Diwali 2024 : आज नरक चतुर्दशीचा दिवस; जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त
Narak Chaturdashi 2024 Date : दिवाळीत नरक चतुर्दशीला काही विशेष महत्त्व आहे. या तिथीला छोटी दिवाळी असं म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं. या दिवशी देवाची करायची पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
Narak Chaturdashi 2024 Date : दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे, नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024). या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आधल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. याच दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ असते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व असतं. यंदा ही नरक चतुर्दशी नेमकी कधी? जाणून घेऊया.
नरक चतुर्दशी तिथी (Narak Chaturdashi 2024 Tithi)
पंचांगानुसार, कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर 2024 ला बुधवारी दुपारी 01:15 पासून सुरु झाली आहे. तर दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबरला म्हणजेच आज दुपारी 3:52 वाजता चतुर्दशी तिथी संपेल.
नरक चतुर्दशी कधी साजरी करायची? (Narak Chaturdashi 2024 Date)
उदय तिथीनुसार, नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबरला साजरी करायची आहे. याच दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ असेल. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळाचं सेवन केलं जातं.
नरक चतुर्दशी 2024 पूजा विधी (Narak Chaturdashi 2024 Puja Vidhi)
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, हनुमान आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा करा. या सर्व देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्यात स्थापित कराव्या आणि त्यांची यथायोग्य पूजा करावी. देवांच्या समोर धूप-दिवे लावा, कुंकू तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करुन पूजा संपन्न करा.
अभ्यंगस्नानाची वेळ
अभ्यंगस्नानाची वेळ 31 ऑक्टोबर 2024 - सकाळी 05:28 ते 06:41 वाजेपर्यंत असणार आहे.
अभ्यंगस्नान कसं करावं?
दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणं लावून स्नान करावं. अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं. त्यानंतर देवाला नैवेद्य म्हणून फराळाचे पदार्थ दाखवावे. घरातील सर्व सदस्यांनीही अंघोळीनंतर फराळाच्या पदार्थाचं सेवन करावं.
अनेक ठिकाणी या दिवशी दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो. अनेक तरुण-तरुणी या सांस्कृतिक कार्यक्रमाला तयार होऊन जातात आणि दिवाळीचा उत्साह साजरा करतात.
नरक चतुर्दशीला पायाने का फोडलं जातं कारिटं?
अभ्यंगस्नानापूर्वी कारिट नावाचं फळ फोडण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही पाळली जाते. ते फळ नरकासूर या राक्षसाचं प्रतिक मानलं गेलं आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानापूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट ठेचलं जातं. अभ्यंगस्नानाच्या आधी कारिटं फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध केला जातो. खरं तर, एका अर्थाने त्या रुपात आपल्या मनातील सारी कटुता, दुष्टतेचा नाश केला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :