Kartik Purnima 2024 : आज देव दिवाळी; संध्याकाळी 'या' 5 ठिकाणी आठवणीने दिवे लावाच, वर्षभर नांदेल सुख-समृद्धी
Dev Diwali 2024 : दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी दिवे प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे. काही विशेष ठिकाणी दिवे लावल्याने देवांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि अशा घरावर वर्षभर देवाची कृपा राहते.
Dev Diwali 2024 Upay : हिंदू धर्मात देव दीपावलीचे (Dev Diwali 2024) विशेष महत्त्व आहे. दिवाळीनंतर कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. असं म्हणतात की, या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या दहशतीतून देवांना मुक्त केलं, ज्याच्या आनंदात देवांनी वैकुंठ लोकांमध्ये दिवे लावून आनंद साजरा केला. त्यामुळे दरवर्षी हा सण देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. यंदा देव दिवाळी शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे.
सर्व देशभरात शंकराच्या नगरी काशी, हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये देव दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते आणि या दिवशी दिवा दान करण्याचं देखील विशेष महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार, या पवित्र दिवशी घरातील काही ठिकाणी दिवे लावल्याने वर्षभर सुख-संपत्ती नांदते आणि देवांचा विशेष आशीर्वाद मिळतो.
देव दिवाळीला दिवे कुठे लावायचे?
देव दीपावलीनिमित्त घरात दिवे लावत असाल तर पहिला दिवा घरातील मंदिरात/देव्हाऱ्यात लावावा. येथे तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. यानंतर भगवान विष्णू आणि भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावणं देखील खूप शुभ मानलं जातं. शक्य असल्यास आपल्या गुरुच्या घरी दिवा दान करा. आज पौर्णिमा तिथीला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं देखील शुभ मानलं जातं. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावावा. त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही.
घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावेत, किचनमध्ये पाण्याच्या स्त्रोताजवळ दिवे लावावेत. घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा ठेवावा. या दिवशी दक्षिण दिशेला चतुर्मुखी तेलाचा दिवा लावल्याने अकाली मृत्यूची भीतीही दूर होते. तुमच्या भक्तीनुसार, देव दिवाळीला तुम्ही 11, 21, 51 आणि 108 दिवे लावू शकता. असं म्हणतात की, दिवाळीला दिवा दान केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा लाभते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते.
देव दिवाळीच्या दिवशी करा हे उपाय (Dev Diwali Remedies Upay)
- देव दिवाळीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. असं केल्याने 100 अश्वमेध यज्ञ करण्याएवढं पुण्य प्राप्त होतं, असं मानले जातं.
- या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. असें केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी घरात नवीन तुळशीचे रोप लावावं
- देव दिवाळीच्या दिवशी तुळशीला पिवळ्या रंगाची ओढणी अर्पण करा. असं केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते, असं मानलं जातं.
- देव दिवाळीच्या दिवशी घरी सत्यनारायणाची कथा पठण करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी सत्यनारायणाची कथा पठण किंवा श्रवण केल्याने भक्तांचं सर्व प्रकारचं दु:ख, संकटं नष्ट होतात आणि त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :