Nag Panchami 2024 : श्रावणातील आज पहिला सण नागपंचमी! जाणून घ्या अचूक तारीख, पूजा वेळ आणि मंत्र
Nag Panchami 2024 : श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे.
Nag Panchami 2024 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सुरू होतात सण-उत्सव. श्रावण महिन्यात येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. 2024 मध्ये नागपंचमी कधी आहे? नेमकी तारीख आणि पूजा वेळ जाणून घेऊया.
कधी आहे नागपंचमी?
यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच आज आहे. श्रावण सुरू झाला की पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली जाते.
नागपंचमी 2024 पूजा मुहूर्त
यंदा नाग पूजेसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्टला (आज) सकाळी 12.36 वाजता सुरु होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3.14 वाजता संपेल.
नागपंचमी का साजरी केली जाते?
पौराणिक कथेनुसार, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, त्याचा मुलगा जनमेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला. ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जनमेजयाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचं रक्षण झालं. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला.
नागपंचमी महत्त्व
हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूचा पलंगदेखील आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून कालसर्प दोष नाहीसा होतो. या दिवशी नागांची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं. या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नाग देवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःखं दूर होतात.
नागपंचमी पूजा मंत्र
1. अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभन च कंबलम् ।
शंखा पालन धृतराष्ट्र तक्षकं कालियाम तथ ।
एतानि नव नमानि नागणां च महात्मानम् ।
तस्य विषभयाम् नास्ति सर्वत्र विजयी ।
2. ओम भुजंगेशाय विम्हहे,
सर्पराजाय धीमहि,
तन्नो नागः प्रचोद्यात् ।।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :