Margashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार? जाणून घ्या अचूक तिथी, महत्त्व आणि पूजा विधी
Margashirsha Guruvar 2024 : मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. महिला पूजेसोबत दर गुरुवारी उपवास देखील ठेवतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत? जाणून घ्या
Margashirsha Guruvar 2024 Dates : इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने असतात. त्याचप्रमाणे हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र, आषाढ, ज्येष्ठ, सावन, भाद्रपद, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे महिने असतात. मार्गशीर्ष महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महाराष्ट्रात यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 2 डिसेंबरपासून झाली आहे. तर पहिला गुरूवार 5 डिसेंबर रोजी आहे.
मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रुपाची पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्षमध्ये किती गुरूवार आहेत, शेवटचा गुरुवार कधी आणि घटस्थापनेचं महत्त्व आणि पूजा विधी जाणून घेऊया.
मार्गशीर्ष गुरुवार 2024 व्रत तारीख (Margashirsha 2024 Dates)
पहिला गुरूवार - 5 डिसेंबर
दुसरा गुरूवार - 12 डिसेंबर
तिसरा गुरूवार - 19 डिसेंबर
चौथा गुरूवार - 26 डिसेंबर
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व (Margarshisha Guruvar Importance)
मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे. असं मानलं जातं की, जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं. या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते. असं मानलं जातं की, मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं, तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही, देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो. यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो.
महालक्ष्मीचं व्रत कसं करतात? (Mahalaxmi Vrat Puja Vidhi)
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची परंपरा आहे. घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं. हार-वेणी अर्पण करून दर गुरूवारी पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू आणि वाणात एखादी भेटवस्तू दिली जाते.
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: