 'अशी' करा पूजा; सर्व संकटातून मिळेल मुक्ती, सुखाची होईल भरभराट
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विधीनुसार कुष्मांडा मातेची पूजा करावी. यामुळे भक्ताला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीचा उत्सव देशभरात जल्लोषात सुरु आहे. त्यानुसार, देवीचा आजचा चौथा दिवस आहे. आज देवी दुर्गेच्या चौथ्या रुपाची म्हणजेच कुष्मांडाची पूजा केली जाते. तसेच देवीसाठी उपवास केला जातो. शारदीय नवरात्रीच्या (Shardiya Navratri 2024) चौथ्या दिवशी साधकाचे मन 'गती चक्रात' स्थित असते. सनातन धर्मग्रंथानुसार, असे सूचित केले आहे की विश्वाची निर्माती कुष्मांडा माता सूर्यमालेत वास करते. या देवीच्या चेहऱ्यावर तेज दिसते. या प्रकाशाने संपूर्ण विश्व प्रकाशित झाले आहे. कुष्मांडा मातेची पूजा केल्याने साधकाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक विकारांपासून आराम मिळतो. शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अशा पद्धतीने देवीची पूजा करा.
देवीचे रूप
देवी कुष्मांडा देवीला अष्टभुजा देवी असं म्हटलं जातं. देवी कुष्मांडा ही आठ हातांची आहे. त्यांच्या हातात अनुक्रमे गदा, कलश, कमळ, धनुष्यबाण आणि कमंडल आहेत. एका हातात जपमाळ आहे. याने तिन्ही लोकांचे कल्याण होते. देवी कुष्मांडाचे वाहन सिंह आहे. ही देवी आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते आणि त्यांना सुख, शांती आणि समृद्धी देते.
देवी कुष्मांडाची 'अशी' करा पूजा
- सर्वात आधी सूर्योदयापूर्वी स्नान करा तसेच, देवीला हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करा. तुम्ही देवीला निळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करु शकता.
- त्यानंतर कलशाची पूजा करा आणि कलशला टिळा लावा.
- देवीचं ध्यान करुन देवीच्या मंत्राचा जप करा. त्यानंतर, लाल पुष्प, सफेद कमंडल, फळ, सुका मेवा अर्पित करा.
- देवीची आरती करा आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवा.
देवी कुष्मांडासाठी 'या' मंत्राचा जप करा
1. या देवी सर्वभूतेषु माँ कूष्मांडा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
2. ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै’
3. ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
देवीला प्रसाद अर्पण करा
आता पंचोपचार केल्यानंतर कुष्मांडा देवीची पूजा फळे, फुले, धूप, दिवा, हळद, चंदन, कुमकुम, दुर्वा, सिंदूर, दीप, अक्षता इत्यादींनी करा. देवी कुष्मांडा हिला मालपुआ आवडतो असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे देवीला प्रसाद म्हणून मालपुआ अवश्य अर्पण करा. पूजेदरम्यान चालीसा आणि मंत्रांचा जप अवश्य करा. शेवटी, आरती करा आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. दिवसभर उपवास ठेवा. संध्याकाळी आरती करा आणि फळे खा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: