Kolhapur : सचिन तेंडुलकरचा मुलगा देवदर्शनासाठी कोल्हापुरात; अर्जुन तेंडुलकरने दर्शन घेतलेल्या नृसिंहवाडी दत्त मंदिराची अख्यायिका काय?
Kolhapur : तेंडूलकर कुटुंबाची श्री दत्त महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे आणि त्यामुळेच सचिन तेंडुलकरच्या मुलाने नुकतंच कोल्हापुरात येऊन नृसिंहवाडी दत्त मंदिरात दर्शन घेतलं. आता या मंदिराची नेमकी आख्यायिका काय? जाणून घ्या.
Kolhapur : तेंडुलकर कुटुंब आणि कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचं एक वेगळंच नातं आहे. मुळात तेंडुलकर कुटुंबियांची नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे. आजच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने नृसिंहवाडी दत्त मंदिरात (Nrusinhawadi Datta Mandir) येऊन दर्शन घेतलं.
मुंबई इंडियन्स संघाचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर तातडीने अर्जुन श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी दाखल झाला. आता या नृसिंहवाडी दत्त मंदिराची आख्यायिका नेमकी काय आहे? जाणून घेऊया.
नृसिंहवाडी दत्त मंदिर आख्यायिका (Nrusinhawadi Datta Mandir Aakhyayika)
कोल्हापुरात असलेल्या नृसिंहवाडी दत्त मंदिराला दत्तप्रभूंची राजधानी म्हणून संबोधलं जातं. 1378 मध्ये कोल्हापुरातील कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्या दरम्यान 1421 साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात ते वास्तव्यास होते.
नृसिंहसरस्वतींनी या ठिकाणी तब्बल बारा वर्षं तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर 1434 मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू, अशी ग्वाही भक्तजनांना दिली आणि गाणगापुरी (Gangapur) प्रस्थान ठेवलं.
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच ठिकाणाला आज नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखलं जातं.
दक्षिणद्वार सोहळा प्रसिद्ध
कृष्णा-पंचगंगेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात महापुराचं पाणी पादुकांना स्पर्श करतं, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरलं तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात.
वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी आणि इतर सण येथे नियमित साजरे केले जातात. पहाटे तीनपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू असतो.
कसं पोहोचायचं?
एसटी - हे क्षेत्र कोल्हापूरपासून पूर्वेस 50 किमी अंतरावर आहे. तर सांगली जिल्ह्यापासून 22 किमी अंतरावर दक्षिणेस आहे. सांगली बस स्थानकावरून नृसिंहवाडीला जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली-कुरूंदवाड बसने सुद्धा इथे जाता येतं.
रेल्वे मार्ग - सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचं महत्त्वाचं रेल्वे-स्टेशन आहे.
इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त निवास आहे. दुपारी 12 वाजता महाप्रसादाची सोय देखील आहे.
हेही वाचा:
Vastu Tips : घरात लाकडी देव्हारा असणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...