(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hartalika Pujan 2022 : हरतालिका व्रताची उपासना का करावी? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
Hartalika Pujan 2022 : भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिका (Hartalika 2022) हे व्रत केलं जातं.
Hartalika Pujan 2022 : भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिका (Hartalika 2022) हे व्रत केलं जातं. अखंड सौभाग्य राहावं यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. या दिवशी अनेक ठिकाणी महिला वर्ग हरतालिकेची पूजा मोठ्या संख्येने करतात. यावर्षी हरतालिका 30 ऑगस्ट 2022 (उद्या) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने हरतालिका पूजनाची कथा नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.
हरतालिका पूजन विधी आणि महत्त्व :
हरितालिका ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथीला करतात. गणेशोत्सवाशी या व्रताचा संबंध नाही. कुमारिकांनी विशेषत: ही पूजा करावी. आणि आपलं मनोव्रत पूर्ण झालं म्हणून सौभाग्यवतींनीही ही पूजा करावी. तसेच ज्यांचे पती हयात नाहीत. त्यांनी उपोषण करावं असं हे व्रत आहे. या दिवशी वनामध्ये असणाऱ्या वेली, फुलं यांच्या पत्री घेऊन त्या अर्पण कराव्यात. या सर्व औषधी गुणांनी युक्त आहेत. त्यांचा संग्रह व्हावा. त्यांचं जतन व्हावं आणि ही पूजा संपन्न व्हावी यासाठी त्या पत्रींना महत्त्व आलं आहे. हे व्रत अनेक वर्ष स्त्रिया करत आलेल्या आहेत. वैराग्य आणि वैभव दोन्हीही आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, मर्यादा त्याची सांभाळता आली पाहिजे, आणि अखंड पतीप्रेम मिळवता यावं म्हणून सुवासिनी, कुमारिका हे व्रत करतात.
हरतालिका पूजन तिथी :
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेस येणारे हे व्रत विवाहित स्त्रिया आणि कुमारिका करतात. यावर्षी हे व्रत 30 ऑगस्ट 2022 ला आलेले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
काय आहे हरतालिका पूजनाची कथा?
राजाराम जोशी गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हिमालय राजाची कन्या पार्वती कठोर तपश्चर्या करते. जवळपास 64 वर्ष पार्वतीने हे व्रत केलेलं असतं. हा प्रसंग फार प्राचीन म्हणजेच गणेशाच्या जन्माच्या आधीचा आहे. राजकन्या ही अत्यंत वैभवामध्ये वाढली. महाराजांच्या सूचनेप्रमाणे हिमालयाने ही कन्या विष्णूला अर्पण करायचं ठरवलं होतं. परंतु, पार्वतीला मात्र, वैभवापेक्षा वैराज्याची ओढ लागली होती. आणि त्यामुळे शिवाला प्रिय असं तिने व्रत केलं. व्रताची निष्पत्ती अशी झाली की, तिला शीवप्राप्त झालं. असा हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी केलेले हे व्रेत आहे. हिमालयाची कन्या पार्वती हिने जेव्हा राजप्रसादाचा त्याग करून वनाचा स्विकार केला तेव्हा तिला मदत म्हणून तिची मैत्रीण ती पार्वतीबरोबर राहिली आणि पार्वतीला सर्वतोपरी हे व्रत आणि तपश्चर्या करण्यासाठी तिने मदत केली. म्हणून ती पण वंदनीय, पूजनीय मानली जाते.
महत्वाच्या बातम्या :